- ----------------------------------------
- २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिवसानिमित्त विशेष लेख -संपादक
- ----------------------------------------
भारतातील युवाशक्ती ही अध्ययनासह सामाजिक जाणिवेतून विधायक कार्यातही अग्रेसर असावी या उदात्त हेतूने विद्यापीठीय/महाविद्यालयीन शिक्षणक्रमांत राष्ट्रीय सेवा योजना अस्तित्वात आली.प्रारंभी राष्ट्रीय छात्र सेनेला पर्याय म्हणून राष्ट्रीय सेवा योजना सुरू झाली.आता ही योजना सर्वव्यापक अशी योजना झाली.युवकांसाठी हक्काचे विचारपीठ म्हणून राष्ट्रीय सेवा योजना युवकांच्या आयुष्याचा अविभाज्य अंग झाली.विशेष म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना पथकाने आपल्या विविधांगी उपक्रमाने खऱ्या अर्थाने आता लोकचळवळीचे स्वरूप धारण केले.युवाशक्ती आणि समाज एका धाग्यात गुंफले.विशेष म्हणजे देशाच्या आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडविण्यासाठी रासेयो अत्यंत महत्त्वपूर्ण अशी भूमिका निभावत आहेच शिवाय देशातील युवाशक्तीना नवचेतना देण्याचे महत्वपूर्ण कार्य सुद्धा तितक्याच जोमाने करीत आहे.
भारत हा खेड्यांचा देश आहे.खेडे स्वयंपूर्ण आणि ग्रामीण जनतेसह खेड्यांचा विकास साधल्याशिवाय देशाचा विकास नाही अशी गांधीजीची ठाम भूमिका होती."खेड्याकडे चला" हा संदेश त्याचीच साक्ष देतो. देशभरातील शिक्षित युवकांनी अध्यायनाबरोबरच समाज सेवेचे व्रत स्वीकारणे गांधीजींना अपेक्षित होते.विद्यार्थी/युवकांनी महाविद्यालयीन जीवनात बौद्धिक विकास साधतानाच समाजहितही कसे जपता येईल ही भावना समस्त भारतीयामध्ये कशी रुजविता येईल याकडे गांधीजीचा अधिक कल होता.म्हणूनच स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अशी योजना प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी सरकारद्वारे विशेष प्रयत्न चालविलेले होते.अध्ययनाचे धडे गिरविताना विद्यार्थी/युवकांमध्ये राष्ट्रप्रेम,राष्ट्रसेवा,समर्पण आणि सहानुभूतीची भावना निर्माण करतानाच त्यांच्यातील प्रचंड ऊर्जाशक्तीचा वापर हा समाजपयोगी कार्यासाठी कसा करता येईल या उदात्त हेतूने ही संकल्पना पुढे आली.त्यासाठी १९५९ च्या प्रथम शिक्षा आयोगाने अध्ययनाबरोबरच स्वईच्छेद्वारा राष्ट्रसेवेची शिफारस केली होती.पहिल्या पंचवार्षिक योजनेतही समाजसेवा आणि शारीरिक श्रम तसेच श्रमदानावर आधारित उपक्रम/शिबिरे आयोजनावर विशेष भर दिला होता.१९५० मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशभरातील सर्व मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात पदवी शिक्षण कालावधीत विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागात श्रमदानासह समाज सेवेचे कार्य करण्याचे सूचित केले.
