अमरावती : आरोग्य विभाग, जिल्हा परिषदेचा महिला बाल कल्याण विभाग व युनिसेफ यांच्यातर्फे सुदृढ मेळघाट अभियानाचा दुसरा टप्पा कार्यान्वित करण्यात आला आहे. मेळघाटातील मातामृत्यू व बालमृत्यू रोखण्यासाठी धारणी व चिखलदरा तालुक्यांत सर्वेक्षण, तपासणी व आवश्यक उपचार ही प्रक्रिया मोहिमेच्या माध्यमातून राबविण्यात येत असून, तपासणी व उपचाराच्या प्रक्रियेपासून एकही व्यक्ती, बालक वंचित राहता कामा नये, असे सुस्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.
Thank you for reading this post, don't forget to subscribe!पालकमंत्र्यांच्या निर्देशानुसार मेळघाटात चिखलदरा व धारणी तालुक्यांतील सर्व गावे व पाड्यांचा समावेश करून मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनी दिली. मोहिमेसाठी सर्व वैद्यकीय यंत्रणेची बैठकही नुकतीच धारणी व चिखलदरा येथे झाली. कोविडकाळ लक्षात घेऊन दक्षतेच्या सूचना देतानाच मोहिमेचा उद्देश पूर्ण होण्यासाठी व्यापक व काटेकोर सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्यसेवक, आरोग्य सहायिका यांची सुमारे 77 पथके या अभियानासाठी नियुक्त करण्यात आले आहेत, असे डॉ. रणमले यांनी सांगितले.
मोहिमेत अंगणवाडीत जाऊन बालकांचे वजन घेणे, नंतर त्या बालकांचे ग्रेडेशन ठरवून सॅम व मॅम असे वर्गीकरण करणे, आवश्यक उपचार मिळवून देणे आदी प्रक्रिया होत आहे. ज्या बालकांना आरोग्य केंद्रात दाखल करण्याची गरज असते, त्यांना वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानंतर भरती करण्यात उपचार केले जातात. आवश्यकता असल्यास उपजिल्हा रूग्णालय , ग्रामीण रूग्णालय, जिल्हा रूग्णालय येथेही संदर्भ सेवा दिली जाते.
मोहिमेत बालकांची संपूर्ण तपासणी केली जाते. त्याचप्रमाणे, गरोदर माता तपासणी, स्तनदा माता तपासणी केली जाते. कुपोषणाला प्रतिबंध, आवश्यक तिथे उपचार व संदर्भ सेवा देऊन बालमृत्यू व मातामृत्यू कमी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातो. शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभही पात्र लाभार्थ्यांना मोहिमेच्या माध्यमातून मिळवून दिले जातात, असे डॉ. रणमले यांनी सांगितले.
कुपोषित असणा-या बालकांची तपासणी , दुर्धर आजारी असणा-या बालकांची तपासणी व उपचारांबरोबरच कुष्ठरोग ,क्षयरोग, मलेरिया, गलगंड आदींच्या निर्मूलनासाठी आरोग्यविषयक कार्यक्रमांची अंमलबजावणीही या माध्यमातून होते. पेयजल तपासणीचाही चिखलद-याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आदित्य पाटील व धारणीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री नवलाखे, आरोग्य विस्तार अधिकारी मनोहर अभ्यंकर यांच्यामार्फत मोहिमेचे संनियंत्रण होत आहे. सर्वेक्षण व तपासणीसाठी आलेल्या कर्मचा-यांना परिपूर्ण माहिती देऊन या मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जि.प.अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर, जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, डॉ. रेवती साबळे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ मनिषा सूर्यवंशी ,डॉ दिलीप च-हाटे यांनी केले आहे.