Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

वर्धा नदीत नाव उलटून 11 जण बुडाले

प्रशासनामार्फत युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरु 

अमरावती दि, 14 : अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथे वर्धा नदीच्या पात्रात बोट उलटून 11 जण बुडाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. आतापर्यंत नावाड्यासह तिघांचे मृतदेह सापडले असून इतर लोकांचा शोध बचाव पथकामार्फत युद्धपातळीवर सुरु आहे.

            वरुड तालुक्यातील बेनोडा शहीद ठाण्यांतर्गत झुंज धबधबा येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेले असतांना नाव उलटल्याची घटना घडली. गाडेगांव येथील मटरे कुटुंबातील दशक्रिया विधीला उपस्थित राहण्यासाठी त्यांच्या जवळचे नातेवाईक सोमवारी तेथे पोहचले होते. दशक्रिया विधी आटोपल्यानंतर आज सकाळी सर्वजण श्री क्षेत्र झुंज येथे पोहचले. या ठिकाणी नदीपात्रातच कमी उंचीचा धबधबा असून पर्यटक मोठ्या प्रमाणावर येथे गर्दी करतात. सकाळी दहाच्या सुमारास एका नावेतून महादेव मंदिराकडे जात असतांना नाव नदीपात्रात उलटली. नावेमध्ये 11 व्यक्ती होत्या. यामध्ये बहीण, भाऊ, जावई तसेच त्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. त्यापैकी वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुका येथील तारासावंगा गावातील पाच व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये अतुल गणेश वाघमारे (वय 25 वर्षे), वृषाली अतुल वाघमारे (वय 20 वर्षे), अदिती सुखदेवराव खंडाते (वय 10 वर्षे), मोना सुखदेवराव खंडाते (वय 12 वर्षे) तर आशु अमर खंडाते (वय 21 वर्षे) या व्यक्तींचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे.

            प्रशासनामार्फत बचाव व शोधकार्य सुरु असून नावेतील सर्वांना जलसमाधी मिळाल्याचे भीती व्यक्ती केली जात आहे.  अमरावतीवरुन जिल्हा शोध व बचाव पथकाच्या 20 जणांची चमू घटनास्थळी दाखल असून शोध कार्य सुरु आहे. तसेच नागपूर येथून राष्ट्रीय आपत्ती निवारण दल तसेच  राज्य आपत्ती निवारण दलाचे चमू तेथे दाखल झाली असून बुडालेल्या व्यक्तींचा शोध युध्दपातळीवर सुरु आहे. आतापर्यंत तिघांचे मृतदेह हाती लागले असून यामध्ये नावाड्यासह एक महिला आणि चिमुकलीचा समावेश आहे.

            घटनास्थळी उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, पोलीस उपविभागीय अधिकारी कविता फडतरे घटनास्थळी दाखल असून पोलीस, तहसिलदार, घोडेस्वार, ग्रामसेवक, तलाठी तसेच मत्स्य विभागाचे अधिकारी शोध व बचाव कार्यासाठी मदत करीत आहेत. तसेच स्थानिकांच्या मदतीनेही इतरांचा शोध घेणे सुरु आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांन आज दिली. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी शोध बचाव पथकाचे कार्य तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहे.

(छाया : संग्रहित)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code