Header Ads Widget

शेतकर्‍यांवर दुबार पेरणीची वेळ

मृग नक्षत्राच्या सुरुवातीला सर्वत्र सलग ४ ते ५ दिवस चांगला पाऊस पडला. यामुळे बहुतांश भागातील शेतकर्‍यांनी अगोदर धूळ पेरणी व नंतर इतर पेरणी आटोपवून घेतली. मात्र, पेरणीनंतर पावसाने उसंत घेतल्यामुळे व दिवसभर कडक उन तापत असल्याने बियाणे जमिनीत जळल्या गेली. ज्या भागात बियाणे उगवली होती. तेथे आता तीव्र उन्हाने पीक मरून जात आहे. त्यामुळे, पश्‍चिम विदर्भातील शेतकर्‍यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. ज्या शेतकर्‍यांच्या शेतात पुरेश्या पाण्याची व सिंचनाची व्यवस्था आहे. त्यांनी कृत्रिमरित्या पाणी देऊन पिके वाचविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, ज्यांच्याकडे सिंचनाची सोय नाही, त्यांना दुबार पेरणीशिवाय पर्याय उरला नाही. काही शेतकर्‍यांचे सुरुवातीच्या अतिपावसाने पेरलेले बियाणे दडपल्या गेल्याची उदाहरणेसुद्धा आहे. आता गेल्या दोन आठवड्यापासून पावसाचा पत्ता नसल्याने दुबार पेरणीच्या धास्तीने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. कृषी विभागाच्यावतीने समाधानकारक पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र, दरवर्षीचा अनुभव असलेल्या शेतकर्‍याने कृषी विभागाच्या या आवाहनाने दुर्लक्ष केले. याशिवाय सुरुवातीच्या काळात हवामान खात्याने मूबलक पाऊस पडेल, असे भाकीत केले होते. त्यामुळे, अनेक शेतकर्‍यांनी हवामान खात्याच्या अंदाजाने पाऊस येणारच या विश्‍वासाने पेरण्या उरकून घेतल्या. मात्र, आता अत्यावश्यक असताना पावसाने गेल्या दोन आठवड्यापासून हुलकावणी दिली आहे. यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा दर गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त होता. तरीही शेतकर्‍यांनी जादा भाव देऊन चांगल्यात चांगले बियाणे खरेदी करण्याचा प्रयत्न केला. शिवाय खताचेही भाव वाढल्याने शेतकर्‍यांना यावर्षी पेरणीचा किमान दिडपट तरी खर्च आला आहे. सुरुवातीला मोठी लागत लागल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला आहे, अशा परिस्थितीत जर दुबार पेरणीचे संकट ओढावले तर शेतकर्‍यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. जूनमध्ये बरसलेल्या पावसाने शेतकर्‍यांची आशा पल्लवित झाली होती, आता मात्र शेतकरी वर्गात निराशेचे वातावरण आहेत. प्रचंड महागाई कशीबशी शेतकर्‍यांनी शेती उभी करून पेरणी केली आहे या हंगामात निसर्गाने साथ दिली तर शेतकरीचे उत्पादन वाढेल या आठवड्यात पाऊस येईल असा अंदाज आहे व हा अंदाज खरा ठरावा. यंदा पाऊस चांगला पडेल, असा अंदाज वर्तविला गेला होता. यंदा मात्र जूनचे सुरवातीला पाऊस चांगला होऊन गेला. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंद पसरला. शेतकर्‍यांची आशा वाढून पेरणीच्या कामाला वेग आला होता. पहिल्या टप्प्यात सोयाबीन, तुर, कापसाच्या पेरण्या झाल्या आहेत. आता मात्र पाऊसाने दांडी मारल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली तरीही एकूण स्थिती समाधानकारक नाही. पावसाची दांडी मारल्याने धाकधूक शेतकर्‍यांना अस्वस्थ करीत आहे. तसेचपिकांना अंकुर फुटले पण आता हे अंकुर किडी फस्त करीत असून मातीमोल होण्याची भीती निर्माण झाली आहे. 
- प्रमोद बायस्कर
सौ लोकशाही वार्ता

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या