• Mon. Sep 25th, 2023

सत्तेत होरपळणारी सत्यवान माणसं..!

    मुळात कुणीही कविता का लिहितो ? नक्कीच छंद किंवा उगाच म्हणून नाही.मुळात कविता कागदावर लिहिणे इतकेच तिचा लिहिन्याशी जो काय असेल तो समंध,बाकी कविता आतून येते.पृथ्वीच्या पोटात खोल खोल उकळत असतो लाव्हा तसे काहीतरी कवीच्या अंतः पुरात उकळत असते आणि तेच बाहेर निघणे आणि पृथ्वीच्या देहावर पसरून राहणे स्वतःची राख करत अगदी तसेच कविता येणे आणि कागदावर उतरण्याची प्रक्रिया असते असे मला वाटते.विठ्ठल कुलट यांच्या कविताही याच मापदंडातून प्रसवल्या आहेत.कवी आणि कविता यांच्या मधात असतो तो संपूर्ण भवताल,समाज आणि त्याची कवितेच्या चष्म्यातून केलेली निरीक्षणे.विठ्ठल कुलट सर यांची कविता असाच भोवतीचा वर्तमान टिपत आली आहे.आपण जगतो तसे जगतात सारेच परंतु आपण ज्या समाजात जगतो आणि ज्या समाजातून आपण आलो आहोत त्यांच्या जगण्याची सारीच मूल्ये म्हणजे सुख दुःख ,चिंता,समस्या,हेळसांड ही आपलीच आहेत हे ज्यादिवशी जाणवते त्यादिवशी माणूस आणि कवी होण्याची प्रक्रिया चालू होते आणि नेमके याच ‘ज्या समाजातून आपण आलो त्याचे आपण देने लागतो’ वृत्तीने आणि अंतरंगात आणि बाह्य जगाच्या संघर्षातून ही मातीची कविता त्याच माणसांच्या मातीत रुजून मोठी झाली आहे.कवीचा भोवताल आणि जगणे यात शेतीमाती आणि त्यात राबणाऱ्या कुणब्याचे,वावराचे,मजुराचे जगणे अधोरेखित होत गेले आहे.प्रस्तुत कवितासंग्रहांचा प्रत्येक कवितेतून आणि ओळीतून ते स्पष्ट होते.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    हा शेतीत राबणारा ‘कृषिप्रधान?’ देशातला सत्तर टक्के समाज.ज्यानी स्वतः उपाशी राहून आपल्या आणि आपल्या पिलांच्या चोचीतली दाणे तुम्हा-आम्हा साठी नव्हे सर्व देश आणि जगासाठी दिली,आणि देतो आहे त्या शेतकर्याचे आणि त्याच्या जगण्याचे उतरतच गेलेला आणि चाललेला आलेख आपण कधी बघणार आहोत हा प्रश्न काविला पडला आहे.शेती,शेतकरी आणि शेतमजूर यांच्या जगण्याची वाताहात त्यांचा हरवलेला किनारा आणि त्यामागे असणारी आस्मानी आणि सुलतानी शक्ती यावर कवी अचूक बोट ठेवतो. कवीला मनोमन हे वाटत राहाते की हा जगाला घास देणारा माणूस आधी जगायला हवा अन्यथा येणार काळ फार बिकट असेल म्हणूनच कवी पोटतिडकीने ही व्यथा आपल्या कवितेतून तुम्हा-आम्हांसमोर आणि या व्यवस्थेसमोर मांडतांना दिसतो.

    एकीकडे निसर्गाचा होणार ऱ्हास, आधुनिकतेच्या नावाखाली वाढत चाललेली सिमेंटची आणि कारखान्यांची जंगले.भौतिकतेच्या नादात मानवीमूल्य विसरत चाललेला समाज आणि त्यामुळे होणारे पर्यावरणाचे,निसर्गाचे नुकसान आणि त्यातून लहरी आणि आपणच बेजबाबदार केलेला निसर्ग ज्यामुळे आज शेतीमातीचे आणि त्यात राबणाऱ्या कष्टकार्याचे जगणे हतबल आणि असाह्य होत चालले आहे.एकीकडे ग्लोबल होत जाणारे जग पोटाला घास पुरवणाऱ्या शेतकऱ्याला विसरत चालले आहे.जेंव्हा की त्याला माहित आहे की गुगल वरून भाकर डाउनलोड करता येत नाही तरीही आंधळ्याचे सोंग आणि भौतिकतेच्या पट्टी डोळ्यावर बांधून लोक मजेत जगताहेत.पण हा भ्रम तुटायला फार वेळ लागणार नाही.या जगाच्या पाठीवर आपण आलो तेंव्हापासून पोट आणि भूक हीच खरी निकड राहिली आहे आणि त्याच जिवंत रहाण्याच्या प्रक्रियेला आपण कनिष्ठ मानून चालणार असू तर हा आपलाच आत्मघात ठरेल.

