(शिक्षक साहित्य संघ अमरावती शाखेतर्फे ऑनलाइन व्याख्यानमालेचा उपक्रम)
अमरावती :”पुराणकथा म्हणजे पुराणातल्या कथा यासाठी मिथक हा शब्द प्रचलित आहे. मिथके हा कथेचा प्रकार असून त्याच्याशी संबधित दंतकथा,आख्यायिका,लोककथा इ.प्रकार आहेत. परंपरेने चालत आलेल्या आख्यायिकांना दंतकथा म्हणतात. मिथक व दंतकथा यात फारसा फरक नाही. मिथके ही विधिशी संबधित असतात.मिथक कथा या सर्व धर्मांमध्ये असतात.मिथके जेव्हा साहित्यात अवतरतात तेव्हा त्याचे रुपांतरण प्रतिमांमध्ये होते.यावरुन मिथके व प्रतिमा याचा दृढ संबंध आहे.प्रतिमा वापरताना त्या कथा आकर्षक होतात पण सत्यापासून त्या दूर जातात.
पुराणकथांमधील बऱ्याच गोष्टी चमत्कारिक वाटतात.भाषा विज्ञानातून मिथकाचा अभ्यास केल्यास प्रभावी होतो.पुराणकथांचा अर्थ सर्वांनी समजून घेतला पाहिजे.”असे विचार महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक,कवी,लेखक व विचारवंत प्रा.डॉ.अशोक राणा यांनी व्यक्त केले.ते शिक्षक साहित्य संघाच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षक साहित्य संघ अमरावती शाखेतर्फे आयोजित ऑनलाईन व्याख्यानाचे पाचवे पुष्प गुंफताना प्रमुख वक्ते पदावरून “पुराणकथांचा अर्थ”या विषयावर बोलताना व्यक्त करीत होते.
या ऑनलाईन व्याख्यानमालेचे अध्यक्ष शिक्षक साहित्य संघाच्या मराठवाडा विभागाचे विभागीय अध्यक्ष प्रा.ज्ञानेश्वर हंडरगुडीकर, प्रमुख व्याख्याते प्रा.अशोक राणा, प्रमुख अतिथी शिक्षक साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री जयदीपभाऊ सोनखासकर होते.अध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर हंडरगुडीकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून,”प्रा .अशोक राणा यांच्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून मिथक म्हणजे काय? हे कळले.तसेच सूर -असूर,दैत्य-दानव याचा अर्थही कळला.प्रा.राणा आज महाराष्ट्रातील फार मोठे संशोधनात्मक लेखन करणारे वैचारिक साहित्यिक आहेत”असे विचार व्यक्त केले .प्रमुख अतिथी जयदीपभाऊ सोनखासकर यांनी “परिवर्तनवादी लेखन करुन समाज जागृती करणार्या प्रा.अशोक राणा यांच्यासारख्या विचारवंत मार्गदर्शकाची शिक्षक साहित्य संघाला गरज असल्याचे प्रतिपादन केले.”
या व्याख्यानाचे काव्यमय बहारदार संचालन प्रा.अरुण बुंदेले यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षक साहित्य संघाचे जिल्हाध्यक्ष अतुल ठाकरे यांनी केले. या व्याख्यानाला अमरावती, नागपूर,अकोला,बुलढाणा,यवतमाळ,पुणे व मराठवाडा विभागातील शिक्षक साहित्य संघाच्या पदाधिकर्यांनी व साहित्यिकांनी ऑनलाईन उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.