• Mon. Sep 25th, 2023

जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

  अमरावती : निरोगी शरीरासाठी प्रतिकारशक्तीचे महत्व कोरोनाकाळाने अधोरेखित केले आहे. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व सुदृढ शरीरासाठी आहारात निरनिराळ्या भाज्यांचे महत्व अनन्यसाधारण आहे. या पार्श्वभूमीवर नव्या पिढीला रानभाज्यांची ओळख करून देणारा महोत्सव महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  कृषी विभागातर्फे जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचा शुभारंभ पालकमंत्री ऍड. ठाकूर यांच्या हस्ते आज वलगाव येथील सिकची सभागृहात झाला, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार सुलभाताई खोडके, आमदार रवी राणा, माजी खासदार अनंतराव गुढे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, जिल्हाधिकारी पवनीत कौर, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, जयंतराव देशमुख, हरिभाऊ मोहोड, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विजय चवाळे, अनिल खर्चान आदी यावेळी उपस्थित होते.

  पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, ग्रामीण भागात नैसर्गिकरित्या रानभाज्या उपलब्ध होतात. त्यातून ग्रामीण नागरिकांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी हा उपक्रम राबविण्यात आहे. अलीकडच्या काळात वाढत चाललेल्या जंक फूडच्या सवयींमुळे प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे अनेकदा शहरांमध्येही कुपोषण आढळून येते. आहारातील भाज्यांचे महत्व ओळखून आता महिला व बालविकास विभागातर्फे परसबाग उपक्रम हाती घेण्यात आला आहे. भाज्यांचे महत्व नव्या पिढीच्या मनावर बिंबवण्यासाठी अंगणवाडीला जोडून परसबाग उपक्रम राबविण्यात येत आहे.

  आमदार श्रीमती खोडके म्हणाल्या की, आधुनिक जीवनशैलीत आहारपद्धतीतून हिरव्या भाज्या, रानभाज्या यांचे प्रमाण कमी झाले. त्याचा परिणाम प्रतिकारशक्ती कमी होण्यात झाला. सुदृढ शरीरासाठी ऋतुनिहाय भाज्या आहारात असाव्यात. प्रत्येक ऋतूत वेगळ्या भाज्या असतात. त्यामुळे असे महोत्सव वेळोवेळी व्हावेत, असेही त्यांनी सांगितले.बचत गटाच्या माध्यमातून रानभाज्या विक्रीसाठी जिल्हा प्रशासनाकडून शहरात स्टॉल उपलब्ध व्हावेत, अशी सूचना आमदार श्री. राणा यांनी केली. असे स्टॉल उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी सांगितले. श्री. गुढे यांनीही मनोगत व्यक्त केले.

  महोत्सवात ५९ रानभाज्यांचा समावेश

  रानभाजी महोत्सवात मेळघाटसह विविध तालुक्यांतील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. रानावनात नैसर्गिकरित्या रुजलेल्या मायाळू, मटारू, राजगिरा, पुदिना, केणा, पाथरी, आघाडा, गुळवेल, ओवा, वावडिंग, शेवगा, तरोटा, तांदुळजा, बेलफळ, जिवती, कवठ, करवंद, रानकेळी, बांबू, करटूले, शतावरी, भुई आवळा, सुरण, अरबी, कमळकाकडी, कपाळफोडी, उंबर, आदी ५९ रानभाज्यांचे २८३ नमुने सादर करण्यात आले. गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गौरवही यावेळी झाला.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,