Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

श्रीकांत कवळे लिखित अंतरंग मनाचे या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

  अलिबाग/रायगड प्रतिनिधी : नायब तहसिलदार श्रीकांत कवळे, यांच्या *"अंतरंग मनाचे"* या शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन श्रीकांत कवळे यांच्या मातोश्री, स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय पांडुरंग कवळे यांच्या पत्नी सत्यवती पांडुरंग कवळे यांच्या हस्ते तसेच श्रीपाल सबनीस (प्रख्यात जेष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ) यांच्या हस्ते याच पुस्तकाच्या ईबुकचे प्रकाशन सोहळा वेव्हज या उपहारगृह आणि पार्टी हॉल, अलिबाग येथे संपन्न झाला.

  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात जेष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस होते. त्यांच्या अध्यक्षीय आणि सर्वसमावेशक भाषणात पुस्तकाचे त्यांनी सुरेख समीक्षण करून लेखकाबद्दल गौरवोद्गार काढले. शारदा प्रकाशनाच्या कार्याचा गौरव करून डॉ. सबनीस म्हणाले की , " महाराष्ट्रात प्रकाशक अनेक आहेत, पण सेवावृत्तीने आणि निष्ठेने प्रकाशन संस्था चालविणारे संतोष लक्ष्मण राणे यांच्यासारखे प्रकाशक दुर्मिळ आहेत. त्यांनी 'अंतरंग मनाचे' हे पुस्तक प्रकाशित करून वाचकांना श्रीकांत कवळे या नव्या ताकदीच्या लेखकाची ओळख करून दिली आहे. लेखकाने काही कथा लिहिल्या असून त्या अतिशय उत्कंठावर्धक आहेत. श्रीकांत कवळे यांनी चित्रपट आणि मालिका सृष्टीत प्रवेश केल्यास सासू - सुना सोडून इतर विषय हाताळावेत. पटकथा आणि उत्कृष्ट संवाद लिहिण्याची लेखकाची क्षमता या पुस्तकातुन जाणवते. त्यांचे सर्वच लेख म्हणजे अलिबागच्या मातीचे अंतरंग आहे. प्रत्येक वाचकाला नवी उभारी देणारे हे पुस्तक संपूर्ण महाराष्ट्रात गाजेल असा विश्वासही डॉ. सबनीस यांनी व्यक्त केला.

  मनोगत व्यक्त करताना लेखक श्रीकांत कवळे म्हणाले, शासकीय सेवेत रोज अनेक माणसे भेटतात. या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपण हासू पाहू शकलो तर त्यासारखे पुण्याचे कार्य नाही. अशी अनेक पुण्यांची कामे करताना शब्द हाथ जोडून कधी उभे राहिले ते कळलेच नाही . विविध अनुभव एकत्र करून ते लिहीत गेलो. घरातील सर्वाना लेखन आवडत गेले. त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यातून सुंदर आणि वाचनीय पुस्तक आकाराला आले आहे."

  प्रकाशक प्रा. संतोष राणे यांनी आपल्या खुमासदार शैलीत तर शिरीष चिटणीस यांनी वैचारिक शैलीत कार्यक्रमास बहार आणला . यावेळी सौ.सबनीस यांच्या हस्ते लेखकाच्या पत्नी सौ. अरुणा श्रीकांत कवळे आणि त्यांच्या मातोश्रींचा सत्कार करण्यात आला. यावेळी अर्जुन गावंड , सई सचिन गावंड यांचीही भाषणे झाली.

  या कार्यक्रमास शिरीष चिटणीस ( म.सा.प. पुणे, पुणे शहर प्रतिनिधी ), प्रा. संतोष राणे, (प्रकाशक शारदा प्रकाशन ठाणे), डॉ. सुचिता पाटील (लेखिका, कवयित्री, निवेदिका आणि व्हाईस आर्टिस्ट), प्रसाद पाटील (जेष्ठ विधीज्ञ आणि माजी शासकीय अभियोक्ता रायगड) जयपाल पाटील (रायगड भूषण आणि आपत्ती व्यवस्थापन तज्ञ ), जगदीश कवळे (संचालक सावतामाळी पतसंस्था अलिबाग), शशिकांत उखळकर (डेप्युटी जनरल मॅनेजर आर.सी.एफ. थळ), संविधा जाधव ( मुख्याध्यापिका, आर.सी.एफ. स्कुल कुरुळ), अँड जयेंद्र गुंजाळ, (संचालक समर्थकृपा वृद्धाश्रम परहूर, अलिबाग), तसेच कवळे, म्हात्रे, गावंड, पाटील, मोरे, जैन परिवार, विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार आणि जिवलग मित्र परिवार इ. यावेळी उपस्थित होते.

  स्वातंत्र्यसैनिक स्वर्गीय पांडुरंग कवळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ कवळे कुटुंबीयांकडून अँड. जयेंद्र गुंजाळ यांना साहित्य संगम प्रतिष्ठान, अलिबाग यांच्या वतीने समाज भुषण तर कवी नवनाथ आनंदा रणखांबे साहित्य क्षेत्रातील उगवता तारा यांना साहित्य सेवा पुरस्कार प्रदान करून सामाजिक बांधिलकी दर्शविण्याचा परिपाठ घालून दिला.

  मेघा म्हात्रे यांनी ईश्वस्तवन आणि लेखक , कवी श्रीकांत कवळे यांची श्राद्ध ही कविता सुरेल आवाजात गाऊन रसिकांची मने जिंकून घेतली. डॉ. सुचिता पाटील यांनी त्यांच्या सुमधुर वाणीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून कार्यक्रम एक वेगळ्याच उंचीवर नेला तर या कार्यक्रमाचे आभार जगदिश कवळे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code