१९५० साली दिल्लीत शिक्षण मंत्र्यांची बैठक संपन्न झाली.सि.डी.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली समितीनेही उपरोक्त प्रमाणे तसेच अन्य महत्त्वपूर्ण अशा शिफारशी केल्या होत्या.प्रा.के.जी.सय्यदिन यांनी सुद्धा वेगवेगळ्या देशातील अभ्यासाच्या आधारावर "नॅशनल सर्विस फॉर द युथ" असा अहवाल भारत सरकारला सादर केला.त्यांनीही अशी योजना सुरू करण्यावर विशेष भर दिला.कोठारी शिक्षण सुधारणा आयोगानी सुद्धा अध्ययनाच्या सर्वच टप्प्यावर विद्यार्थी हा समाजसेवेशी निगडित असावा अशी सूचना केली होती.१९६७ मध्ये देशभरातील राज्याच्या शिक्षण मंत्र्यांच्या परिषदेत सुद्धा छात्रसेनेबरोबर राष्ट्रीय सेवा योजना असावी याबाबत एकवाक्यता झाली.१९६९ ला शिक्षण मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोग द्वारा संचालित उच्च शिक्षण संस्थांनच्या प्रतिनिधींची बैठक झाली.यातही असाच सूर उमटला.अशा वेगवेगळ्या समितीचे अहवाल आणि सूचनेच्या सकल प्रवासातून महात्मा गांधीजीच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना पथकाची घोषणा करण्यात आली.
२४ सप्टेंबर १९६९ पासून राष्ट्रीय सेवा योजना प्रत्यक्ष अस्तित्वात आली.नव्या शिक्षण प्रणालीत विद्यार्थी स्वावलंबी आणि चारित्र्यसंपन्न असावा तसेच त्यांच्यात सामाजिक जाणिव आणि राष्ट्रीयत्वाची भावना वृद्धिंगत करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे.प्रारंभी देशभरातील ३७ विद्यापिठात ४० हजार विद्यार्थ्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत ही योजना कार्यान्वित करण्यात आली होती.आता ही योजना सर्वच विद्यापीठा अंतर्गत तसेच अधिकांश महाविद्यालयात कार्यान्वित आहे.
राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभागी स्वयंसेवकांना रचनात्मक,सामाजिक आणि सृजनात्मक कार्यासाठी सलग प्रेरित केले जाते.समाजातील विविध समस्या/अडचणी निवारण्यासाठी युवा शक्तीचा वापर करण्यावर अधिक भर दिला जातो.स्वयंसेवक सुद्धा समाजकार्य व समाजसेवे प्रति कायम तत्पर असतो.जागृत असतो. राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारा देशप्रेम,राष्ट्रीय एकात्मता,सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता,सामाजिक बांधिलकी,सामाजिक प्रबोधन,आरोग्य व पर्यावरण तसेच व्यसनमुक्ती,महिला जनजागृती,स्वच्छता व साक्षरता अभियान,श्रमदान आणि समाजाशी निगडित वेगवेगळ्या विषयावर वेगवेगळ्या मान्यवरांची व्याख्याने असे विभिन्न उपक्रम आणि कार्यक्रम राबविले जातात.यातूनच स्वयसेवकाच्या अंगी सामाजिक जाणीव आणि सेवाभावी वृत्ती असे गुण रुजतात.समाजातील अडी-अडचणी/समस्या समजून घेणे आणि त्या निवारण्यासाठी परिस्थितीनुसार नवनवे उपाय शोधण्याचा स्वयंसेवकांचा नेहमीच प्रयत्न असतो.नेतृत्व गुणांचा विकास आणि व्यक्तिमत्व विकास साधण्याबरोबरच भारतीय लोकशाहीला बळकटी आणणे,राष्ट्रीय एकता आणि सामाजिक समस्यांचा अभ्यास करणे,साक्षर निरक्षरतेची दरी कमी करणे,गोरगरिबांच्या सेवेसाठी तत्परता दाखविणे, शिक्षणाचा वापर हा व्यक्तिगत तसेच सामाजिक समस्या/अडचणी दूर करण्यासाठी आपल्यातील शक्तीचा वापर कसा करता येईल यासाठी विभिन्न उपाय शोधणे असे विभिन्न गुण स्वयंसेवकाच्या अंगी आपसूकच येतात."माझ्यासाठी नव्हेतर तुमच्यासाठी"(Not me but you) या ब्रीदवाक्याला अनुसरून स्वयंसेवक हा सतत कार्यतत्पर असतो.समाजातील विविध अडचणी आणि आपत्तीच्या वेळी स्वयंसेवकांनी दाखविलेली तत्परता आणि धाडस त्यांचेच द्योतक आहे.
राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे विद्यार्थी घडविणारी एक प्रकारची संस्कार शाळा आहे. असे संस्कार हे नियमित कार्यक्रम व सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे (दत्तक गावात) माध्यमातून केले जाते. विशेष शिबीर आणि नियमित कार्यक्रमा अंतर्गत महाविद्यालयात आणि दत्तक गावात वर्षभर विविध प्रबोधनात्मक आणि श्रमदानावर आधारित कार्यक्रम/ उपक्रम राबविले जातात.त्यात सर्वसाधारणपणे विविध विषयाच्या अनुषंगाने मान्यवरांची व्याख्याने,महापुरुषाच्या जयंती पुण्यतिथी कार्यक्रम घेतले जातात.यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते.सोबतच रक्तदान शिबिरे, मोफत रक्तगट तपासणी शिबिर, एड्स रोग जनजागृती, रोगप्रतिबंधक लसीकरण, रोगनिदान शिबिर,व्यसनमुक्ती अभियान,पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण,जलसंधारण,महिला विषयक लैंगिक समानता,स्री विषयक समस्या,स्त्रीभ्रूण हत्या,बालविवाह,महिला सक्षमीकरण,अंधश्रद्धा निर्मूलन,रोजगार-स्वयंरोजगार आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, मतदार जनजागृती,ग्रामसफाई, तसेच सामाजिक सामंजस्य आणि राष्ट्रीय एकात्मता असे समाज जीवनाशी निगडित उपक्रम राबविले जातात.श्रमदानावर आधारित रस्ते बांधणी,सुलभ शौचालय बांधणे,चर खोदणे,पाणी आडवा पाणी जिरवा,वनराई बंधारे असे श्रमदानावर आधारित उपक्रम राबविले जातात.सात दिवसीय विशेष शिबिरा अंतर्गत (दत्त गावात) अनेक प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात. पथनाट्य,गावातून प्रबोधन रॅली,उद्बोधक घोषवाक्य, गावकर्यांशी गटचर्चा इत्यादीच्या माध्यमातून स्वयंसेवक गावकऱ्यांशी समरस होतात. यासर्वं सांघिक उपक्रमात गावकरी सुद्धा तितक्याच तळमळतेने/हिरीरीने सहभाग नोंदवतात.सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून गावकऱ्यांचे मनोरंजनांतून प्रबोधन केले जाते.या सर्व कार्यक्रमातून आणि उपक्रमातून स्वयंसेवक आणि गावकरी यांच्यात एक आगळावेगळा ऋणानुबंध निर्माण होत असतो जो कायस्वरूपी टिकून राहतो. यातून व्यक्तीगतच नव्हेतर समाज हितही साधण्यास मदत होते.
राष्ट्रीय सेवा योजनेची संकल्पना आणि ध्येयधोरणे आदर्शवत तसेच विद्यार्थी युवकाच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पूरक आणि समाजासाठी उपयुक्त असले तरी कार्यक्रमाची यशस्विता ही कार्यक्रम अधिकाऱ्याची कार्यशैली आणि त्याचे योग्य नियोजन यावर बरेच काही अवलंबून असते. विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडविणे आणि त्यांना विविध सामाजिक समस्या प्रती जागृत करणे हा योजनेचा मूळ हेतू आहे. त्या दृष्टीने कार्यक्रम अधिकाऱ्यांची विवेकशीलता आणि कल्पककृती यावर या योजनेचे यश अवलंबून आहे. स्वयंसेवकातील सुप्त गुणांची पारख आणि त्याच्या कार्यक्षमतेनुसार कामाची विभागणी करण्याचे कसब कार्यक्रम अधिकाऱ्याच्या अंगी असणे अपेक्षित आहे.जबाबदारी म्हणून नव्हे तर एक कर्तव्य म्हणून स्वतःला या कार्यात वाहून घेतल्यास ध्येय धोरणे पूर्णत्वास जाण्यास वेळ लागणार नाही. कार्यक्रम अधिकारी कर्तव्यतत्पर आणि सजग असल्यास उपयुक्त कार्यक्रमाचे आयोजन/नियोजन करण्याचे कसब आपसूकच त्यांच्या अंगी येते.विशेष म्हणजे स्वयंसेवकांना कार्यप्रवण करताना त्यांना श्रमिक म्हणून नव्हे तर स्वयंसेवक म्हणून कार्य करण्याची जाणीव आणि ऊर्जा प्रदान करण्याची जबाबदारी ही नक्कीच कार्यक्रम अधिकाऱ्याची असते.एका आदर्श युवकाची/नागरिकाची जडणघडण ही या उपक्रमाची फलश्रुती आहे.
