अनंत पावलांना दिशादर्शक ठरल्यात
मानवतेच्या विचारांच्या
अजिंठा ,वेरुळ आकार घेऊ लागल्यात
कोंडलेल्या श्वासांसाठी
मुक्त केल्यात दाही दिशा
दुःखमुक्त जगण्यासाठी
पल्लवित झाल्यात आशा
तुम्ही दावलेल्या पायवाटांचे
आज आमरस्ते झाले
गावकुसाबाहेरचे रस्ते आता
गावातील चौकात आले
दीक्षाभूमी,चैत्यभूमी,बौद्धगयेचा
नित्याने प्रवास घडला पाहिजे
डोक्यात घेऊन येता प्रेरणा
परिवर्तन जगण्यात दिसले पाहिजे
प्राणपणाने जपला पाहिजे
सूर्यकुळाचा संस्कृती वारसा
या मातीत पिंपळ जपण्याचा
दिला पाहिजे आम्ही भरवसा
रस्ता सोडून चालणा-यांनो
जरा त्या पावलांनाही विचारा
दिले बळ ज्या विचाराने
त्यास आचरणात तरी प्राचारा
– अरुण विघ्ने
रेखाटन : संजय ओरके सर