Header Ads Widget

स्वाभिमानाचा व स्वातंत्र्याचा दीप कधीही विसरता कामा नये

  "कोणत्याही समाजाचा किंवा पक्षाचा पुढारी कोणत्याही यशाचा सर्वस्वी धनी कधीच होऊ शकत नाही. नुसते पुढारीपण असून चालत नसते. तर ज्या कार्याकरिता आपण पुढे आलो आहोत ते आपले माणुसकीच्या हक्काचे पवित्र कार्य खडतर स्वार्थत्यागाने व शिस्तीच्या मार्गाने केले पाहिजे. तुमच्या अंतकरणात स्वाभिमानाचा व स्वातंत्र्याचा जो दीप तेवत आहे तो अधिक उज्वल करण्याचा प्रयत्न करावयास पाहिजे. तो पुन्हा कधीही विझला जाता कामा नये, याची तुम्ही प्रत्येकाने प्रथम खबरदारी घेतली पाहिजे.सहा कोटी अस्पृश्य जनतेने आपणास राजकीय हक्क पाहिजेत याविषयी जी घोषणा केली आहे ती खरोखरच अलौकिक आहे. पुढाऱ्याच्या मागे असलेली जनता निर्भयतेने कंबर बांधील तर जगात कोणत्याही कार्याला यश मिळालेच पाहिजे. माझ्या सहा कोटी अस्पृश्य बांधवांनी हिम्मत धरली तर हिंदुस्थानातील लोकांना स्वराज्य मिळावयास कितीसा अवधी लागणार आहे! तुमच्या अंतःकरणातील माणुसकीचा ओलावा सुकू देऊ नका."!!!

  🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर (संदर्भ-डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड- १८, भाग-१, पान नं. २७७) शुक्रवार दि.२९ जानेवारी १९३२ रोजी दामोदर हॉल, मुंबई येथे कार्यकर्त्यांना उद्देशून बाबासाहेबांचे भाषण.
  घटनात्मक नीतीचे काटेकोर पालन करा

  "प्रत्यक्ष घटनेपेक्षा घटनेप्रमाणे वागण्याची नीती जनतेत असणे या गोष्टीला फार महत्त्व आहे. देशात पार्लमेंटरी लोकशाहीची पद्धत यशस्वी व्हायची असेल तर सरकार व जनता या उभयतांनी काही संकेत आणि नीती यांचे पालन करणे अवश्य आहे. देशातील बहुसंख्य लोकांचा आपल्यावरील विश्वास उडाला आहे, असे दिसून आल्यास घटनात्मक नितीस अनुसरून सरकारने आपल्या अधिकार पदाचा त्याग केला पाहिजे. अल्पसंख्यांकाबद्दल आदर बाळगला पाहिजे व शेवटची गोष्ट म्हणजे राज्य शासन नि: पक्षपाताने चालविले पाहिजे.आपल्या समाजातील निरनिराळ्या लोकांची राहाणी व विचार करण्याची पात्रता या गोष्टी विचारात न घेता केवळ तात्त्विक बाजू विचारात घेऊन घटना बनविणे या गोष्टीमुळे जगातील अनेक घटना अयशस्वी ठरतात. अधिकारावर असलेल्या लोकांनी हे ध्यानात ठेवावे की, घटना करण्याचा व राज्यकारभार करण्याचा अधिकार त्यांना जो मिळालेला असतो तो काही अटींवर लोकांनीच दिलेला असतो. सरकारने चांगला राज्यकारभार करावा याच अटीवर लोकांनी त्यांना वरील अधिकार दिलेले असतात. त्यांना जर हि अट पुरी करता येत नसेल तर सरकारने आपली अधिकार सूत्रे खाली ठेवली पाहिजेत. जुन्या घातुक प्रवृत्तीवर मात करून शूद्रवृत्ती आणि जातीयता यांना थारा न देता राष्ट्रात हुकूमशाही निर्माण होणार नाही व कोणत्याही प्रकारचा खेळ राष्ट्रात चालणार नाही अशी खबरदारी घेऊनच लोकांनी वागावे. लोक या मार्गी लागतील अशी मला आशा आहे."!

  🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर (संदर्भ-डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड- १८, भाग- ३, पान नं.२१८) दि. १० जून १९५० रोजी त्रिवेंद्रम येथे लेजिस्लेटिव्ह चेंबर मध्ये कार्यकर्त्यांना उद्देशून बाबासाहेबांचे भाषण.
  आपले हक्क प्रस्थापित करण्याकरिता चढाईचे धोरण स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही

  "आपली अस्पृश्यता आपणच घालवली पाहिजे! व त्या दृष्टीने आपण सबळ व निर्भय होण्यानेच आपली अस्पृश्यता जाणार आहे. याबाबतीत आपणास बरेच कष्ट करावे लागतील व प्रसंगोचित आपणास स्पृश्यांची दोन हात करण्याचा प्रसंग येणार आहे व त्यासाठी आपण हिम्मत बाळगली पाहिजे. आपला समाज परावलंबी आहे व हे चुकीचे आहे असे मी म्हणत नाही. अस्पृश्य समाज स्पृश्य समाजाशी सहकार्याने वागल्याशिवाय त्याचा तरणोपाय नाही! अशा प्रबळ समाजाशी असहकारिता पुकारून आपला कार्यभाग कसा साधणार असे पुष्कळ लोकांना वाटते. परंतु बहिष्कृत समाजातील लोकांनी हे पक्के लक्षात ठेवावे की, आपला स्वावलंबनाच्या अबाधित मार्गाशिवाय अन्य मार्ग निकामी व घातकी असल्यामुळे ते प्रयत्न सर्वस्वी त्याज्य होत. अस्पृश्य समाजात कसलाही मनुष्य असो, तो मनुष्य कितीही सर्वगुणसंपन्न असो! कितीही विद्वान असो! तथापि, तो एका विशिष्ट समाजात जन्माला जन्मला एवढ्याच कारणास्तव त्याच्या गुणांचे चीज होत नाही. करिता आपण आपले हक्क प्रस्थापित करण्याकरिता चढाईचे धोरण स्वीकारले पाहिजे! हे धोरण स्वीकारल्याशिवाय या धक्काबुक्कीच्या मामल्यात आपणास गत्यंतर नाही. आपल्यावरील अन्याय दूर करण्याचा अत्यंत महत्त्वाचा दुसरा उपाय म्हणजे सरकारी सत्ता प्राप्त करून घेणे होय! आपल्याला चातुर्वर्ण्याच्या चौकटीबाहेर असावे लागते तरीही चातुर्वर्ण्याची चौकट मोडून आत जावयाचे असेल तर आपणास राजकीय सत्ता हवी. राजकीय सत्ता हातात असल्याशिवाय समाजात आपणास वर्चस्व प्राप्त होणार नाही."!

  🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर (संदर्भ-डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड- १८, भाग- १, पान नं.१५६) दि.२४ मार्च १९२९ रोजी बेळगाव (कर्नाटक) येथे बेळगाव जिल्हा बहिष्कृत वर्गाच्या सामाजिक परिषदेत कार्यकर्त्यांना उद्देशून बाबासाहेबांचे भाषण.
  आपल्या धार्मिक, सामाजिक व राजकीय आयुष्याचा पाया बुद्धिवाद हाच असला पाहिजे

