Header Ads Widget

‘ओसीडी’वर मात करताना

  ओसीडी अर्थात ऑब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसऑर्डर या मानसिक आजाराविषयी काही जाणून ‘ओसीडी’चा विकार असलेली व्यक्ती अनावर व अवास्तव विचारांनी सतत त्रस्त असते.

  - डॉ. मकरंद ठोंबरे

  ओसीडी अर्थात ऑब्सेसिव्ह कम्पलसिव्ह डिसऑर्डर या मानसिक आजाराविषयी काही जाणून ‘ओसीडी’चा विकार असलेली व्यक्ती अनावर व अवास्तव विचारांनी सतत त्रस्त असते. त्याचबरोबर मन व्यापून टाकणाऱ्या निरनिराळ्या कल्पना व त्यासाठी करावीशी वाटणारी अनिवार्य कृती, हे प्रामुख्याने ‘ओसीडी’ या आजाराचे मुख्य स्वरूप असते.

  ‘ओसीडी’ या मनोविकाराची कारणमीमांसा करताना हा विकार बऱ्याचदा अनुवांशिक असल्याचे आढळून आले आहे. अनुवंशिकतेबरोबरच लहानपणी घरात असलेली अतिरिक्त शिस्त, धाक, पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा अतिरिक्त दबाव, लहानपणापासून पडलेली अतिरिक्त कौटुंबिक जबाबदारी, लहानपणापासून मनावर झालेले आघात, आलेले कटू अनुभव आणि या सर्व कारणांमुळे आयुष्यात यशस्वी होण्याचे घेतलेले अतिरिक्त दडपण, अशी अनेक कारणे ‘ओसीडी’च्या आजारामागे आढळून येतात. लहानपणापासून दबलेला राग, द्वेष, त्यामुळे वाढलेले ताणतणाव अशी अनेक कारणे आपल्या मनामध्ये चलबिचल, अस्वस्थता निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकतात. मनाला येणारी सततची अस्वस्थता दीर्घ काळ व्यक्तीच्या आयुष्यात टिकली, तर त्याचे रूपांतर चिंतेमध्ये होऊ लागते. अशा वेळी पेशंट बऱ्याचदा डिप्रेशन किंवा ‘ओसीडी’च्या मार्गाने वाटचाल करताना दिसतात.

  वरील कारणांबरोबरच मेंदूतील होणारे रासायनिक असंतुलन हेसुद्धा ‘ओसीडी’ होण्यासाठी प्रमुख कारण आहे. आपण जेव्हा कोणताही निर्णय घेतो किंवा एखाद्या गोष्टीचे नियोजन करतो, त्या वेळी ती गोष्ट करताना आपण ठरवल्याप्रमाणे ती गोष्ट योग्य प्रकारे करतो आहे, की नाही, हे निरीक्षण करत असतो व तपासून ही पाहत असतो. आपण ठरवल्याप्रमाणे वागू शकत नसलो, तर आपल्या निर्णय व कृतीसंबंधी आपण पुनर्विचार करतो व ती गोष्ट दुरुस्त करतो. ही सर्व प्रक्रिया मेंदूचे तीन भाग निरनिराळ्या पद्धतीने करत असतात; परंतु ‘ओसीडी’च्या रुग्णांमध्ये या तिन्ही भागांतील संतुलन बिघडू लागते. आपण काही तरी चुकीच्या गोष्टी करत आहोत, असे ‘ओसीडी’च्या रुग्णास वाटते. त्यामुळे पुनःपुन्हा त्या गोष्टी तपासून पाहाव्याशा वाटतात किंवा दुरुस्त कराव्याशा वाटतात. मेंदूतील ‘डोपामाइन’ या रसायनाचे अतिरिक्त प्रमाण, ‘सिरोटोनिन’ या रसायनाची कमतरता ‘ओसीडी’चा आजार होण्यास कारणीभूत ठरते. मेंदूतील ‘सिरोटोनिन’ या रसायनाच्या कमतरतेमुळे मेंदूतील संदेशवहनाचे काम सुरळीत होऊ शकत नाही. त्यामुळे विचार, भावना व त्याला अनुसरून होणारे अपेक्षित वर्तन यामध्ये विसंगती निर्माण होताना दिसते.