    मातीत राबणारे शरीरे अशीच जर बांधावरही न आलेल्या व्यवस्थेच्या हातून चालणार असतील तर?असे असंख्य जीवंत प्रश्न कवीला पडतात.संग्रहातून ते ठाईठाई सापडतात.मुळात स्वतः शेतकऱ्याच्या घरात जन्म घेऊन आलेले आणि आज जगतांना येत असलेले जिवंत अनुभव या संग्रहात तितकेच जिवंत आशय आणि विषय घेऊन आले आहेत.आणि जे जगले,भोगले तेच लेखणीतून आले म्हणजे तेच अस्सल असते.कृत्रिमतेचा कुठलाही स्पर्श नसलेले अस्सल अनुभवच कवितेला वेगळेपण आणि जीव देतात.तीच कविता काळाच्या कसोटीवर खरी उतरते.कवीला याची शिदोरी आपल्या जगण्यातूनच मिळाली आहे.शेतकऱ्याच्या आणि कष्टकार्याच्या भोवतीच विठ्ठल कुलट यांची कविता फिरतांना दिसते कारण विदर्भासारख्या कोरडवाहु प्रदेशात असेच कोरडे जगणे ते जगले आहेत आणि आजूबाजूची हीच कोरडीठक्क हवा त्यांच्या लिखाणाला आणि कवितेला पोषक ठरली आहे.विदर्भाच्या आणि विदर्भाच्या मातीतल्या आदरणीय प्रा.विठ्ठल वाघ सरांसारख्या कवितेच्या बाप माणसाचा प्रदीर्घ सहवास आणि त्यातून अस्सल बोलीभाषेत,वर्हाडीत त्यांची कविता जन्माला आली आणि या आसमानी,सुलतानी आणि साऱ्याच शेतकरीघातक व्यवस्थेचा उहापोह आणि चित्रण या कवितेमधून आले आहे.’वर्हाडीबोलीभाषा’ ही या कवितेचे आणखी एक बलस्थान.कारण भाषा ही खूप महत्वाची बाब आहे.एक भाषा मरते तेंव्हा एक संस्कृती मरण पावलेली असते.त्यामुळे कुलट सरांची अस्सल भाषा आणि त्यातून आलेले अस्सल अनुभव वाचतांना आपल्यातल्याच आपण दुर्लक्षित केलेल्या प्रश्नाची,जगण्याची आणि जीवनाची नव्याने अनुभूती आल्याशिवाय राहत नाही.या कोरडवाहू जगण्याला हिरवे करण्याचे काम त्यांची कविता करते कारण ती हे सगळे प्रश्न आणि सगळ्या जाणिवा,वस्तुस्थिती आणि विरोधाभास सगळे थेट ज्या व्यवस्थेने या शेतकऱयांच्या आणि कष्टकऱयांच्या वाट्याला आणले आहे त्याच व्यवस्थेच्या दारात तितक्याच दमदारपणे नेऊन ठेवते.हक्काचे बोलते आणि हक्काचे मागते.वर्षानुवर्षे पिचत राहिलेल्या समाजाला न्याहक्काची संविधानिक जाणीव करून देत त्यासोबत रस्त्यावर उतरून हे हक्क खेचून आणण्याची भाषा करते .म्हणून ही कविता समाजाच्या बाजूने ठामपणे उभी आहे हे लक्षात येते.आणि शेवटी अभिव्यक्ती कशासाठी निव्वळ मनोरंजन म्हणून नक्कीच नाही आपली लेखणी आपण कशासाठी झिजवत आहोत आणि त्यासाठी कृतिशील आहोत का?या दोन गोष्टी जुळून आला म्हणजे अस्सल कलाकृती जन्माला येते.आणि तिचा साज आणि बाज कायम लढवय्या असतो.अगदी याच कृतिशील परिवर्तनाची मशाल घेऊन कुलट सरांची कविता या वाङ्मयीन परंपरेत दाखल होत आहे.

