कान टवकारून जशी हरणी
येतोय का आवाज चिमण्यांचा?
चिवचिवाट गुंजत नाही अंगणी
सरला नसेल का लाँकडाऊन ?
हटली असेल का जिवघेणी बंदी?
किती दिवस चालेल मैदानावरची मंदी?
खुप आतूर झालोय रे आम्ही
पाढे आणि कविता ऐकायला
तुमचे रुसवे, फुगवे, ओरडने अन्
शिक्षकांचे रागावने बघायला
खुप दिवस झालेत बाळांनो
जन गण मन चे बोल ऐकले नाहीत
संविधानाची प्रास्ताविकाही ऐकू येत नाही
वर्गातील भिंतीवर चढल्यात असंख्य जाळ्या
चिमण्यांनी घरट्यासाठी गोळा केल्यात काड्या
बाकांवरही खुप धुळ साचली आहे
फळा खडूची आतुरतेने वाट बघतो आहे
ये सांगाना रे मुलांनो !
शाळेची केंव्हा वाजवू घंटा ?
तुमच्या प्रतिक्षेत पोलही उभाच असतो संटा
शाळेविणा तुम्हीही हिरमुसले असालच की
आँनलाईन गृहपाठाला बोर झाले असाल की
दोन वर्षे झालीत, उघडली नाही शाळा
अजून किती दिवस आम्ही सोसाव्यात रे कळा ?
येत जा ना अधूनमधून फेरफटका मारायला
कशी आहेस शाळा म्हणून विचारायला ?
तुम्हाला नाही का येत आठवण आईची
कशी अवस्था असेल पेनाविणा शाईची ?
– अरुण विघ्ने