Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

स्त्री सशक्तीकरणाच्या दिशेने निघालेली कविता : शब्दफुले

कवयित्री सौ.प्रीती राकेश वाडीभस्मे यांचा पहिलाच कवितासंग्रह " शब्दफुले " त्यांनी आवर्जून पाठविला . परिस पब्लीकेशन, पुणे यांनी प्रकाशीत केलेल्या ११२ पानाच्या या पुस्तकात विविध काव्य प्रकारातील एकूण ८४ रचनांचा समावेश आहे. गिरीपर्णने केलेलं डिजीटल मुखपृष्ठ आखर्षक व बोलकं आहे. या कवितासंग्रहाची प्रस्तावना प्रसिद्ध कवी डाँ. हबीब भंडारे यांनी परिवर्तनशील विचारांच्या अंगाने लिहिलेली आवडली . डाँ.विनोद कुमरे यांनीही या कवितासंग्रहाविषयी अभिप्राय नोंदविला आहे . पाठराखण सुप्रसिद्ध कवयित्री, लेखीका आचार्या विजया मारोतकर यांनी केली आहे . संजय ओरके व कु.सिया झलके यांची रेखाचित्रे विषयानुरुप असून बोलकी आहेत. हा संग्रह स्व.सुशीलाबाई द.तडस यांना व विकलांग आयाबहिणींना समर्पीत केला आहे . 
       आपल्या प्रस्तावनेत डाँ.हबीब भंडारे वाडीभस्मेंच्या कवितेविषयी मत मांडतांना म्हणतात ' शब्दफुले ' कवितासंग्रहातील कविता म्हणजे समाज नवनिर्मितीच्या सकारात्मक बदलाची वैचारिक नांदी ठरणारी सकस आशयाची प्रतिभासंपन्न कविता आहे . शब्दफुले या कवितासंग्रहात निसर्ग, प्रेम, दारिद्र्य, मनाची आर्तता, हृदयातील अंतर्संवाद, स्त्री जाणिवा, शेतकरी, जीवन संघर्ष, समाजकारण अशा चौफेर विषयांवर कवयित्री कवितेतून स्वतःच्या विचारधारेच्या बळावर व्यक्त होते ." 
         डाँ. विनोद कुमरे यांचे मते , " जगातील पहिल्या कवितेच्या ओळी ज्या क्षणी रचल्या गेल्या असतील तशा निर्हेतुक क्षणाइतक्याच या संग्रहातील कविता निर्मळ आहेत, साध्या, सोप्या व सरळ शब्दात कवयित्रीने गुंफलेली शब्दफुले आहेत . शब्दफुले सात्विक अभिव्यक्तीला आपल्या गर्भात तेवत ठेवून कवितेच्या आशय व विषयातून कलात्मक पातळीवर विविधांनी भौतिक जीवनातील अनुभव विश्वाला प्रकट करीत नेते ." 
      आचार्या विजया मारोतकर पाठराखण करताना म्हणतात, " सभोवतालचा निसर्ग न्याहाळताना पाऊस, गारवा,श्रावणसरी मातीचा सुगंध, सांजवेळ, वृक्षवल्ली हे सारे कविता विषय होऊन शब्दफुले फुलत जातात ."
       या तिनही मान्यवरांच्या मतातून असे लक्षात येते की प्रीती यांची कविता ही सात्विक ,निर्मळ व चौफेर विषयांची पेरणी करणारी 'शब्दफुले ' आहेत . 'शब्दफुले' च्या निमित्ताने शब्दांविषयीचे म्हणने मांडणा-या  कवि वामन निंबाळकर सरांच्या कवितेतील काही ओळी मला बोलक्या वाटतात.   