    अंगभूत असणारा भाषा आविष्कार,बोलीभाषेचा अत्यंत प्रभावी वापर आणि आपण लिहितोय कशासाठी याची नेमकी जान आणि भान या सर्व बाबी ह्या कुलट सरांच्या नव्हे त्यांच्या कवितांची बलस्थाने आहेत.शेतीशी आणि मातीशी समंध असणाऱ्या प्रत्येकाला ही कविता आपली वाटावी इतके जिवंत वर्तमानाचे चित्रण या संग्रहातून आले आहे.आणि या सर्वाचा कारणीभूत असणारी व्यवस्था आणि आपल्यातलीच माणसे काशी जबाबदार आहेत याची प्रचिती हा संग्रह वाचतांना ठाई ठाई येत राहाते.त्यांच्या कवितेतून शेतमाल आणि त्याच्या आधारभूत किमती आणि त्यासाठी असणारा संघर्ष आहे.मातीतला मानून मातीतच मिसळत असतांना, आणि ज्याच्या खांद्यावर संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था उभी असतांना त्याचे आणि समाजातल्या इतर वर्गाच्या जगण्याचे,राहाणीमानाचे बिघडलेले समीकरण आहे.एक वर्ग एकीकडे आलबेल आणि सुखवस्तू जगात असताना जगाचा पोशिंदा आणि एकूणच कामगार वर्गाची होणारी ससेहोलपट आणि जगण्यात निर्माण झालेली दरी याच्या मधात पूल बांधण्याचे काम कवितेने केले पाहिजे इतकी निस्वार्थ आणि तळमळीची,निर्मळ भावना घेऊन ही कविता जन्माला आली आहे.या सर्वांची चर्चा होत नाही असेही नाही पण ती फक्त फायद्याच्या काळातच,जसे “धूप”या कवितेत संधीसाधू राजकारणी,शेतकऱ्याच्या नावावर चाललेल्या किंवा चालविल्या जाणाऱ्या संघटना,आंदोलनापासून तर घोषणांपर्यंत चाललेले तुंबडीभरू राजकारण, याचाही सखोल विचार या कवितांमधून आहे,त्यात शेतकऱ्याला कायम मिळणारी सवतेची सावत्रपणाची वागणून(गाडरस्ते).हजारो योजना अगदी शेतीला समृद्ध आणि शेतकऱ्यांना गळफासातून वाचविण्यापर्यंत या योजना येतात.परंतु खऱ्या अर्थाने त्या पोहचायला हव्या तिथपर्यंत पोहचतात का?हा कळीचा मुद्दा आहे.या बोजवारा उडालेल्या योजनाही त्यांच्या कवितेत सक्षम पाने आल्या आहेत(ठणक) आणि या सर्व विदारक पार्श्वभूमीवरही सगळी आस्मानी,सुलतानी संकटे झेलत उभा असणारा त्याचा गाळात फसलेला संसार सांभाळत तो जगालाही सांभाळतो आहे(मातीच ओल)याचेही अप्रूप आणि अभिमान आहेच.पण या देश जगविणार्या नागरिकांना या देश्याच्या केंद्रस्थानी आणले पाहिजे.ही जगणे जगविण्याची या मातीची परंपरा टिकली पाहिजे हा उदात्त हेतू या कवितांमध्ये आहे.त्यासाठी या सर्व समाजाने एकत्रित येऊन खंबीरपणे लढा उभारला पाहिजे,आपल्या मालाचा भाव कुणी दुसरा ठरवितो असा जगातला एकमेव उद्योजक म्हणजे “शेतकरी”जीव जगविनारा दाता,त्यांनीच आता एकजूट होऊन ही परंपरा मोडीत काढत जगायला हवे.जीव देणे आपला धर्म किंवा कर्म नाहीच तर जीव जगविणे हा धर्म पाळत आपला जीव घेण्यार्याविरुद्ध बँड पुकारून येणाऱ्या पिढ्याचे जगणे सुकर करण्याचे काम केले पाहिजे हा संदेश देणारी कविता(कसणार्यानो) किंवा (सातबारा ) तुन प्रत्येक नोकरदार,ठेकेदार,किंवा सर्वच उच्ववर्ग यांचेही सातबारे,उत्पन्नाचे तपशील सरकारने किंवा व्यवस्थेने तपासले पाहिजे.ही दोन वर्गातली दरी शोधली पाहिजे.वर्तमानाचा चकाचक चेहरा आणि आतला गढूळलेला पोहरा उघड्या डोळ्यांनी आणि माणुसकीच्या चष्म्यानी बघायला हवा.”जय जवान जय किसान”मानणारी आपली व्यवस्था या दोन्ही ठिकाणी समजून उमजून दुर्लक्ष करीत आहे आणि आपणही त्याच समाजात राहून करंटे होत चाललो आहोत ही खंतही कवीला आहे.

