• Thu. Sep 28th, 2023

“मरणासन्न ह्यातीची आर्जवे :समकालीन कवितेत उठून दिसणारी कविता”

  ▪️”कविता ही मानवी अस्तित्वाची त्याच्या जिवंतपणाची जाणिव आहे.ती एक वाड्रमयीन घटना असली तरी ,वर्तमानाचा हुबेहुब आलेख प्रस्तूत करीत भविष्याचा वेध घेताना ,भूतकालीन संकल्पनांना मोडीत काढत अथवा परिष्कृत करीत तिचे अस्तित्व ती अबाधितपणे रूजू करीत असते.म्हणजे,ही घटना त्रिकालाबाधीत सत्य म्हणतात तशी शुध्द स्वरूपाची ,कलास्पर्शी, नितळ,नुतन जाणिव आहे.अशीच नुतन जाणिव घेऊन काव्यप्रातांत दाखल झालेला आहे.डाॅ.चंदू पवार यांचा नवा कोरा,करकरीत, दर्जेदार, आशयसंपन्न काव्यमय दस्तऐवज “मरणासन्न ह्यातीची आर्जवे..!”

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  ▪️कवी डाॅ.चंदू पवार सर यांनी कवितासंग्रहात चार विभागात विभागलेला आहे.
  1)व्यथेची आर्जवे
  2)मरणासन्न ह्यात
  3)ठिगळातल्या जखमा
  4)गळफासातल्या माना
  ▪️पहिलीच कविता आहे….आर्जवं
  काही जाचक रूढी -परंपरांच्या
  जीवघेण्या प्रथात
  तर काही दुःख,वेदना,अन्याय अत्याचारात
  निपचित पडलेल्या आहेत
  समाजाच्या ओसरीत
  मरणासन्न अवस्थेत आजही…

  विद्रोही आशयाची दर्जेदार कविता म्हणून या कवितेचा प्रथम उल्लेख करणे आवश्यक आहे.जाचक रूढी,परंपरा …काही जीवघेण्या प्रथात अजूनही सडत आहे.त्यांची दखल पाहिजे त्याप्रमाणात घेतलेली नाही.ही खंत कवी मोठ्या त्वेशाने आपल्या कवितेत व्यक्त करतो.कुणीतरी आधार देईल…या आशेने परजीवी वेली आधार शोधतात..पण आपणाला स्वतःचा मार्ग स्वतःच निवडावा लागेल..जाचक रूढी ,परंपरा यांना त्यागून आपले मरणासन्न जीवन आशेच्या फुलाने फुलवावी लागेल…तेव्हाच आपण खरी प्रगती करु..!

  ▪️केवळ पाझर फुटावा इथल्या निर्दयी समाजाला म्हणून मरणासन्न ह्यातीची ही शब्दरूपी आर्जवे आहेत.दमदार व दर्जेदार अशी अभिव्यक्ती कवीने केलेली आहे.
  काही निष्पाप जीव
  केविलवाणी आर्जवे करत
  मागत असतात पोटात ढकलल्यावाणी
  उरला -सुरला दाणापाणी…

  पीडा,वेदना,दारिद्र्य, वंचना इ.प्रभावीपणे मांडणारी कैफियत आहे.काही पांढ-या कपाळाची अभागी,अनाथ लेकरे …कष्टकरी माय…काही हात राबत असतात…या सगळ्या संवेदना,वेदना,भावना…साहेबांना काही फरकच पडत नाही…ही आतड्याची पीड साहेबांना नाही कळायची…वास्तव पकडणारी कविता…!

  दहा-वीस रूपये
  हमालांची – मजुरांची डुबवणारी
  काळीज रस्तानं
  उभ्या उभ्या दलालीत विकणारी
  दलाल माणसं
  पहारीने मुर्दाड दगडावर घाव घालावे,
  तसे घाव घालतात
  कोवळ्या लेकरांच्या सजीव उमेदी
  बिनधास्त, बिनदिक्कत,
  बेमुवर्तपणे, आरपार…

  कवी हबीब भंडारे सर ‘जगण्याचे संदर्भ विकणा-या कष्टाळू माणसांच्या कविता ‘या कवितेची नाळ डाॅ.चंदू पवार यांच्या ‘पीळ ‘या कवितेशी तंतोतंत जुळणारी आहे.दोन्ही कविता वेदनेच्या आहेत…दोन्ही कवितेत शोषण आहे…गरिबांचे,पिडितांचे, वंचितांचे.दोन्ही ठिकाणी साहेब आहे.गो-या कातडीचा,दुस-या ठीकाणी दलाल…शोषण करणे हाच उद्देश. कामगार, कष्टकरी यांच्या जिवितांचे काही देणी घेणी नसलेली दगडी मनाची मुर्दाड मन असलेली माणसं…दोन्ही ठिकाणी अतिशय संवेदनशीलतेने रेखाटलेली आहेत.