     " शब्दांनीच पेटतात घरे, दारे ,देश आणि माणसे सुद्धा . शब्द विझवतात आगही शब्दांनी पेटलेल्या माणसांची ". ह्या ओळी शब्दांविषयी बरंच काही सांगून जातात . शब्द काय करू शकतात ,याची प्रचिती या ओळीमधून अधोरेखीत होते . कारण माणूस जेव्हा काल,स्थलपरत्वे शब्दांचा प्रयोग करतो तेव्हा चांगला -वाईट परिणाम जाणवतो. त्याची फलश्रुती त्या शब्दांवर निर्भर असते.  शब्द आगीत तेल ओततात, जखमेवर मीठ चोळतात, शब्द शस्त्र बणून शत्रूंना घायाळ करतात . शब्द माणसा माणसात वैरभाव निर्माण करतात, प्रसंगी समेटही घडवून आणतात , शब्द मनावर घावही करतात तर मनाच्या जखमेवर मलमही लावतात, प्रेमाने, मायेने गोंजारतात, शब्द क्रांती करण्यास ,लढण्यास प्रेरणा देतात ( जसा स्वातंत्र्य लढा), तर झोपलेल्याला जागंही करतात. अज्ञानांना सज्ञान बनवितात , शब्द विनाश आणि विकासही करू शकतात .शब्द ओठातले असो की पुस्तकातले कमी अधिक प्रमाणात ते विविध प्रकारचे कार्य करीत असतात . कधी जखमेवर मायेची फुंकर घालून वेदनामुक्त करतात, तर कधी भरकटलेल्यांना रस्त्यावर आणतात . एवढी ताकद या शब्दात असते . शब्दापासून वाक्य बनते आणि वाक्यापासून कविता . कविता हा साहित्यातील एक महत्वाचा प्रकार आहे. कविता मुख्यत: छंदबद्ध असतात. कवितेतून जीवन कळते, भाव कळते, समजते व उमजते . मग कविता म्हणजे काय ? "मर्यादित शब्दांत गहरा आशय ज्यातून व्यक्त होतो आणि त्या आशयाची अनुभूती रसिकाला होते अशा रचनेला कविता म्हणता येईल " . काव्यशास्त्रानुसार " वाक्य रसात्मक काव्य " ज्यात रस आहे असे वाक्य म्हणजे काव्य ! 
        कवितेचे अनेक प्रकार आहेत . कवयित्रीनेही ८४ रचनातून गझल, बाराक्षरी, अष्टाक्षरी, मुक्तछंद, अभंग ,गीत या विविध काव्यप्रकारातून विविध विषय हाताळलेले आहेत . कवयित्रींचे 'शब्दफुले 'गुरूपासून तर थेट परिवर्तनशील विचारांच्या महापुरुषांपर्यंतच्या कार्याला नमन करीत  करुणाकार बुद्ध , महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, माता जिजाऊ, शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई , संत गाडगेबाबा , राणी लक्ष्मीबाई , इंदिरा गांधी , प्रतिभाताई पाटील,  कल्पना चावला, किरण बेदी ,सिंधूताई सपकाळ यांच्या विषयी कृतज्ञता भाव व्यक्त करते. तसेच निसर्गापासून ते प्रेमापर्यंतचे विषयही हाताळलेले दिसतात. स्त्री शक्ती/मुक्ती, भूक,भाकरी, शेतकरी, माणुसकी, वृद्धाश्रम, आई,बाबा, ग्रंथ, माय मराठी,गरीबी, मास्तर, वृक्षवल्ली, मैत्री, सुख, पाऊस,दुःख,निष्ठा,आरसा,पांडुरंग,
लेखनी,गुलामगीरी अशा अनेक विषयांचा वाचकांना परिचय करून देणा-या रचना आहेत . एकिकडे कवयित्रीची कविता पारंपारीक संस्कृती जपते तर दुसरीकडे परिवर्तनशील विचारांच्या हातात हात घालून व्यवस्थेच्या विरोधात एल्गारही करू पाहते . 

वाडीभस्मे यांच्या 'शब्दफुले ' या कवितासंग्रहातील शीर्षक रचनेतील शब्द अलवार असे भाव अधोरेखीत करतांना दिसतात .

" शब्द श्वास शब्द ध्यास
शब्दांवर माझे मन डुले
लेखणीतून माझ्या पाझरे
अलवार अशी शब्दफुले !"

कवयित्रीचे शब्दफुले लेखणीतून पाझरत कवितेत, अभंगात उतरून, नामस्मरणात ,भजनात रमतात, ऊन,वारा,पावसाचे विविध भाव लेऊन प्रतिभेच्या थाळीत अलवार उतरतात. 
कधी प्रहार करतात तर कधी विचारपुष्प होऊन आनंद देतात .स्त्रीच्या व्यथा,वेदना मांडतानाच पणती होऊन जळण्याचं व स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचं आवाहनही करतात. तद्वतच वृक्षांचे महत्व विशद करीत वृक्षसंवर्धानाचा संदेश देते . कवयित्री ऋतुनुसार निसर्गात होणारे बदल, धरनीचे सुवासीनीचे रुप  व विविध सन उत्सवाचे वर्णनही 'श्रावण मास' मधून मांडते . पाऊस आणि धरतीचं मिलन करतांनाच तिला कष्टक-यांच्या भूकेचाही प्रश्न सतावतो. एकिकडे भाकरीसाठी रस्त्याच्या कडेला दोरीवर चालण्याचा जिवघेना खेळ करणा-यांची व्यथा मांडतात तर दुसरीकडे भ्रष्टाचार करून आपले घर भरणा-या लोकांचा समाचारही घेतांना दिसतात. ही विषमता तिची कविता मांडत असतांनाच कर्मयोगी संत गाडगेबाबा यांचे जनकल्यानाचे कार्य आठवते .