    या सोबतच कवीने समाजातल्या सर्वच स्तरातल्या घटकांवरही लिहिले आहे.बुरसटलेले विचार,अंधश्रद्धा,गढूळ राजकारण,गावगाडा आणि त्याभोवती फिरणाऱ्या समस्या.देश स्वतंत्र होऊन इतका काळ लोटला तरीही गावातल्या पायाभूत सुविधा देखील अजून गावापर्यंत पोहचल्या नाहीत.गावात येणाऱ्या रस्त्यापासून तर वीज,आतले रस्ते,पिण्याचे,शेतीचे पाणी,गावआंतर्गत सगळ्याच बाबींचा अत्यंत बारकाईने आणि गंभीरपणे विचार या कवितांमधून आलेला आहे.यासोबत वर्तमान गलिच्छ राजकारणावर टीका आणि देशाची ढासळत चाललेली अवस्था या बद्दल ही परखड आणि सत्य या कवितांमधून आले आहे.धर्म,जात-पात यांच्या नावावर राजकीय आखाडे रंगवून फायदा उचळणार्या राजकारण्यांपासून तर यांचेच दलाल असलेल्या व्यापाऱ्यापर्यंतची सत्यस्थिती आणि बेगडी चेहरे फाडण्याचे काम कुलट सर यांची कविता करते.कारण ते या मातीतून आले आहेत.हा सर्व अन्याय, अत्याचार उघड्या डोळ्यांनी बघताना एक कवी म्हणून आणि एक माणूस म्हणून आलेला उद्वेग,चीड,राग आणि हे सर्व बदलायला हवेच ही प्रांजळ भावानाच कावीळ अभिवक्त व्हायला भाग पाडते.आणि हाच सगळा भवताल त्यांच्या लेखणीतून उतरला आहे.यासाठी महाराष्ट्राच्या उज्वल आणि समृद्ध इतिहास त्यांच्या समोर आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांपासून थेट गाडगेबाबांपर्यंत मग यात सगळेच महापुरुष,महामानव आहेत ज्यांच्या विचार आणि आचारांनी हा देश,हा समाज,आणि माझा बळीराजा सुखी होऊ शकतो यावरही सरांच्या कवितेतून प्रकाश टाकलेला आहे.या सगळ्यांना अगदी आपल्यासारख्या प्रत्येक लेखक,कवी,विचारवंत यांना अभिप्रेत असलेला समाज,आणि बळीराजा या संग्रहाच्या निमित्ताने उभा राहो आणि या इंडियातला भारत एकरूप होऊन त्याचा फक्त भारत होवो ही सदिच्छा.

    विठ्ठल कुलट सर यांच्या या संग्रहाला मनःपूर्वक शुभेच्छा आणि त्यांच्या या शब्दयात्रेचे स्वागत करून हा संग्रह येणाऱ्या काळात शेतकऱ्याच्या,कष्टकऱयांच्या आयुष्याचा धगधगता दस्तावेज ठरवून त्यातून या ओसाड जगण्यावर तलम हिरवळ येवो. आणि या देशाचा बळी पुन्हा राजा होऊ दे इतकी रास्त अपेक्षा ठेऊन हा दस्तऐवज आपल्या हाती सुपूर्त करतो.

    प्रस्तावना
    डॉ विशाल इंगोले
    कवितासंग्रह-
    सत्तेत होरपळणारी सत्यवान माणसं
    कवी- विठ्ठल कुलट

    *………………………………….*

    -डॉ विशाल इंगोले
    सदस्य -महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
    राम नगर,लोणार(सरोवर)
    जि-बुलढाणा-४४३२०२
    संपर्क-९९२२२८४०५५

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,