
मुंबई:मेरठ येथील महिला भालाफेकपटू अन्नू राणी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. अन्नू राणीला जागतिक क्रमवारीच्या आधारावर ऑलिम्पिक तिकीट मिळाले आहे. अन्नूची निवड टोकियो ऑलिम्पिकसाठी झाल्यानंतर तिचे गाव बहादुरपूर येथे आनंदाचे वातावरण आहे.
काही दिवसांपूर्वी अन्नू राणीने ६३.२४ मीटर भालाफेक करत राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली होती. पण ऑलिम्पिक पात्रतेसाठीचे अंतर 0.७७ मीटरने ती हुकली होती. यामुळे तिला ऑलिम्पिक स्पर्धेला मुकावे लागण्याची शक्यता होती. अशात जागतिक क्रमवारी जाहीर करण्यात आली. यात तिची क्रमवारी उत्तम असल्याने अन्नूला टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट मिळाले. १२ वर्षांच्या कारकीर्दीत आर्थिक समस्येवर मात करून अन्नूने सातत्याने दमदार कामगिरी केली होती. निवड झाल्याने तिच्या कष्टाचे चीज झाले असून ऑलिम्पिक खेळण्याचे तिचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
शेतकरी अमरपाल सिंह यांच्या घरी अन्नू राणीचा जन्म झाला. ती पाच बहिण-भावंडांमध्ये सर्वात लहान आहे. अमरपाल हे स्वत: गोळाफेकपटू होते. तसेच अमरपाल यांचा भाच्चा लाल बहादुर आणि मुलगा उपेंद्र हे धावपटू आहेत. त्यांच्याकडूनच प्रेरणा घेत अन्नूने खेळाच्या मैदानावर पाऊल ठेवले. ती गावातील शेतासह कॉलेजच्या मैदानात सराव करत होती. सुरुवातीला ती भालाफेकसोबतच गोळाफेकही देखील करत होती. परंतु तिने अखेर भालाफेकपटू होण्याचा निर्णय घेतला.
वडिल अमरपाल हे शेतकरी असल्याने घरची परिस्थिती बेताचीच. अन्नू राणीला सरावासाठी दीड लाख रुपयांच्या भाल्याची गरज होती. परंतु, वडिल अमरपाल यांना इतका महागडी भाला अन्नूला घेऊन देता आला नाही. त्यांनी अन्नूला २५00 रुपयांचा पहिला भाला खरेदी करून दिला. त्यावर अन्नू सराव करत होती. वडिलांनी सरावासाठी खरेदी करून दिलेल्या भाल्याचा वापर करत अन्नूने अनेक स्पर्धा जिंकल्या. अशा हरहुन्नरी अन्नूची निवड टोकियो ऑलिम्पिकसाठी झाली आहे. ती या स्पर्धेत आपल्या कष्टाचे चीज पदकाच्या रुपाने करण्यास उत्सुक आहे.
(Images Credit : Lokmat)
0 टिप्पण्या