" कर्मयोगी खरा । दीनांचा आसरा ।
सत्याचा कासरा । महाराज ।।"

गाडगे महाराजांनी आपल्या व-हाडी बोलीतील प्रबोधनातून लोकमन स्वच्छ करीत ख-याट्याने गाव स्वच्छ केले. त्यांनी गरीब, अनाथ मुलांकरीता, वसतीगृह, सदावर्ते, अनाथाश्रम, बांधले पण स्वतः एकाही पैशाला हात लावला नाही .हे उल्लेखनीय आहे . 
                 शब्दफुलांचा प्रवास पुढे सुरू असतांनाच हृदयी जेव्हा वसंत फुलतो तेव्हा कविता आठवांच्या हिंदोळ्यावर झोके घेत गारव्याचा आस्वाद घेतांना दिसते . पण हे सर्व उपभोगतांना मातीच्या गोळ्याला कुंभार जसा आकार देवून एखादी कलाकृती जन्मास घालतो त्याचप्रमाणे बाल मनावर संस्कार करणा-या शिक्षकालाही ती विसरत नाही .

" मास्तर तुम्ही नसता तर..
'चूल आणि मूल ' 
मर्यादित असतं आमचं क्षेत्र
परंपरेच्या विचारात गुरफटलो असतो 
जगलो असतो जगायचे म्हणून
घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं
मास्तर, तुमच्या उपकाराची कशी करावी उतराई ?"

        कवियत्री 'मास्तर ' या व्यक्तिरेखेच्या रुपाने स्त्री शिक्षणाची चळवळ अंगीकारून ज्यांनी ज्यांनी  तिला अज्ञानाच्या काळोखातून उजेडाकडे जाण्याची प्रेरणा दिली त्यांच्याविषयी कृतज्ञताभाव व्यक्त करायला विसरत नाही.
आईच्या गर्भात असलेल्या मुलीची आर्त हाकही तिला स्वस्थ बसू देत नाही. मुलगी जगली पाहिजे ,शिकली पाहिजे असे कवयित्रीला वाटते. जेव्हा एक आई आपल्या लेकरांना जगविण्यासाठी रानावनात पायपीट करते तेव्हा त्यात तिला वात्सल्याचा झरा दिसतो.
एवढंच नव्हे तर चातकासारखी पावसाची वाट बघणारा जगाचा पोशींद्याचे शेतातील कष्टही तिला व्यक्त व्हायला भाग पाडतात .

" काळ्या काळ्या ढेकळात
नांगर-वखर फिरविला
धरनीच्या मशागतीस
घाम अंगाचा जिरविला !"

एका सर्जकाची व्यथा दुसरा सर्जक मांडतो ही बाब स्तुत्य वाटते . पण जेव्हा एक
शेतकरी घाम गाळून अन्नधान्य पिकवितो, व आपला माल बाजारात विकायला नेतो तेव्हा मात्र आम्हीच त्याचेशी भावबाजी करून कमी भावात भाजी द्यायला सांगतो . अशावेळी आम्ही त्याच्या घामाचे, कष्टाचे मोल जाणतो का ? समाजातील लोकांनी ही मानसीकता बदलण्याची गरज आहे . आमच्या बोलण्यात आणि वागण्यात साम्य असण्याची गरज आहे. तरच शेतकरी जगेल. अन्यथा वेळ आल्यावर त्याच कष्टक-यांना वृद्धाश्रमाचा रस्ता धरावा लगेल . याचाही विचार झाला पाहिजे . पण सर्वच लोक एकाच विचारांचे असतात असे नाही , तर काही लोक आजही आई-वडीलांची जिवापाड काळजी घेतांना दिसतात. त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेतात,ते शब्दांपलीकडचे असते . कवयित्रीची कविताही बापाविषयी  कृतज्ञताभाव व्यक्त करतांना दिसते .

" काळीज आभाळाचं 
पेलतो माझा बाप
त्याच्या मायेची कधी
कुठे होते मोजमाप ?"

कवयित्री जेवढी बापाविषयी काळीज कप्प्यातून व्यक्त होते, तेवढीच ती आईविषयीही भरभरून व्यक्त होतांना दिसते. आई-वडील हे मुलाचे पहिले गुरू आहेत . त्यांच्या कष्टामुळे अनेक मुलांना उच्च दर्जाचं आयुष्य प्राप्त झालेलं आहे. त्यांच्या कष्टाचं मोल कुणीही चुकवू शकत नाही . ते मुलांचं सर्वस्व असतात .

