Recent in Technology

Advertisement

Breaking News

जिद्द व परिश्रमाचे दुसरे नाव उत्तम सोनकांबळे

  उभ्या आयुष्याला संघर्षमय खाचखळगे लाभले असतांना अत्यंत प्रतिकूल परिस्थीतीतून परिश्रमाच्या जोरावर उत्तम कांबळे ह्यांनी राज्यसेवा परिक्षेत यश मिळविले. आता ते औरंगाबादला सहसंचालक (कोषागार विभाग) पदावर कार्यरत आहेत. आयुष्याला उजेडवाट मिळाली आहे. मात्र ह्या वाटेवर पोहोचण्यासाठी त्यांनी केलेला प्रवास कुणालाही चकित करुण टाकणारा 'आश्वासक' असाच आहे. जाणून घेऊ या त्यांच्या प्रवासाविषयी ...

  दोन वेळच्या भाकरीच्या शोधात त्यांच्या वडीलांनी मुखेड तालुक्यातील शिकारा हे गांव गाठलं. शिकारा गावची त्यावेळेची वस्ती फारतर एक हजार लोकांची. गावात घर नव्हतं, शेती नव्हती, उत्पन्नाचं साधन नव्हतं. तरीही मुलांना त्यांनी शाळेत घातलं. खेड्यापाड्यातील आंबे, पपई, फळे, भाजीपाला ठोकभावाने विकत घ्यायचा व गावापासून ८, १० किलोमिटर अंतरावर मुखेडला नेवुन, बाजारात दिवसभर विकायचा. अंधार पडण्याच्या आत ज्वारी-बाजरी विकतघ्यायची ती तिथेच निसुन, दळून घरची वाट धरायची. ही त्यांची संघर्षमय कहाणी. पण अशा परिस्थितीतही त्यांनी कधीच मुलांना घरी ठेवलं नाही. लाख अडचणी आल्या तरी चालेल पण माझ्या मुलांचं शिक्षण बंद करणार नाही असा दृढनिर्धार त्यांनी मनाशी केला होता. उत्तमराव हे परिवारातले सर्वात मोठे. आई-वडीलांना होणाऱ्या त्रासाची त्यांना कल्पना येवू लागली होती. जाणिवेच्या पातळीवर वय पोहोचलं तेव्हा त्यांनीही आई-वडीलांची मदत करायला सुरुवात केली. सुटीच्या दिवसात ते वडिलां बरोबर तालुक्याला बाजारात जात. वडिलांच्या सोबत दिवसभर भाजीपाला विकण्याचे काम करीत. कापूस वेचणे, शेतात निंदणे, मिरच्या तोडणे, आंबे राखणे, खत टाकणे अशी अनेक कामं त्यांनी केली. तत्कालीन आ. मधुकरराव घाटे यांनी सुरु केलेल्या तालुक्याच्या वसतीगृहात राहून उत्तम सोनकांबळे यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर आय. टी.आय. फिटर कोर्स पूर्ण केला. आय.टी.आय. नंतर नांदेड शहरातील शिप्टा कोटेड स्टिल्स् ह्या कंपनीत त्यांना ज्युनिअर ऑपरेटर म्हणुन नोकरी मिळाली. शिप्टा मध्ये काम करीत असतांना कामगांरानी पगारवाढीच्या मुद्दयावरुन त्यांच्या नेतृत्वात संप पुकारला. व्यवस्थापनाने आपसात मिटवुन घेण्यासाठी त्यांना पैशाचे आमिष दाखवले. पण त्यांनी ते धुडकावून लावले.

  कामगांराच्या प्रश्नावर लढल्यानं उत्तमरावांवर पुढे नोकरी सोडण्याची वेळ आली पण त्यांनी तडजोड केली नाही. १९८९ ला शिप्टा सुटल्यानंतर फारच दाहक वास्तव त्यांच्या वाट्याला आले. पण या दरम्यान त्यांच्या आयुष्यात एक महत्वपुर्ण घटणा घडली. बी. एन. खतगांवकर नावांचे त्यांचे वर्गमीत्र स्पर्धा परिक्षेत पास होऊन तेव्हा नुकतेच नांदेड पालिकेत परिविक्षा अधिकारी म्हणुन रुजू झाले होते. त्यांनी स्पर्धा परिक्षा कशी असते? ह्याबाबत त्यांना मार्गदर्शन केले. आपल्या सारखाच आपला एक वर्गमीत्र पास होऊ शकतो तर आपण का नाही ही जाणिव त्यांना या दरम्यान झाली. इथुनच त्यांनी अभ्यासाला सुरूवात केली. त्यांचे सासरे एन.एल. हिवाळे ह्यांनी त्यांना या दरम्यान मदत केली. मधु गिरगावकर उपअभियंता वसमत, आर. के. देशपांडे, वृंदा पाटील ह्या सहकाऱ्यांनी पुस्तके, नोटस दिल्या. रात्ररात्र त्यांनी त्या उतरवुन घेतल्या. १८, १८ तास अभ्यास केला. जालना येथील बद्रीनारायण बारवाले वरिष्ट महाविद्यालयात त्यांनी काही काळ प्राध्यापकाची नोकरी केली. १९९६ ला चाचणी आणि मुख्य अशा दोन्हीही राज्यसेवा परिक्षा ते पास झाले. खात्यातर्फे त्यांचे प्रशिक्षण झाले. मुंबईत तीन महिणे थेअरी आणि दिड महिणा प्रॅक्टीकल असं त्यांच्या प्रशिक्षणाचं स्वरुप होतं. पुण्याच्या यशदा संस्थेत १५ दिवस, त्यांनतर नांदेडच्या कोषागार कार्यालयात ३ महिने प्रात्यक्षिक प्रशिक्षणानंतर बुलडाणा येथे ते जिल्हा कोषागार अधिकारी पदी रुजू झाले. एकदाचा संघर्ष संपला.

