Recent in Technology

Advertisement

Breaking News

कामात कुचराई कराल तर कठोर कारवाई करू - पालकमंत्री

    अमरावती : जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये सफाईकामांत सातत्य नसल्याने पाव साळ्याच्या पार्श्‍वभूमीवर आजार वाढत असल्याच्या तक्रारी मोठय़ाप्रमाणावर येत आहेत. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी याबाबत यापूर्वीच खबरदारी घेणे आवश्यक होते. सार्वजनिक आरोग्य राखण्याच्या दृष्टीतून शहरांतून नियमित स्प्रेईंग- फॉगिंग, सफाईकामांत सातत्य ठेवावे. स्वच्छता व आरोग्य सुरक्षिततेच्या कामात कुठेही कुचराई कराल तर कठोर कारवाई करू, असा इशारा राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी येथे दिले. पावसाळी साथरोग प्रतिबंधक उपाययोजना व सार्वजनिक स्वच्छतेबाबत आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी पवनीत कौर, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, नप प्रशासन अधिकारी गीता वंजारी, माजी महापौर विलास इंगोले, बबलू शेखावत, नगरपालिका, पंचायतींचे मुख्याधिकारी आदी उपस्थित होते.पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, पावसाळी साथरोग प्रतिबंध, डास निर्मूलन, सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टीने नालेसफाई, औषध फवारणी, सर्व ठिकाणी नियमित स्वच्छता आवश्यक आहे. पावसाळी आजार वाढत असल्याच्या तक्रारी येत आहेत. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेच्या नित्याच्या कामांत अजिबात खंड पडता कामा नये. तिवसा, चिखलदरा, धारणी व इतर शहरांतूनही अस्वच्छतेमुळे आजार वाढत असल्याबाबत तक्रारी येत आहेत. स्वच्छतेची कामे शहरांतील सर्वच परिसरात काटेकोरपणे राबवावीत. झोपडपट्टी वसाहतीत नियमित स्वच्छता होत नसल्याचीही तक्रार आहे. नागरिकांच्या आरोग्याचा हा प्रश्न आहे. त्यामुळे सफाईची कामे तत्काळ राबवावीत. यानंतर याबाबत एकही तक्रार येता कामा नये. तसे घडल्यास जबाबदार अधिकारी- कर्मचा-यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पालकमंत्र्यांनी दिला.

    नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध कामांसाठी प्राप्त होणारा निधी अखर्चित राहता कामा नये. प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेच्या प्रक्रिया तत्काळ पूर्ण करून घ्याव्यात. अनेकदा निधी येऊनही कामे सुरू होत नाहीत. ही अत्यंत गंभीर बाब आहे. विकासकामांबाबत हयगय खपवून घेतली जाणार नाही. त्यामुळे तत्काळ कामांमध्ये गती व सुधारणी करावी. विविध कामांचा आढावा घेण्याच्या अनुषंगाने आपण स्वत: नगरपालिका, नगरपंचायतींच्या कामांची पाहणी करू, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code