
नाशिक:ज्या देशात महिला आणि बहुजनांना शिक्षण मिळाले, ते सारे देश पुढे गेले. पण, आजही आपल्याकडे बहुजन आणि महिलांच्या शिक्षणात अडचणी आहेत. त्यामुळे भारतासह शेजारचे देश मागे राहिले. मनुवाद अजूनही संपलेला नाही. आपण सावध पावले टाकायला हवीत, असा इशारा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला.
उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालयाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. सत्यशोधक मार्गाने जात सर्वांना शिक्षण देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहायला हवे, असे भुजबळ म्हणाले. कॉलेज व संग्रहालयाच्या इमारती अतिशय सुंदर, प्रेक्षणीय आहेत. पण फक्त वास्तू अप्रतिम असून उपयोग नाही, संस्थेचे नेते आणि कार्यकर्त्यांचे काम देखील कायम उल्लेखनीय असेल हे पाहिले पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या शिक्षण संस्था राष्ट्रवादीच्या आहेत, असं मागच्या सरकारमधील शिक्षणमंत्री एकदा म्हणाले होते, याची आठवण देत भुजबळ म्हणाले, त्यांचा जन्मही झाला नव्हता, तेव्हापासून शिक्षणाच्या प्रसारासाठी आम्ही कार्यरत आहोत. मग संस्था आमच्या असणारच. अनेकांना संस्थेचा इतिहास माहिती नसतो. हा इतिहास लक्षात घेतला पाहिजे, असा चिमटा भुजबळ यांनी काढला.
कुठलेही सरकार सामाजिक संस्थेचे मायबाप असते. भाजप सरकारच्या वेळी तुकड्यांची परवानगी मिळविण्यासाठी गेले असता, या संस्था राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याचे तत्कालीन शिक्षणमंत्री म्हणाले होते. पण, या संस्थांना कोणत्याही पक्षाचा टॅग लागलेला नाही. मी कोणतीही मागणी आतापयर्ंत केलेली नाही. शिक्षणमंत्र्यांकडे सीबीएसई स्कूलची परवानगी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सरचिटणीस निलिमा पवार यांनी यावेळी दिली.
0 टिप्पण्या