  शिक्षण घेत असतांनाच त्यांनी धाकट्या भावांच्या शिक्षणांकडेही लक्ष दिले. धाकट्या भांवडांपैकी एक भाऊ आता डॉक्टर आहे तर दुसरा पदविधर आहे. उत्तम सोनकांबळे आपल्या आयुष्याच्या ह्या टप्यावर अत्यंत समाधानी आहेत. ते म्हणतात की, 'माझी परिस्थिती वेगळी होती. तरी देखिल मी त्यावर मात केली. आजच्या तरुणांनी परिस्थितीकडे न बघता जिद्द आणि मेहनतीने अभ्यास करून वेळ, वेग आणि अॅक्युरसी निश्चित केली तर उच्च पदी पोहचु शकतात!' कोणत्याही तरूणाला प्रेरणा देणारीच ही त्यांची कहानी आहे. प्रशासकीय सेवेत केवळ स्वतः पुरते न राहता सामाजिक जाणिवेने ते कार्यरत आहेत. अनेक व्यक्ती, संस्थांना त्यांनी मदत केली. भूतकाळापासुन प्रेरणा घेत वर्तमान बदलले. आपण प्रतिनिधी म्हणून प्रशासकिय सेवेत आहोत याची कायम जाणिव ठवेली. त्यामुळेच प्रशासनात त्यांचा दबदबा आहे. शासकीय सेवेत मा. उत्तमराव सोनकांबळे यांनी सामाजीक भाण कायम राखले आहे. काही काळ बुलडाण्यानंतर नांदेडला बदली झाल्यांनतर त्यांनी तिथे आंबेडकरवादी मिशन केंद्र उभारणीत मोठे योगदान दिले. गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेसाठी योग्य मागर्दशन देणाऱ्या या संस्थेची स्थापना दिपक कदम यांनी केली. त्यांना या कामी खूप मदत केली. आजही त्यांचे हे कार्य सुरूच आहे.

  बुलडाणा येथे असतांना त्यांनी अर्चना वानखडे यांना स्पर्धा परिक्षेविषयी मार्गदर्शन केले. यातून प्रेरणा घेऊन बुलडाण्याच्या या भगिनिने पुढे भारतीय प्रशासन सेवेत प्रवेश केला. आपल्या साध्या साध्या शब्दातून लोकांना उभारी मिळते, ते आपण केले पाहिजे असेही ते म्हणतात. आयुष्याच्या या टप्प्यावर मागे वळून पाहतांना मी समाधानी आहे असेही ते आवर्जून सांगतात. नांदेड नंतर हिंगोली, नाशिक आणि अमरावती या ठिकाणीही त्यांची काही काळ सेवा झाली. सद्या ते औरंगाबाद या ठिकाणी कोषागार विभागात विभागीय संहसंचालक म्हणून कार्यरत आहेत. आजवरच्या सेवा काळात त्यांनी माणसे जोडण्याचे मोठे कार्य केले. बुलडाणा येथे असतांना त्यांनी वामनदादा कर्डक यांच्या गितांचे पुस्तक संपादनात महत्वपूर्ण भूमिका निभावली. याशिवाय धम्म परिषदांच्या आयोजनातही त्यांच्या सहभाग होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण गोरगरिब - वंचित यांच्या उन्नतीसाठी खर्च केला. आपण आहे त्या साधणांच्या - शक्तीच्या आधारे आपल्या परिने सामाजिक जाणीव जपत शक्य तितकी मदत करित जीवन जगले पहिजे असे ते मानतात. प्रशासकीय कामात त्यांचा हातखंडा असून खात्याअंतर्गत ते लोकप्रिय आहेत. आजही त्यांना प्रतिकूल परिस्थितीची जाणीव आहे. त्यामुळेच प्रशासकीय सेवेत राहून ते समाज परिवर्तनाच्या कार्यक्रम उपक्रमांत आनंदाने सहभागी होतात.

  -रविंद्र साळवे
  बुलडाणा
  मो. 9822262003

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code