" संथ मंद तेवणारी
वात असते आई
दुःख मनी कोंदणारी
शीत असते आई ! "

कवयित्री आईचा शब्दफुलांनी सन्मान करतांना , प्रेरणा, ऊर्जा,ममतेची खाण,त्रिजगताचा सन्मान, सुगंधित परिमळ,शिशूच्या वात्सल्याची भूक, संथ तेवणारी वात, चंदन, दर्पण, आलय, इत्यादी उपमांचे उपयोजन केले आहे . तीला स्त्री मुक्तीचीही जाणिव आहे . " श्वापदांच्या वासनांची कधी होईल होळी सांगना हो , कधी मिळेल स्त्रियांना मुक्तीची गोळी ? असा प्रश्नही समाजव्यवस्थेला ती विचारते . ती म्हणते आम्ही सावित्रीच्या लेकी खुपकाही करू शकतो, करतो आहोत आणि यापुढेही करीत राहणार आहो .आमच्या बळावर आम्ही गगनभरारी घेऊ इच्छितो, हा आशावाद कवयित्री आपल्या रचनेतून व्यक्त करताना दिसते .

" सावित्रीच्या लेकी आम्ही
समाज ढवळायला निघालो
स्वाभिमान रक्षण करण्या
आज स्वत्वाची ज्योत झालो !"

बुद्ध ' स्वयं दीप हो ' असं म्हणतात . याचाच धागा पकडून की काय ? आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रीने स्वतःच्या बळावर घेतलेली गगनभरारी आपण सर्वच अनुभवतो आहो. ही बाब वैचारीक परिवर्तशीलतेच्या दृष्टीने अभिनंदनीय आहे. तिला नव युगाची निर्मीती करायची आहे . ती स्त्रीच्या जीवनाला आकार देणा-या  महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, माता जिजाऊ, छत्रपती शिवराय, घटनेचे शिल्पकार डाँ.बाबासाहेब आंबेडकर, यांचे ' लढण्यास बळ दिले तुम्ही ' या कवितेतून शतशः आभार मानते .

" सर्वश्रेष्ठ भारतीय
संविधान शिल्पकार
धीरोदात्त महानायक
देई जीवना आकार !"

समस्त उपेक्षितांच्या जीवनाला आकार देणा-या डाँ. बाबासाहेब आंबेडकरांचे व भारतीय संविधाच्याप्रती आपल्या कवितेतून ऋण व्यक्त करते . कवयित्री प्रीती वाडीभस्मे  आपल्या सभोवताल फेरफटका मारीत घटनांचा मागोवा घेत संवेदनशील मनाने या घटनांचं अवलोकन करते,अभ्यास करते, चिंतन करते, मनन करते आणि सामाजिक जाणिवेतून ती आपल्या कवितेतून व्यक्त होते . कवयित्रीची कविता ही नवयुगाची कविता आहे .ती अनिष्ट रुढी परंपरेत फारशी अडकून पडताना दिसत नाही . ती नव्या युगाची वाहक होऊ इच्छिते . तिचा हेतू सात्वीक, निर्मळ व बदलत्या काळाचा सांगाती होण्याचा दिसतो. आजची स्त्री परंपरेच्या जोखडातून बहुअंशी मुक्त होत आहे, मात्र अजूनही पुर्णतः मुक्त झाली नाही.  म्हणून या पुढेही स्त्रीने चुल आणि मूल यातच अडकून न पडता आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी व स्वच्या उत्कर्षासाठी करावा असेही तिला वाटते . रुढीवादाच्या कोंदनात अडकून न पडता वैचारीक क्रांतीची भाषाही तिची कविता करते . ती निसर्गातही रमते, संतांची थोरवीही गाते, महापुरूषांविषयी कृतज्ञताही व्यक्त करते . एवढंच नव्हे तर जगाला जगविणा-या शेतक-यांचीही व्यथा मांडते . 
            एकूणच कवयित्रीची कविता ही आपल्या आकलनाच्या भरवश्यावर सर्वसमावेशक विषयांचा , प्रश्नांचा, समस्यांचा मागोवा घेत आपल्या रचनातून उजाळा देते . याबद्दल कवयित्रीचे कौतुकच आहे . समस्त स्त्रीयांनी संधीचा सदुपयोग करून आपल्यातील सुप्त गुणांचा योग्यरीत्या विकास करून आपल्या कुटुंबाला, समाजाला,देशाला सक्षम करण्याच्या दृष्टीने योगदान देण्याची गरज प्रतिपादीत करते . तरच महात्मा फुले व सावित्रीमाईचे स्वप्न साकार होईल, असे तिला वाटते . तिच्या या साहित्यकृतीचे व धाडसाचे कौतुक करून पुढील सकस साहित्य लेखणासाठी हार्दिक शुभेच्छा ! 

अरुण हरिभाऊ विघ्ने
रोहणा,आर्वी,वर्धा

----------------------------------------------------
कवयित्री : सौ.प्रीती रा.वाडीभस्मे
कवितासंग्रह:  'शब्दफुले'
प्रकाशन : परीस प्रकाशन, पुणे
पृष्ठसंख्या : ११२
मूल्य : १५०/- ₹

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code