बुलडाण्यातील परिवर्तन पब्लिकेशन्स या प्रकाशन संस्थेचे संचालक तथा समीक्षक- कवी रविंद्र साळवे यांचे “सम्यक साहित्य दर्शन” हे आस्वादक समीक्षेचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. या समीक्षा ग्रंथात त्यांनी ३१ पुस्तकांचा परिचय करून दिला आहे. या पुस्तकांमध्ये २० कवितासंग्रह ,६ वैचारिक ग्रंथ, ३ लेखसंग्रह, एक आत्मकथन आणि एक कथासंग्रह आहे.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!रवींद्र साळवे हे स्वतः कवी असल्याने कवितासंग्रहाची आस्वादक समीक्षा हा त्यांचा आवडीचा प्रांत आहे, म्हणून साहजिकच याही पुस्तकात कवितासंग्रहाचा परिचय मोठ्या प्रमाणावर आहे. मराठी साहित्यात नावाजलेले कवी राम दोतोंडे यांचा गल्ली बदललेला मोर्चा, मांगीलाल राठोड यांचा मुनादी, सुदाम खरे यांचा चेतनांकुर, मोहन शिरसाट यांचा नाही फिरलो माघारी, डॉ. विजयालक्ष्मी वानखेडे यांचा ती कविता आणि चळवळ, कवी किरण डोंगरदिवे यांचा तुटलेल्या बोटाचे संदर्भ, डॉ. सुनिल पवार यांचा उसवलेल्या आयुष्याचे टाचे सांधतांना, सत्यपालसिंग राजपूत यांच्या काळ्या जादूचे अवशेष, प्रा. डॉ. अशोक इंगळे यांचा युद्धपक्षी, कवी विशाल इंगोले यांचा माझ्या हयातीचा दाखला,तन्मय बागुल यांचा इतिहासाचा शब्दगंध, प्रशांत डोंगरदिवे यांचा क्रांतीचे मुळाक्षरे, रेशमा खरात यांचा रेशमाई, गझलकार चंद्रशेखर भुयार यांचा सत्ता हा काव्यसंग्रह ,ज्ञानेश सावकार यांचा हा चंद्र पौर्णिमेचा,कवी नारायण जाधव येळगावकर यांचा भिमाचे गोंधळी, ‘माय’ स.ग. पाचपोळ यांची कविता, संपादक नरेंद्र लांजेवार, नारायण पाटील यांचे बोल अंतरीचे, हेमंतकुमार पाटील यांचा गाव इत्यादी कवितासंग्रहावर संम्यक दृष्टिकोनातून परिचयात्मक प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. या संग्रह मध्ये एका ग्रंथपालाची प्रयोगशाळा, दक्षिणेचा प्रबुद्ध समता नायक महात्मा बसवेश्वर, मुक्ता लेख संग्रह, झुंज आत्मकथन, अभ्यासाचे सुपर पावर फुल मंत्र, बुद्धी वाढविण्यासाठी सर्वकाही,सल -उकल, अवकाश हा कथासंग्रह आणि संदीप वासलेकर यांचे एका दिशेचा शोध इत्यादी पुस्तकांवर सुद्धा उत्कंठावर्धक परिचय समिक्षक रविंद्र साळवे यांनी करून दिला आहे.
रवींद्र साळवे यांनी समकालीन मराठीतील परिवर्तनवादी चळवळी साठी लेखन करणाऱ्या कवी आणि काही लेखकांच्या कलाकृतींची चांगली ओळख सम्यक साहित्य दर्शन या समीक्षात्मक ग्रंथात करून दिली आहे. मराठी साहित्य प्रांतात सातत्याने नवनव्या लेखन कृतींची भर पडत असते. लेखकाला लिहिण्याचा आतला रेटा असला की प्रतिभेला अंकुर फुटतात आणि जन्माला येते साहित्य कलाकृती. काही वाचनीय व काही चिंतणीय साहित्यकृतींची ओळख कवी- समीक्षक रविंद्र साळवे यांनी खऱ्या अर्थाने सुज्ञ वाचकांना करून दिली आहे. रवींद्र साळवे यांच्या समीक्षा लेखनाला शुभेच्छा …
- सम्यक साहित्य दर्शन
- लेखक: रविंद्र साळवे(९८२२२६२००३)
- परिवर्तन पब्लिकेशन्स बुलढाणा
- पाने १३६, किंमत १३० रुपये
- नरेंद्र लांजेवार,
- बुलडाणा
- ९४२२१८०४५१
● हे वाचा -देवस्थान इनाम वर्ग 3 जमीन आणि वंचित विमुक्त व भटक्या जमाती, भिक्षेकरी भटक्या जमाती..!