Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

असाही एक नारायण...

💐आज १६ ऑगस्ट म्हणजे कविवर्य नारायण सुर्वे यांचा आज स्मृतीदिन💐अभिवादन...!
 - डॉ.प्रतिभा जाधव
----------------------------------
आई बापाला आक्रंदत,आळवत
रस्त्याच्या कडेला मांसाचा गोळा रडत राहिला
असा एक नारायण मी रस्त्यावर पाहिला!

परिस्थितीचे चटके सोसत...
वेदना, यातना सारं पचवत
नव्या दमानं जगत राहिला
शब्दांचा आधार, कवितेचं शस्त्र घेऊन 
तुझा संघर्ष सुरु झाला....!

विचार तुझे श्रमिकांच्या कल्याणाचे....
गड्या तुझे 'विद्यापीठच' वेगळे,
सतत बळ ओतणारे स्वाभिमानाचे, अस्तित्वाचे....

तुझ्या लेखणीतुन जेव्हा मार्क्स अवतरला
खरं सांगतो सुर्वे मास्तर
खरा मार्क्स आम्हाला तवाच कळला....
'भाकरीचा चंद्र' शोधतानाच्या तुझ्या आयुष्याच्या बरबादीने
आमचे डोळे उघडले
तेव्हापासून चतकोर भाकरही खातो आम्ही आनंदाने.....

तुम्ही पाचांनी एकमेकांना बिलगून 
'आई समजुन घेतली' अन आम्हालाही आमची आई कळायला लागली...

सारस्वतांवर उगारलेल्या कामगारांच्या तलवारीचं तळपणं
आमचेही विचार अन मेंदू लख्ख करू लागलेय हळुहळु

'ऐसा गा मी ब्रह्म' म्हणत एका खोलीसाठी वणवण भटकणारा तू आठवला की,
चार खोल्यांच्या बंगल्याचं सुखही वाटेनासं झालंय हल्ली मला...

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर लढलास तू
कधी परिस्थितीचे वार झेलत
कधी परिस्थितीशी दोन हात करत...
हार मानणाऱ्यांपैकी तू नव्हताच....

तू तर राहिलास अजिंक्य शेवटपर्यंत
तुझ्या जाण्यानं
कविसंमेलन अर्ध्यावर राहिलं .....
पण फिकिर करू नकोस
तुझ्या लेखणीतुन तू असंख्य ठिणग्या पेटऊन गेला आहेस....

मायबाप, गणगोत, जातधर्म कसलंच काही नसणारा तू
आभाळाएवढं प्रेम मात्र कमवून गेलास..

महाराष्ट्रच काय साऱ्या भारतानं तुझ्यावर जीव वाहिला...
असाही एक नारायण मी सरणावर पाहिला....
मी सरणावर पहिला.....

('अक्षरांचं दान' या काव्यसंग्रहातून)
 - *डॉ. प्रतिभा जाधव*
      लासलगाव (नाशिक)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code