• Mon. Sep 25th, 2023

मनाला भुरळ घालणारा गझल, कवितांचा संग्रह ‘चंदनाची फुले’

    ‘चंदनाची फुले’ हा चंदनाजींचा गझल संग्रह हाती येऊन बरेच दिवस निघून गेले.या संग्रहावर साहित्य क्षेत्रातील मोठ मोठ्या नामवंत गझलकारांनी या संग्रहाचे रसग्रहण केल्यावर आपण यावर काय लिहावे याच प्रश्नाने मन दडपणात होते.जेवढ्या प्रेमाने चंदनाजींनी संग्रह पाठवला तेवढ्याच जबाबदारीने त्यावर अभिप्राय देणे गरजेचे होते,परंतू त्या संग्रहावर लिहायला आपण कितपत योग्य ठरू हा यक्ष प्रश्न होता.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    वाचते मी मला कैकवेळा तरी
    गूढ कादंबरी चंदनाची फुले

    ‘गूढ’ नेमका हाच अनुभव संपूर्ण गझलसंग्रह वाचतांना येतो. या गूढाचे काहीतरी रहस्य असेल हे जाणून घेण्यासाठी त्यांना प्रश्न केला तर त्या म्हणतात ‘मला नाही माहीत, मी सहज सुचेल ते लिहीत असते’!शब्दांच्या या सहजतेनेच एक एक शेर रसिकांना भुरळ घालत असतो आणि वाचणारा नकळत त्यांच्या शब्दांच्या प्रेमात पडतो.

    असा अक्षरांचा लळा चंदनाला
    जसा व्यापतो अर्थ आकाश सारा

    ‘चंदना म्हणजे गझल’ की ‘गझल म्हणजे चंदना’ असा प्रश्न पडायला लागतो… शब्दांवर भरभरून प्रेम करणाऱ्या चंदनाजी! निसर्गाचा एक नियम आहे, तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला भरभरून मिळेल.यामुळेच की काय हरेक शेर शब्दफुलांनी नटलेला असतो आपली वेगळी लय सांभाळत शब्दांवर असलेल त्यांच अतोनात प्रेम त्यामुळेच त्यांचा त्यांचा प्रत्येक शेर सहजतेने बहरून येतो, हे विशेष! त्यामुळेच की काय गझल खुद्द म्हणते, “तुझ्यात आहे निवास माझा” हे तेवढेच खरे आहे याची प्रचिती संग्रह वाचतांना आल्याशिवाय राहत नाही.नियमांच्या बंधनातराहून मनातील भाव शब्दबद्ध करणे हे जिकरीचेच, त्यात दोन ओळीत तुम्हाला जे सांगायचे आहे ते सांगता आले तरच तो शेर मुक्कमल होतो आणि रसिकांची उस्फुर्त दाद मिळवून जातो.

    सुखाकारणे त्यागतो माय बापा
    कसा धाडतो पुत्र वृद्धाश्रमाला

    अभंग, किर्तनातून जो विषय पटवून द्यायला संतांनी जिवाचे रान केले तोच विषय नेमक्या दोन ओळीन मध्ये किती प्रभावीपणे हा शेर सांगून जातो.आयुष्यभर लेकरांसाठी काबाड कष्ट करणाऱ्या उत्तरार्धात शेवटी वृद्धाश्रम दाखवणाऱ्या मुलांवर चपराक ओढणारा हा शेर.. समाजातील दोषांवर अलगद बोट ठेवणारा हा शेर आपली छाप सोडून जातो.चंदनाजींच्या गझलांची विशेषतः म्हणजे कोणताही शेर हा आधीच्या शेराची,खयालाची पुनरावृत्ती वाटत नाही, प्रत्येक शेर हा आपला वेगळेपणा जपत असतो.

    कोरते मृत्यू कपाळी शेवटी
    थांबते अनुस्वार आहे जिंदगी..

