Recent in Technology

Advertisement

Breaking News

अजगराच्या न्याहरीतले किडूकमिडूक पक्ष..!

आमच्या लहानपणी 'बुढ्ढीके बाल' हा मिठाईचा एक महत्त्वाचा प्रकार होता. साखरेच्या पाकापासून म्हाताऱ्या बुढीच्या पांढऱ्या केसासारखी दिसणारी मिठाई असे तिचे स्वरूप होते. मिठाईवाला आपल्यासमोरच त्याचा छान पुंजका बनवायचा. आकर्षक असायचा. एखाद्या हॉलीबॉल सारखा किंवा त्याहीपेक्षा मोठा दिसायचा. पण प्रत्यक्षात त्याचा जीव मात्र किडूकमिडूक असायचा ! चुरगाळून एकत्र केला, तर तो मुठभर सुद्धा नसायचा. म्हणजे नुसतीच हवा. नुसताच आभास ! नुसतंच तोंडाला पाणी सोडणारा उपद्व्याप !

हे सारं आठवण्याचं कारण म्हणजे संभाजी ब्रिगेड आणि भाजपच्या युतीबाबत पुरुषोत्तम खेडेकर यांनी घेतलेली भूमिका ! शिवाजी-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या नावावर उभ्या झालेल्या चळवळी आणि त्यातून निर्माण झालेले अनेक छोटेमोठे प्रादेशिक पक्ष शेवटी किडूकमिडूक सत्तेसाठी कसे कासावीस झालेले असतात, हे उदाहरण महाराष्ट्राला नवे नाही. अलीकडच्या काळात रामदास आठवले हे अशा पक्षांचे युगपुरुष मानायला हवेत. 

एकंदरीत फुले-शाहू-आंबेडकरवाद हा राजकीयदृष्ट्या यशस्वी फॉर्म्युलाच नाही, असे मानायचे की त्या नावावर काम करणाऱ्या लोकांची तेवढी कुवत नाही, असे समजायचे ? असे प्रश्न आता पडणे स्वाभाविक आहे. उलट शिवसेना या पक्षाने मांडलेली खरी/खोटी शिवशाही निदान महाराष्ट्रापुरता तरी यशस्वी फॉर्म्युला म्हणावा लागेल. कॉंग्रेसची स्वतःची स्वतंत्र आणि सर्वसमावेशक विचारधारा आहे. तिलाच गांधीवादी विचारधारा म्हटले जाते. राष्ट्रवादी कॉंग्रेसची नेमकी विचारधारा सांगणे कठीण आहे. ती एक बारामती पॅटर्न राजकीय भेळ आहे. तिच्यात केव्हा काय मिसळले जाईल, याचा काही निश्चित फॉर्म्युला नाही.

पुन्हा वर्णवादी व्यवस्था प्रस्थापित करण्याचा भारतीय जनता पार्टी आणि आरएसएस यांचा अजेंडा स्पष्ट आहे. आता त्यात कुठलाही संभ्रम राहिलेला नाही. त्यांची वाटचाल 'सेमीतालिबानी' या दिशेने सुरू आहे. पूर्णतः तालिबानी होणे त्यांना झेपणारे नाही. कारण डायरेक्ट लढाई, ही त्यांच्या अावाक्यातली गोष्ट नाही. कारस्थानी मेंदू हे त्यांचे मुख्य शस्त्र आहे, शास्त्र आहे. त्याच्या बळावरच त्यांनी आजवर एवढा पल्ला गाठला आहे. कारस्थानात ७०/८० टक्के ते यशस्वी झालेले आहेत. २०२४ मध्ये त्यांना पुन्हा सत्ता हवी आहे. जर ती मिळाली, तर देशाचे काही खरे नाही !

महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या पातळीवर विचार केल्यास शिवसेना हा भाजपचा सर्वात जुना साथी आहे. त्यांनाच गटकण्याचा प्रयत्न भाजपने सातत्याने केला आहे. भाजपा हा राजकीय अजगर आहे. प्रकरण हाताबाहेर जायला लागल्यामुळे उद्धव ठाकरे वेळीच सावध झाले आणि अजगराच्या तावडीतून निसटले. अर्थात महाविकास आघाडीचा पर्याय उपलब्ध होता, म्हणून ते यावेळी वाचले. अन्यथा त्यांचेही काही खरे नव्हते.

