अमरावती : कोरोना प्रतिबंधक लसीचे जिल्ह्यात प्राप्त डोस संपूर्णत: वापरात आले असून, लस उपलब्धतेनुसार नियोजनपूर्वक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात लस वाया जाण्याचे प्रमाण शून्य टक्के आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.लोकसंख्येच्या तुलनेत लस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने अधिकाधिक पुरवठ्यासाठी सातत्याने पाठपुरावा होत आहे. जिल्ह्यात अठरा वर्षांवरील 22 लाख 86 हजार 156 नागरिक असून, 6 लाख 9 हजार 600 नागरिकांना पहिला डोस, तर 2 लाख 9 हजार 522 नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात लस प्राप्त झाल्यानंतर आतापर्यंत दोनच दिवसांत संपूर्णपणे वापरात आणण्यात आली आहे व नियोजनानुसार गतीने लसीकरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
जिल्ह्यात 7 लाख 92 हजार 520 डोस प्राप्त झाले. आतापर्यंत 8 लाख 19 हजार 122 लसीकरण झाले. अनेकदा व्हायलमध्ये एकदोन डोस अतिरिक्त आढळल्याने तोही डोस वापरात आणण्यात आला. त्यामुळे लस वाया जाण्याचे प्रमाण शून्य तर होतेच, शिवाय व्हायलमधील अतिरिक्त डोस वापरात आणल्याने प्राप्त डोसपेक्षा 26 हजार 602 लसीकरण अधिक होऊ शकले. दक्षतापूर्वक नियोजनामुळे केरळच्या धर्तीवर जिल्ह्यातही लसीकरण कार्यक्रम परिपूर्ण पद्धतीने अंमलात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रेवती साबळे यांनी सांगितले.
Copyright (c) 2022 Gaurav Prakashan All Right Reseved
0 टिप्पण्या