    जीवन म्हणजे काय? याचे उत्तर हवे असेल तर ‘जिंदगी’ ही गझल रसिकांनी वाचायला हवी.. आयुष्य काय आहे? कसे आहे याचे सुंदर वर्णन त्या आपल्या गझलमधून किती सहजतेने करतात.जीवन म्हणजे खरंच सोपे नाही.जीवनाच्या वाटेवर क्षणाक्षणाला एक नवीन आव्हान स्विकारावे लागते,संघर्ष हा कुणालाही सुटलेला नाही.सुखाच्या शोधात दु:ख हे भोगावेच लागते तेव्हाच जगण्याची खरी गोडी कळते.या सुखदुःखाला प्रतिकात्मक शब्द वापरतांना “लोणच्याचा खार..” हा सुंदर शब्द त्या चपखल पणे वापरतात.विचारांची सकारात्मक्ता अतिशय महत्वाची,संकटावर विजय मिळवायचा असेल तर मनातील भाव सकारात्मक भाव गरजेचे आहे.जगण्याच्या या शर्यतीत जो थांबला तो संपला शेवटी मृत्यू हा ‘अनुस्वार’ लावून जातो हे तितकेच खरे!

    मनास माझ्या ठेच लागुनी मी कोसळता
    सावरणारी आई होते तुझी आठवण

    गतकाळ हा मानवी जीवनाचा निर्मळ आरसा, चांगल्या वाईट क्षणांचे संचित म्हणजे तुमच्या आठवणीं.भविष्याची पायवाट सुखकर करण्यासाठी, नकळत झालेल्या काही चुकांना परत टाळता यावे यासाठी जुने क्षण मार्गस्थ ठरतात तसेच सुखाच्या क्षणांनी आयुष्य परत सुगंधीत करतात.त्या आठवणीच लेकराला मायेची ऊब देऊन वाढवणाऱ्या आई सारखा सांभाळ करतात,हे समजावून सांगायला हा शेर लाख मोलाचा ठरतो.

    मृत्यू सोबत जन्म घेतला,धावत होते तरी निरंतर
    दोनच क्षण ते जपता जपता आयुष्याचे लक्तर होते

    आदरणीय घन:श्यामजी धेंडे सरांचा एक सुंदर शेर आठवलाय..

    “सवे अपुल्या जन्मलाय तो जुळ्या प्रमाणे,
    त्या मृत्यूला डरू नको हो ह्यावयामध्ये..”

    जे जन्मले ते नष्ट होईल हे अबाधित सत्य आहे,ते नाकारता येणार नाही. एका अनाकलनीय निर्मिकाने जन्म मृत्युची साखळी आपल्या हाती राखून ठेवलेली आहे.आयुष्यभर आपण जन्माचा उत्सव आणि मरणाचे दु:ख साजरे करत असतो. सुखाच्या शोधात निरंतर धावणे हा मानवी स्वभाव आहे. माणसाची असमाधानी प्रवृत्ती त्याला स्वस्थ बसू देत नाही.या धावपळीत बऱ्याचदा वाट्याला आलेले सुखाचे क्षण ही तो गमावून बसतो याची जाणीव जेव्हा होते तेव्हा ती वेळ निघून गेलेली असते.’चंदनाची फुले’ हा गझल,कवितांचा संग्रह खूपच सुंदर आहे यात जराही दुमत नाही.गझलान सोबतच या संग्रहातील कविता ही मनाचा वेध घेतात.पुस्तक असो वा संग्रह त्याला साहित्य क्षेत्रातील पुरस्कार मिळणे हा त्या पुस्तकाचा किंवा संग्रहाचा हक्कच असतो मग लिहीणा-याची अपेक्षा असो वा नसो! परंतू जेव्हा म.भा.चव्हाण सारखे जेष्ठ साहित्यिक असो किंवा आ सुधाकर कदम सरांन सारखे आद्य गझल गायक जेव्हा अशा संग्रहाची भरभरून स्तृती करतात तेव्हा मात्र कुठल्याही पुरस्काराची अपेक्षा शिल्लक राहत नाही,ती शब्दसुमनेच एक मोठा पुरस्कार असतो असे मला वाटते.

    चांदण्याने धाडलेले पत्र आहे चंदना
    हासणारे, लाडके नक्षत्र आहे चंदना

    या संग्रहाला मनापासून शुभेच्छा देत मी शब्दांना पूर्णविराम देतो.. काही चुका झाल्या असतील तर त्या मोठ्या मनाने पदरात घ्याव्या ही प्रांजळ अपेक्षा..!

    शरद बाबाराव काळॆ
    ९८९०४०२१३५
    धामणगांव रेल्वे
    चंदनाची फुले- कविता-गझलसंग्रह
    कवयित्री चंदना सोमाणी 8983898810
    पृथ्वीराज प्रकाशन
    मुल्य -150

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,