  वारंवार येणारे त्रस्त विचार व कल्पनांमुळे पेशंटना सतत कुठली तरी अनिवार्य कृती करावीशी वाटत राहते. यामध्ये वारंवार स्वच्छता, स्वतःच्या वस्तू जपणे, त्यांचा संचय करणे, याबरोबरच त्या वस्तू विशिष्ट क्रमानेच ठेवणे, आपल्याला कोणता तरी असाध्य आजार होण्याची भीती, काही अवाजवी व अशास्त्रीय धार्मिक कल्पना, त्याचे परिमार्जन होण्यासाठी करावी लागणारी व्रतवैकल्ये, याचबरोबर आपल्या निष्काळजीपणामुळे काही तरी विपरित घडेल, यासाठी वारंवार गॅस, नळ, कुलुप, इस्त्री यासारख्या उपकरणांची वारंवार तपासणी, असे अनेक प्रकार पेशंटमध्ये पाहायला मिळतात. शेजारच्या बिल्डिंगमध्ये गाडी धुताना जे पाणी व धूळ उडते, यामुळे आमच्या बिल्डिंगमध्ये सर्व जण आजारी पडतात. त्यामुळे मी रोज दोन वेळा आंघोळ करते, असेही एका पेंशटने मला सांगितले होते. प्रत्येक व्यक्तीमध्ये ‘ओसीडी’ची लक्षणे वेगवेगळी आढळतात. अनिवार्य कराव्या लागणाऱ्या कृतीची कारणमीमांसा प्रत्येक व्यक्तीची निरनिराळी असते.

  ओसीडी व उपचार

  कौन्सेलिंग व कॉग्निटिव्ह बिहेव्हिअर थेरपी : कौन्सेलिंग व सायकोथेरपीचा ‘ओसीडी’च्या आजारात पुष्कळ उपयोग होताना दिसून येतो. या विकाराचा स्वीकार करणे सर्वप्रथम महत्त्वाचे आहे. माझ्या स्वच्छतेच्या सवयी व वैचारिक आंदोलने अनैसर्गिक आहेत, याचा सर्वप्रथम स्वीकार व्हायला हवा. पुष्कळदा पेशंट स्वतःला शिस्तबद्ध व अत्यंत व्यवस्थितपणा या नावाखाली उपचार घेणे टाळू पाहतात. समुपदेशकाने यासंबंधी सविस्तर चर्चा करणे गरजेचे आहे. मनात येणारे चित्रविचित्र विचार व कल्पना यांचा मानसिक अस्वस्थतेशी कसा संबंध असतो, हे रुग्णास समजावून सांगणे अनिवार्य आहे. ‘सीबीटी’चा उपयोग पेशंटला ताणतणावापासून दूर ठेवणे व चिंतामुक्त जगणे शिकवणे यासाठी करता येऊ शकतो. आपल्या विचारांवर विवेकाने नियंत्रण ठेवणे, ते विचार वास्तव आहेत, का निव्वळ कल्पना आहेत, हे वेळोवेळी तपासून पाहण्याची गरज आहे, हे पेशंटला सांगणे आवश्यक असते; तसेच स्वच्छता व जंतुसंसर्ग याविषयी शास्त्रीय माहिती देणे आवश्यक ठरते. विचारांची अनियंत्रित साखळी रोखण्यासाठी स्व-संवादाकडे जाणीवपूर्वक लक्ष व वेळोवेळी स्वतःला विचारांपासून रोखण्यासाठी स्वयंसूचना देण्याचे तंत्र पेशंटला शिकवणे आवश्यक आहे.

   औषधोपचार : ‘ओसीडी’साठी परिणामकारक पुष्कळ औषधे उपलब्ध आहेत, ज्यामुळे मेंदूतील रासायनिक संतुलन सुधारते. ही औषधे दीर्घकाळ घ्यावी लागतात. औषधांमुळे सिरोटोनिनचे प्रमाण वाढण्यास मदत होते, ज्यामुळे मनाची अस्वस्थता, चिंता, निराशा दूर होण्यास नक्कीच मदत होते. औषधांच्या नियमित सेवनामुळे मेंदूतील विचार, भावनांचे संदेशवहन हळूहळू सुधारते व त्याचबरोबर उपयुक्त जीवनशैली आत्मसात केल्यास पेशंट नक्कीच बरा होऊ शकतो. तर मग ‘ओसीडी’ला वेळीच ओळखून त्याला बाय बाय करण्याचे ठरवू या.

  (लेखक होमिओपॅथ, कौन्सेलर व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

  (सौ-म टा)
  (छाया:संग्रहित)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या