  "हिंदुस्तानच्या इतिहासासंबंधी पुष्कळ गैरसमज रूढ आहेत. पुष्कळ विद्वान इतिहासकारांनी म्हटले आहे की, हिंदुस्थानात राजकारणाचा काही गंधच नव्हता. प्राचीन भारतीयांनी केवळ तत्वज्ञान,धर्म व अध्यात्म याविषयी लिहिण्याकडेच लक्ष दिले होते व ते इतिहासापासून, राजकारणापासून साफ अलिप्त होते. असेही म्हणतात की, हिंदी जीवन व समाज एका ठराविक पोलादी चौकटी मध्येच फिरत आहेत व त्या चौकटीचे वर्णन केले की इतिहासकारांचे काम संपले! हिंदुस्थानाचा प्राचीन काळचा इतिहास अभ्यासल्यानंतर माझे मत मात्र ह्या विद्वानांहून अगदी निराळे बनले आहे. हया अभ्यासात मला आढळून आली आहे की, जगात कुठल्याही देशात हिंदुस्तानसारखे प्रचंड गतिमान राजकारण नव्हते आणि हिंदुस्तान हा बहुदा एकच देश असा आहे की जेथे जगात दुसरीकडे कुठेही दिसली नाही अशी क्रांती घडून आली होती. बुद्धाने सत्याची व्याख्या अगदी सोप्या शब्दात सांगितली होती. इंद्रियांना कळू शकेल तेच सत्य होय. दुसऱ्या भाषेत सांगावयाचे म्हणजे कुणी अधिकारी व्यक्तीने सांगितलेली वस्तूच सत्य, असे नाही. जगाच्या इतिहासात स्वातंत्र्य, समता व बंधुत्वाचा आदेश देणारा बुद्ध हाच पहिला मनुष्य निघेल. शेवटी राजकारण, समाज, राज्यशासन, धर्म व बुद्धीवादात या क्रांतीची बुद्धाने मुहूर्तमेढ रोवली ती पुढे निष्फळ ठरली. धर्म व राजकारण यांना एकत्र जुंपून, चातुर्वर्ण ही केवळ सामाजिक प्रथा नाही, ते एक राजकीय तत्वज्ञान आहे, असे सिद्ध करण्यासाठी मनुस्मृति लिहिण्यात आली. आपल्यास सामाजिक व राजकीय आयुष्याचा पाया बुद्धिवाद हाच असला पाहिजे."!

  🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर (संदर्भ-डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड- १८,भाग- २, पान नं. ४६१) दि. २४ सप्टेंबर १९४४, मद्रास येथे प्रभात टॉकीज मध्ये रँशनल सोसायटीच्या विद्यमाने आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांना उद्देशून बाबासाहेबांचे भाषण.
  सार्वजनिक पैशाचा अपहार करण्यासारखे नीच कृत्य दुसरे नाही.

  "माझी सर्व जनता गरीब आहे. मात्र तिच्यावर माझा विश्वास आहे. ती गरीब असली तरी ती माझ्या हाकेला ओ दिल्याशिवाय राहणार नाही, याबद्दल माझी खात्री आहे. मात्र शिकल्या सवरलेल्या लोकांना याप्रसंगी मला दोन शब्द सांगावयाचे आहेत. गरीब जनतेने दिलेल्या पैशाचा हिशोब त्यांनी व्यवस्थित ठेवावा व एका पै ची ही अफरातफर होणार नाही याची त्यांनी काळजी बाळगावी. सार्वजनिक पैशाचा हिशोब व्यवस्थित ठेवून तो जनतेस वेळोवेळी दाखविणे यासारखे पवित्र कार्य दुसरे नाही. तसेच सार्वजनिक पैशाचा अपहार करणे यासारखे नीच कृत्य दुसरे नाही. माझा माझ्या समाजातील सुशिक्षितांवरील विश्वास उडाला आहे. मला इमारत फंडाचा सर्व हिशोब हवा. सर्वसामान्य गरीब आणि अशिक्षित माणसावरच आता माझा सर्व भरोसा आहे."

  🔹 डॉ. बाबासाहेब आंबेडकर (संदर्भ- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषण, खंड- १८, भाग-३, पान नं. ३१९) रविवार दि. २८ सप्टेंबर १९५२ रोजी नरे पार्क वर मुंबईतील अस्पृश्य जनतेचे जाहीर संमेलन घेण्यात आले होते. त्या संमेलनात कार्यकर्त्यांना उद्देशून बाबासाहेबांचे भाषण.

  भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कार्याचा व विचारांचा वारसा आपल्याला लाभलेला आहे. आज त्यांनी जे कार्य केले त्याला तोड नाही. म्हणुन स्वातंत्र्य दिन निमित्त त्यांच्या कार्य कौशल्यावर प्रकाश टाकुन ते अंगिकृत करणे अपेक्षित आहे.

  🔹संकलन- आयु.किरण गुडधे
  प्रशांत नगर चौक, अमरावती.
  मो.नं. ७७६९९४४२४५

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या