एवढी मोठी हक्काची शिकार निसटल्यामुळे अजगरावर महाराष्ट्रात उपासमारीची वेळ आली आहे. त्याची सहकुटुंब तडफड पाहिली की, यमुनेच्या डोहातला कालिया कसा अाकांडतांडव करत असेल, याची कल्पना येते. पण महाराष्ट्राच्या डोहात त्याचा फणा सध्यातरी ठेचला गेला आहे, याबद्दल वाद नाही.

अजगर म्हणा की अॅनाकोंडा म्हणा, पण त्याची भूक प्रचंड आहे. नितीशकुमार सारखी मोठी शिकार त्याच्या अर्ध्या पोटातून अचानक निसटली होती. ती पुन्हा पकडण्यात त्याला यश आले. तोच प्रयत्न महाराष्ट्रात देखील सुरू आहे. बाळासाहेब गेल्यानंतर बकरी वाटणारं पिलू प्रत्यक्षात वाघाचं निघावं, असा अनपेक्षित अनुभव त्यांना आला आहे. तरीही पुन्हा ती शिकार पकडण्याचा प्रयत्न त्यांनी सोडलेला नाही. सद्यातरी त्यांच्या हाती काही लागेल, असे दिसत नाही. म्हणून मग किडूकमिडूक शिकारीकडे त्यांनी आपले लक्ष वळवले आहे.

अशा शिकारी त्यांनी आधीही केल्या आहेत. आठवले, राजू शेट्टी, महादेव जानकर, विनायक मेटे असे काही लोक त्यांच्या न्याहरीसाठी उपयोगाचे होते. पण राजू शेट्टी हुशार निघालेत. अलगद निसटले. जानकर, मेटे यांचे पक्ष अजगराने अशा ठिकाणी नेवून संपवले, की आता त्यांनी कितीही बोंब मारली तरी महाराष्ट्र विश्वास ठेवणार नाही. आठवलेंचे राजकारण म्हणजे आंबेडकरी चळवळीच्या नावावर राजकीय अध:पतनाचा ऐतिहासिक मापदंड ठरेल. शिवाजी महाराज, शाहू महाराजांचे वारस देखील संघ दरबारी पोवाडे गाण्याच्या कामी लागलेलेच आहेत. त्यांच्या यादीमध्ये आता संभाजी ब्रिगेड या नावाची भर पडली आहे. संभाजी ब्रिगेडच्या निमित्ताने मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी जी राजकीय थिअरी मांडली ती धमाल मनोरंजक आहे. 'काहीही करून सत्ता मिळविणे हेच राजकीय पक्षांचे ध्येय असते, असावे..' हा जागतिक दर्जाचा सिद्धांत त्यांनी मांडला आहे. त्यामुळे फुले-शाहू-आंबेडकरवाद आणि त्यासोबत जगातील सारे मानवतावादी, समतावादी विचार, लढाया, संघर्ष एका झटक्यात त्यांनी भंगारात भिरकावले आहेत. 'सत्ता हेच सत्य, सत्ता हाच परमेश्वर आणि सत्ता हाच शिवविचार' अशी युगप्रवर्तक शिकवण त्यांनी उभ्या जगाला दिलेली आहे ! त्यामुळे आरएसएस सुद्धा त्यांना शरण येणार आहे ! 

काहीही करून सत्ता मिळवली पाहिजे, मराठा सेवा संघ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांची भांडणे पूर्ववत कायम राहतील, ही राजकीय युती आहे - वैचारिक नाही.. वगैरे अशी भन्नाट भूमिका त्यांनी या निमित्ताने मांडली आहे. 