  खाटकाच्या दावणीचं जनावर
  जसं विव्हळतं आतल्या आत
  तसं मला लग्नाच्या खुट्याला बांधून
  दोर दिली
  व्यसनांध आणि वासनांध
  नव-याच्या हाती…

  खरे आहे.स्त्रियांचे जीवनच नवरा नावाच्या हातामध्ये असते.यंत्रवत ..व्यसन आणि वासना यांच्या संगतीने ..तो कधीही उपभोग्य वस्तप्रमाणे चुरगाळतो…हे सत्य कवीने अतिशय संवेदनशीलतेने मांडलेले आहे.त्याबद्दल कवी डाॅ.चंदू पवार सर यांचे मनापासून अभिनंदन..!

  खरंतर
  चाकांची काहीच चुक नाही
  कृतघ्न माणसं आम्ही
  अख्खं आयुष्य वेचून
  आपलं सर्वस्व देऊन,
  अंगा-खांद्यावर जाणिवेचं
  ओझं लादून देखील,
  कितीतरी खंगत पडलेत मरणासन्न
  आमच्या अवतीभोवती

  बैलगाडी वर भाष्य करणारी ही कविता आहे.चाकांनी इमाने इतबारे शेतक-यांची सेवा केलेली आहे.अशीच माणसं अवतीभोवती खितपत पडलेली आहे.मरणासन्न अवस्थेत..!कवीचे निरीक्षण…कवीचे परीक्षण…कवीचे समीक्षण…वाखाणण्याजोगे आहे.

  इतरांच्या वेदना,दुःख, अडचणी
  का आमच्या मनाला बोचू नये?
  तो दगड उचलून दूर फेकून द्यायचं
  शहाणपण
  का आम्हाला सुचू नये?

  सुंदर अशी अभिव्यक्ती..!दुःखाचा दगड उचलून फेकून द्यायचं शहाणपण यायला आपल्यात प्रथम माणुसकी हे मूल्य रूजविले पाहिजे.यासंदर्भात मला जेष्ठ कवी डाॅ.यशवंत मनोहर सर यांची कविता आठवते..!

  बंधो..!
  अगतिकांच्या आसवांसाठी
  आपणाला डोळे होता आले पाहिजे
  जखम कुणाचीही असो
  आपणाला औषध होता आले पाहिजे.

  कवी डाॅ.चंदू पवार सर व डाॅ.यशवंत मनोहर सर यांची धडपड आहे…”कुणाचेही औषध होण्यासाठी..”ही धडपडच आपणास ‘माणुसकीचे मूल्य’ शिकविते.आपणाला माणुसकीकडे वाटचाल करावयास लावते.

  “कोणत्याही कवीचा अगर कवितेच्या संदर्भात विचार करताना आपण अनुभवविश्वाला विचार करतोच किंवा आशयसुत्रे कोणती आहेत हे तपासून पाहतोच;परंतु एवढे करूनही कवितेचा अर्थ अगर अनुभव सर्वार्थाने आपल्या हाती येईलच असे नाही.कारण कवी जो अनुभव सांगत असतो,तो काही सरळ रेषेत सांगता येतोच असे नाही.कारण अनुभव सांगत असतांना त्या त्या कवीचे संपूर्ण व्यक्तीमत्वच त्या काव्यनिर्मिती प्रक्रियेत गुंतलेले असते;म्हणजे असे की त्या त्या कवीवर झालेले संस्कार, त्यांच्यावर पडलेल्या विचारवंतांचा प्रभाव ,अगर त्याने पाहिलेले जग.त्याच्या व्यक्तीमत्वात मूरून गेलेले असते आणि निर्मितीच्या क्षणी ते सर्वार्थाने प्रगट व्हायला लागते.म्हणजे असे की जो मुळ अनुभव असेल तो तर प्रगट होतोच:पण तो प्रकट करताना त्या व्यक्तीमत्वाचे काही रंगही त्यावर प्रक्रिया करीत जातात…म्हणजे अशावेळी हे व्यक्तीमत्व केवळ साधन राहत नाही.त्या व्यक्तीमत्वाचा रंगाप्रमाणे तो तो अनुभवही वेगवेगळे रूपे धारण करीत जातो”.

