Header Ads Widget

अभिरुची,अनुभूती व अभिव्यक्ती असा साहित्य निर्मितीचा प्रवास असतो- प्रा.डाँ.सदानंद देशमुख

(शिक्षक  साहित्य  संघाच्या वर्धापन दिन सोहळ्याचे आँनलाईन आयोजन )

अमरावती :" साहित्याची निर्मिती ही एक गुढ व अद्भूत तरी सुंदर बाब असते कारण ती लेखक व वाचक या  दोघांनाही अानंद देते. सामाजिक  अाशय व कलात्मकतेमुळे साहित्याला मूल्य प्राप्त होते. साहित्य 
 निर्मिती कोणी आतून दाटून आलेली गोष्ट ,अनुभव ,विचार सांगण्यासाठी करतो  तर कोणी ठरवून हुकुमी पद्धतीने सुद्धा करतो.मला संत तुकाराम व बहिणाबाई चौधरी यांनी सांगितलेले अनुभव महत्त्वाचे वाटतात.संत तुकाराम महाराज म्हणतात ,"करितो कवित्व। 
 *म्हणाल हे कोणी ॥ नव्हे माझी वाणी। पदरीची॥ काय म्या पामर। बोलावी* *उत्तरे॥ परी त्या विश्वंभरे।* *बोलविले॥ तर माझी आई सरस्वती आहे.तिने या लेकिच्या मनात कितितरी गुपितं पेरलेली आहेत,ते सांगण्यासाठी मी 
 कविता करते, असे कवयित्री बहिणाबाई चौधरी म्हणतात. प्रतिभेला परिश्रमाची जोड दिल्याशिवाय साहित्य  निर्मिती होऊ शकत नाही.शेतकरी जशी शेतात मशागत करतो तशी वाचन -लेखन रुपी मशागत साहित्यिकाला करावी लागते. अभिरुची, अनुभूती व अभिव्यक्ती असा साहित्य निर्मितीचा  प्रवास असतो" असे विचार बारोमासकार  प्रा.डाँ.सदानंद देशमुख यांनी व्यक्त केले.
                      ते शिक्षक साहित्य संघाच्या  गुगल मीट अँप द्वारे  संपन्न झालेल्या तेराव्याआँनलाईन  वर्धापन दिन सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी
" साहित्याची निर्मिती प्रक्रिया " या विषयावर व्याख्यान देताना उद्घाटकीय भाषणात बोलत होते .
                     शिक्षक  साहित्य संघाच्या या वर्धापन दिन सोहळ्याचे उद्घाटक तथा प्रमुख व्याख्याते  प्रा.डॉ.सदानंद देशमुख (बारोमासकार,साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ),  अध्यक्ष प्रा.डॉ.सतीश तराळ (ज्येष्ठ साहित्यिक ) तर प्रमुख अतिथी 
 श्री जयदीप सोनखासकर (अध्यक्ष,  शिक्षक  साहित्य  संघ,महाराष्ट्र राज्य) होते.
                 अध्यक्षीय  भाषणात प्रा. डाँ.सतीश तराळ यांनी " साहित्य निर्मिती प्रक्रियेत सदानंद देशमुख यांच्यासारखे अस्सल अनुभवाचे अधिष्ठान महत्त्वाचे असते. कारण साहित्य निर्मितीत  अस्सल
 अनुभवच आकृतिबंध घेऊन येतो. निर्मितीप्रक्रीयेत लेखनपूर्व आणि लेखनांतर्गत तादात्म्य महत्त्वाचे असते. अधिकाअधिक पुर्रवाचन व पुर्नलेखनामुळे कलाकृती दर्जेदार होते. भालचंद्र नेमाडे व सदानंद देशमुख ही याची उत्तम उदाहरणे आहेत. छत्रपती संभाजी महाराज 
 जसे महापराक्रमी तसेच ते प्रज्ञावंत साहित्यिक  ,बहुभाषिक भाषाप्रभू होते,या त्यांच्या वैशिष्ट्यांकडे दुर्लक्ष
 झाले आहे.संत गाडगेबाबांनी बारा ते पंधरा हजार कीर्तने केली,ते महान जनसारस्वत होते." असे विचार व्यक्त केले.
                शिक्षक साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा वर्धापनदिनाचे प्रमुख अतिथी श्री जयदीप सोनखासकर यांनी शिक्षक साहित्य संघाचा तेरा वर्षाचा आढावा आपल्या प्रास्ताविकातून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.वीणाताई राऊत यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. लीनाताई निकम यांनी करून दिला. कवी व लेखक प्रा.अरुण  बुंदेले यांनी  आपल्या मधुर वाणीतून स्वरचित स्वागत गीताचे व शिक्षक दिनानिमित्त " आदर्श गुरुजी "या अभंगाचे गायन केले. प्रश्नोत्तरुपी चर्चासत्राचे संचालन अमरावतीचे जिल्हाध्यक्ष अतुल ठाकरे यांनी केले. शिक्षक साहित्य संघाचे केंद्रीय सचिव श्री राजेश सातव यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमरावती जिल्हाध्यक्ष अतुल ठाकरे व जिल्हा कार्यकारिणी यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. कार्यक्रमाला शिक्षक साहित्य संघाचे महाराष्ट्र राज्यातील विभाग प्रमुख व जिल्हाध्यक्ष व बहुसंख्य पदाधिकारी , आजीवन सभासद उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या