मग प्रश्न असा पडतो, की तालिबानी लोकांनी ज्या तऱ्हेने सत्ता मिळवली, तो मार्ग देखील यांच्या कल्पनेतला 'शिवमार्ग' समजायचा का ? बरं, तुमचा वैचारिक विरोध जर प्रामाणिक असेल, बहुजन समाजाच्या हिताचा असेल, जिजाऊ-शिवाजी-संभाजी या महापुरुषांची प्रेरणा त्यामागे असेल, तर तुम्हाला संघाला शरण जाण्याची गरज का पडली ? देश किंवा निदान महाराष्ट्र तरी अशा कोणत्या संकटात सापडला आहे, की ज्याला वाचवण्यासाठी तुम्ही अशी भूमिका घेतली ? नितीश कुमार, शिवसेना सारख्या पक्षांना जे लोक कवडीची किंमत देत नाहीत, ते तुम्हाला किती आणि कशासाठी किंमत देतील ? तुमच्यामुळे काय महाराष्ट्र किंवा उत्तरप्रदेशात सरकार येण्याला मदत होणार आहे का ? गरज त्यांना आहे की तुम्हाला ? त्यांच्याप्रमाणे तुम्ही बदलणार की ते तुमच्याप्रमाणे ?

म्हणजे चार - दोन जागांच्या बदल्यात संभाजी ब्रिगेड आरएसएसची सत्ता देशावर प्रस्थापित व्हावी, यासाठी निष्ठेने प्रयत्न करणार आहे का ? दोन स्टूल बसायला मिळाले, की बदल्यात सारा देश संघाच्या घशात घालायला मदत करणार का ?

वरून पुन्हा मराठा सेवा संघ म्हणे आरएसएसच्या विरुद्ध म्हणे आपली वैचारिक लढाई पण सुरू ठेवणार आहे ! आहे की नाही गंमत ? बरं मग, खेडेकर साहेब नेमके कुणाच्या बाजूने असणार.. संभाजी ब्रिगेडच्या की मराठा सेवा संघाच्या ? की गडकरींच्या वाड्यावर ?

खरेतर सरळ भाजपशी सोयरिक करायची असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. पण स्वतःच्या समर्थनासाठी त्यांनी जी शाब्दिक सर्कस केली, तो सरळ सरळ वैचारिक व्यभिचार आहे. सामाजिक विश्वासघात आहे. स्वार्थासाठी असंख्य भोळ्याभाबड्या तरुणांच्या भवितव्याशी केलेला पाशवी खेळ आहे ! 

अर्थात, उद्या भाजपा त्यांना किती भाव देणार, युती प्रत्यक्षात होणार की नाही, की गडकरींच्या इशाऱ्यावर टाकलेला हा वाईड बॉल आहे, की पुन्हा खेडेकर पलटी मारणार.. याबद्दल आज काहीही काहीही सांगता येणार नाही.

बाकी काहीही असले तरी, खेडेकरांची ही भूमिका त्यांच्या भोळ्या भक्तांसाठी 'बुढ्ढीचे बाल' आहेत, विवेक जागा असलेल्या कार्यकर्त्यांसाठी 'जोरका धक्का' आहे, तटस्थ लोकांसाठी आश्चर्य आहे, आरएसएससाठी शाखेतील गंमत आहे, खेडेकरांसाठी कौटुंबिक पॅकेज आहे आणि भाजपच्या अजगरासाठी किडूकमिडूक नाश्त्याची सोय आहे !

.. आणि शेवटी नेहमी हवेत तरंगणाऱ्या, वास्तवाचे भान नसलेल्या विविध चळवळीतील लोकांसाठी फुले-शाहू-आंबेडकरी मांडणीच्या राजकीय उपयुक्ततेबाबत आत्मचिंतन करण्याची वेळ आहे !

तूर्तास एवढेच..!
-
ज्ञानेश वाकुडकर
अध्यक्ष
लोकजागर
9822278988
•••
टीप - माझा कोणताही लेख/कविता/साहित्य सामाजिक हेतूनं सोशल मीडिया किंवा अन्यत्र प्रकाशित करण्यासाठी, शेअर करण्यासाठी खुली परवानगी आहे. वेगळ्या परवानगीची गरज नाही. 
-
#लोकजागर अभियान मध्ये सहभागी व्हा !
#महागुरूकुल परिवारात सहभागी व्हा ! 
धन्यवाद !

- ज्ञानेश वाकुडकर
•••
( दै. देशोन्नती, १९/०९/२१ साभार )
•••
•••
संपर्क - 
लोकजागर अभियान
• 8446000461
• 8275570835
• 8605166191
• 9422154759
• 9773436385
• 8806385704
• 9960014116

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code