रासेयो द्वारा स्वयंसेवकाचे व्यक्तिगत हित आणि त्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास साधला जातो.त्यांच्यात स्वयंशिस्त सोबतच समाजामध्ये वेळोवेळी उद्भवणाऱ्या समस्या आणि अडचणी प्रति त्यांच्यात जाणीव निर्माण होत असते.विविध सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक आणि प्रबोधनात्मक संस्थांशी स्वयंसेवकाचा निकटचा संबंध येत असतो.यातूनच त्यांचा नेतृत्व कौशल्य विकसित करण्याचा मार्ग सुकर होत असतो."स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी" जगलो पाहिजे ही उर्मी त्याच्या अंगीं येते. अर्थात त्यातूनच त्याला सामाजिक कार्य करण्याची प्रचंड ऊर्जा निर्माण करण्यास रासेयोची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे.
रासेयो द्वारा स्थानिक विषयाच्या अनुषंगाने जनजागृती फेरी आणि समाजासाठी लाभदायी ठरणारे उपक्रम हाती घेतले जाते.शासन स्तरावरील शेतकऱ्यांसह सर्वसामान्याच्या विविध लाभाच्या योजना ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य रासेयोद्वारे केले जाते.मानवी हक्क व लोकाधिकाराची माहिती समाजापर्यंत पोहोचविली जाते. वैयक्तिक व सामाजिक समस्या सोडविण्यासाठी स्वयंसेवकाचा मोठ्या प्रमाणात हातभार लागतो. जनतेच्या स्थानिक गरजा लक्षात घेऊन विविध उपक्रम हाती घेतले जातात.विविध रचनात्मक कार्य स्वयंसेवकाच्या श्रमदानातून केले जाते.त्यांचा थेट लाभ समाजाला होत असतो.शासनाचे विविध धोरणात्मक निर्णय आणि लाभाच्या योजना थेट सर्वसामान्य नागरिक पर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही रासेयोच्या माध्यमातून साधले जाते.
महाविद्यालयीन विद्यापीठीय युवकांनी लोकांसाठी रचनात्मक कार्य करणे अपेक्षित आहे.राष्ट्रीय सेवा योजना या कार्यात शतप्रतिशत यशस्वी ठरली आहे.आता ही योजना खऱ्या अर्थाने लोकचळवळ झाली आहे.स्वयंसेवकांनी निश्चित ध्येयाने प्रेरित होऊन आणि रासेयो कार्यक्रम अधिकारी तसेच रासेयोशी संबंधित पदाधिकारी/अधिकारी यांनीही तितक्याच जबाबदारीने योगदान दिल्यास रासेयोच्या उपक्रमाला अधिक गती मिळेल यात शंका नाही."माझ्यासाठी नव्हे तर तुमच्यासाठी"या ब्रीदवाक्यानुसार सर्वांना कार्य करण्याची प्रचंड ऊर्जा मिळो आणि रासेयो ची ध्येयधोरणे पूर्णत्वास जावो आणि या योजनेला खऱ्या अर्थाने लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होवो हीच या शुभदिनी सर्वांना मनःपूर्वक सदिच्छा व्यक्त करतो.........!
- -प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे
- कार्यक्रम अधिकारी,
- राष्ट्रीय सेवा योजना
- श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा
- ता.धामणगाव रेल्वे, जिल्हा अमरावती
- मोबाईल-९९७०९९१४६४
1 टिप्पण्या