Header Ads Widget

बाजारपेठ सातही दिवस खुली

    अमरावती : कोरोना प्रतिबंधासाठी लागू संचारबंदीत शिथीलता आणत जिल्ह्यातील आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, शॉपिंग मॉल, अत्यावश्यक, जीवनावश्यक व बिगर जीवनावश्यक आदी सर्व प्रकारची दुकाने आठवड्याचे सातही दिवस रात्री १० पर्यंत खुले ठेवण्यास मुभा देण्यात आली असून, तसा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्ष जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी जारी केला.

    बाजारपेठ खुली करण्यात आली आहे. मात्र, दक्षतेचा विसर पडू नये. कोविडची तिसरी लाट रोखण्यासाठी मास्कचा वापर, सामाजिक अंतर, सॅनिटायझर, लसीकरण, टेस्टिंग व आयसोलेशन या पंचसूत्रीचा वापर करण्याचे आवाहन पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर व जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.आदेशानुसार, दुकानात काम करणा-या सर्वांचे कोविड प्रतिबंधक लसीच्या दोन मात्रा पूर्ण होणे आवश्यक करण्यात आले आहे. दुसरी मात्रा झाल्यावर १४ दिवसांचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक आहे. सर्व उपाहारगृहे, बार, हॉटेल्स ५० टक्के क्षमतेने रात्री १० पर्यंत खुले असतील, तथापि शेवटची प्रत्यक्ष ऑर्डर नऊ वाजता घ्यावी, असे आदेश आहेत. पार्सलसेवा मात्र २४ तास सुरू राहील. आचारी, कामगारांचे लसीकरण, सोशल डिस्टन्स, मास्क, स्वच्छता आदी बाबी बंधनकारक आहेत.

    व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर्स, वेलनेस सेंटर, स्पा आदी ५० टक्क्यांच्या क्षमतेसह रात्री १० पर्यंत सुरु राहतील. बाह्य मैदानी खेळ नियमित सुरु राहतील. आंतरमैदानी खेळांत बॅडमिंटन, स्क्वॅश, पॅरलल बार, मलखांब अशा खेळांसाठी केवळ २ खेळाडूंच्या मर्यादेत सुरू ठेवता येईल.कार्यालये खुली करण्यात आली आहेत. तथापि, त्यांना गर्दी टाळण्यासाठी सत्रनिहाय काम करण्याची सूचना आहे. खासगी कार्यालयांना वेळेच्या व्यवस्थापनासाठी २४ तासांची मुभा देण्यात आली आहे. अशा सत्र व्यवस्थापनासाठी २५ टक्के उपस्थिती मर्यादित करणे आवश्यक राहील.

    विवाहसोहळ्यांसाठी बंदिस्त सभागृहात आसनक्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती (जास्तीत जास्त १०० व्यक्ती), तर खुले प्रांगण किंवा लॉनमध्ये जास्तीत जास्त २०० व्यक्तींना मुभा आहे. चित्रपटगृहे, बहुविध चित्रपटगृहे, धार्मिक स्थळे, प्रार्थनास्थळे, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, रॅली आदी पुढील आदेशापर्यंत बंद आहेत.अन्य राज्यातून जिल्ह्यात येणा-या प्रवाश्यांना ७२ तासांपूर्वीचे आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र आवश्यक आहे अन्यथा १४ दिवस विलगीकरण आवश्यक राहील. निसर्ग पर्यटन व जंगल सफारीअंतर्गत कोर व बफर क्षेत्रातील सफारी सुरु ठेवण्यास मुभा आहे. सर्व वैद्यकीय, पशुचिकित्सा सेवा, औषधालये, दवाखाने २४ तास सुरू राहतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या