  मुलांनो!
  काळ थांबत नाही कुणासाठी,
  आज वेळ त्यांच्यावर आहे,
  न जाणो उद्या तुमच्यावरही येईल…
  कारण
  पेराल तेच उगवते…
  मी तेव्हाही असेल सेवेत,
  का तर?
  मला न तुम्हा माणसासारखं वागता येत नाही…

  वृध्दाश्रम ही नितांत सुंदर अभिव्यक्ती आहे.त्याबद्दल कवी डाॅ.चंदू पवार सरांचे अभिनंदन…!वृध्दाश्रम ही मुलाने आणलेली एक जाचक प्रथा आहे.आपणही म्हातारे होणार आहे.याची जाणीवच आजची मुले ठेवत नाही.ती जाणिव ठेवून आचरणात आणली तर समाजातून वृध्दाश्रम निकाली काढल्या जातील…यात शंका नाही..! यावेळेस मला सौ.प्रीती वाडीभस्मे यांची ‘मी वृध्दाश्रम बोलतोय’ही कविता आठवते.

  मनातली सल खोलतोय…
  मी वृध्दाश्रम बोलतोय…
  ओस पडलो मी,तर आनंद मला!
  नम्र विनंती सा-या मुलांना
  आटू नका देऊ मायेचा पान्हा
  आई बाबांचे ॠण कधी ना फिटे
  आपल्या सुखांसाठी सदा ते झरे

  आपल्या आईवडिलांनी आपणाला तळहातावरील फोडाप्रमाणे जपलेले आपण विसरतो…आणि वडिलांना ..आईला वृध्दाश्रमात पाठवितो.ही आधुनिक संस्कृती चांगली नाही…दोन्ही कवितेचा आशय समान असल्याने हा उल्लेख करावा लागला.

  एकूण 75 कविता ‘मरणासन्न ह्यातीची आर्जवे’ या कवितासंग्रहात आहेत.सर्वच कविता मनाचा ठाव घेणा-या आहे.ग्रामीण संदर्भ, परंपरागत शोषण, दैन्य ,दुःख, दास्य,इ.भावना कवीने ज्या दमदार पद्धतीने व्यक्त केल्यात….त्यासाठी कवीचे मनापासून अभिनंदन..!

  प्रस्तावना डाॅ. संजय बोरुडे सर यांची आहे. ते म्हणतात-“अशा या डाॅ. चंदू पवार यांच्या सामाजिक भानाचा अविष्कार करणा-या कविता चुकूनही पूर्वसुरींची री ओढताना दिसत नाहीत.रोमॅण्टिसिझम, भाबडा आशावाद, प्रतिकांची चमत्कृती यात त्यांची कविता अडकत नाही.ही त्यांची जमेची बाजू आहे.”

  ब्लर्ब मा.देवा झिंजाड यांचा आहे.ते म्हणतात-“समकालीन कवीची ताकद प्रचंड आहे.ते चंदू पवार ह्यांच्या कवितेच्या ओळीतून जाणवत राहते.”

  ज्ञानसिंधू प्रकाशन, नाशिक यांनी अतिशय मेहनत घेऊन व काळजी घेत हा कवितासंग्रह प्रकाशित केलेला आहे.आकर्षक मुखपृष्ठ-चित्रकार ज्ञानसिंधू प्रकाशन यांचेच आहे.नाजूक असा फाॅन्ट कवितेसाठी वापरला आहे.आई-वडील यांना हा कवितासंग्रह अर्पण केलेला आहे.अधिक अभ्यास केल्यास वाचकांना सुंदर अशा कविता वाचावयास मिळेल…यात शंका नाही.पहिल्या कवितासंग्रहासाठी कवीचे मनापासून अभिनंदन..!

  ▪️संदर्भ ग्र॔थ
  ▪️नवदोत्तर स्त्रीवादी काव्य
  डाॅ.निलिमा गुडी
  सर्वधारा, वर्ष 11वे,
  जा,फे,मा.2017,पृ.59
  ▪️जगणं विकणा-या माणसांच्या कविता
  कवी:हबीब भंडारे
  गोदा प्रकाशन, औरंगाबाद
  2021,पृ.114
  ▪️शब्दफुले
  सौ.प्रीती वाडीभस्मे
  परिस प्रकाशन, पुणे,
  2021,पृ.58
  ****************
  ▪️कवितासंग्रह:मरणासन्न ह्यातीची आर्जवे
  ▪️कवी:डाॅ.चंदू पवार
  ▪️प्रकाशक-ज्ञानसिंधू प्रकाशन, नाशिक
  ▪️पृष्ठ:96
  ▪️मूल्य:100/_
  ****************
  ▪️समीक्षक प्रशांत एन.ढोले
  ▪️श्रावस्ती नगर,
  पो-सावंगी (मेघे),ता.जि.वर्धा-▪442107
  ▪️संवाद:9923308638

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,