अमरावती : जिल्ह्यात वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. कोविडकाळात आधीच विविध क्षेत्रांचे नुकसान झाले. आता खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. अशा काळात वीज पुरवठा खंडित होऊन शेतकरी बांधव, नागरिकांची गैरसोय होता कामा नये. जिल्ह्यात सर्व ठिकाणी वीजपुरवठा अखंडित ठेवण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.
महावितरणकडून राबविण्यात येणा-या विविध योजनांबाबत बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी पवनीत कौर, अधिक्षक अभियंता दिलीप खानंदे व महावितरणचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, बिल न भरल्याचे, तसेच इतरही अनेक कारणे दाखवून वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या सतत तक्रारी येत आहेत. वास्तविकत: कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांचे नुकसान झाले. त्यामुळे याबाबत संयमाने व संवेदनशीलपणे परिस्थिती हाताळण्याची गरज आहे. नागरिकांची परिस्थिती जाणून टप्प्याटप्प्याने रक्कम वसूल करता येणे शक्य आहे. त्याबाबत शासनाच्याही सूचना आहेत. मात्र, कुठेही पुरवठा खंडित होऊन नागरिकांची गैरसोय होता कामा नये. दुरुस्ती किंवा अन्य कारणासाठी वीजपुरवठ्यात काही काळ कपात होत असेल तर त्याचे वेळापत्रक जाहीर केले पाहिजे जेणेकरून नागरिकांना आधीच कल्पना येऊन त्यांची गैरसोय टळेल.
महावितरणला उच्चदाब वितरण प्रणाली योजनेंतर्गत 50 कोटी व जिल्हा नियोजनांतर्गत 15 कोटी रूपये निधी मिळाला आहे. याअंतर्गत सावळापूर, बेलोरा उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले असून, आष्टीचे कामकाज प्रगतीपथावर आहे. चांदूर रेल्वे तालुक्यात 33/11 केव्ही राजुरा उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. उर्वरित कामांनाही गती देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
0 टिप्पण्या