• Mon. Sep 25th, 2023

समग्र परिवर्तनासाठी:- “उजेडाच्या दिशेने निघालेली कविता !”

    साहित्याच्या आरशात समाजाचा बदलता चेहरा प्रतिबिंबित होत असतो. साहित्य हे जीवनाचे चित्रण असते. मानवी भावनाविष्काराला त्यात अर्थातच प्राधान्य असते. भावनाविष्कार सयंत असतो. साहित्यातून आनंद निर्मिती व्हावीच पण उदबोधनही व्हावे अशीच भूमिका साहित्यिकाची असते. हीच भूमिका घेऊन एक साक्षेपी समीक्षक व सर्जनशील साहित्तीक कवी अरुण हरिभाऊ विघ्ने (मु.रोहणा ता. आर्वी जि.वर्धा )समग्र परिवर्तनाच्या प्रवासासाठी उजेडाच्या दिशेने निघालेले आहे. “मी उजेडाच्या दिशेने निघालो” हा त्यांचा चौथा काव्यसंग्रह. सुरेख मांडणी आणि नाविन्यपूर्ण काव्यरचना हे या संग्रहाचं वैशिष्ट्य. तत्पूर्वी ‘पक्षी’ (२०००), ‘वादळातील दीपस्तंभ ‘(२०१९), ‘जागल ‘ (२०२०) असे तीन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहे. या काव्यसंग्रहातील काव्यातून त्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व दृष्टिपटलावर येतेच , सोबतच त्यांच्या परिवर्तनवादी विचाराचा परीघही या संग्रहात दुग्गोचर होतो. तथागत भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज,बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा, भिमाई- सावित्रीमाई-रमाई यांना प्रेरणास्थानी ठेवून जीवनातील सर्वच स्तरावरचे चित्रण त्यांनी आपल्या संग्रहात बेधडकपणे रेखाटले आहे. शिस्त परिश्रमशीलता, प्रमेयनिश्चिती,सुबोधता, मुद्देसुदपणा इत्यादी गुण त्यांच्या काव्यातून व्यक्त होतात. साहित्य वा काव्यनिर्मिती ही मानवी प्रवृत्तीवर अवलंबून असते. समरस काव्यनिर्मितीसाठी सूक्ष्म आणि विस्तृत अशा अवलोकनाची तितकीच आवश्यकता असते. ते कवीच्या अंगी ओतप्रोत भरलेले आहे. काव्यरचना प्रसंगानुरूप आणि वस्तुस्थितीला धरून असायला हवी तरच ती माणसाच्या काळजाला जाऊन भिडते.अन आपलंसं करते. “मी उजेडाच्या दिशेने निघालो” यातील काव्यरचना या कसोटीत पुर्णतः उतरलेल्या आहेत. समाज मनाचा ठाव घेणाऱ्या आणि समाजाला योग्य दिशा देण्याची ताकद त्यांच्या काव्यरचनेत नक्कीच आहे.

    Thank you for reading this post, don't forget to subscribe!

    कवीसाठी वऱ्हाडी भाषा जीव की प्राण आहे. म्हणूनच त्यांनी संपूर्ण वऱ्हाडी भाषेतच “जागल” ची निर्मिती केली.अस्सल वऱ्हाडीचा तडका असलेल्या “जागल” ने कवीला साहित्य प्रांतात “जागलकार” म्हणून स्वतंत्र अशी ओळख करून दिली. हाच बाणा त्यांनी “मी उजेडाच्या दिशेने निघालो” या काव्यसंग्रहातही जपला आहे. दयन दयल भिमाईनं,पोरी जरा ऐक माझं,माय सुखाची सावली, माया बापाले सांगजो,उजेळाचं झाळ आलं,या व-हाडी बोलीभाषीक रचनेतून त्यांची वऱ्हाडी प्रती असलेली आस्था/प्रेम अधोरेखित होते.उखय, उजेळ, झाळ, आईस्य, फय, इज, मायी, आमी, मले, दयनं, दयल, कावले, दयते, उजाळलं, घळोलं, नाई, निगते, दावल, जवा, कवा, कितीक, सयद, कायजात, गोयाले, गोया तुरपाई, गोधडी, भराटीचा काटा, गोफनीचा गोटा, सोटा, पुरान्या, दवंडी ढिम्म, तुंगे, मेटकर, गेचूड असे शब्दप्रयोग करून गावाकडच्या मातीपासून दुरावलेल्या अन वऱ्हाडी भाषेचा विसर पडलेल्या उच्चविभूषितांसह सर्वांनाच आपलंसंच करून गावाकडच्या आठवणीत रमविते.

    काव्यसंग्रहात कवींनी शोषित,पीडित,वंचित,उपेक्षित समाजाच्या व्यथा, दुःख, दारिद्रय,हालअपेष्टा,यातना, वेदनांना वाट मोकळी करून दिली.बहुजन समाजाच्या अंधारमय आयुष्यात उजेड पेरण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या महापुरुषांच्या विचारांचा वारसा समर्पकपणे पेलताना “ज्योतिबा” ही रचना खुपकाही सांगून जाते.

    “तुम्ही झुगारलेत गुलामीचे बंध
    तोडलेत जातीभेदाचे साखळदंड-
    आज होतोय तुमचा जयजयकार सर्वच स्तरातून
    मात्र आम्ही कृतघ्न होऊ नयेत तुमच्या परिवर्तनाशी–एवढच वाटतंय.”

    स्त्रियांसह उपेक्षीतांचे अंधारकामय जीवन उजेडप्रवाही करण्यासाठी फुले दाम्पत्यानी केलेल्या प्रयत्नांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याच्या चौकटीत बसवून बळकटी दिली. आज बहुजनांची व स्त्रियांची गगनभरारी ही त्यांच्याच कार्याचे फलित आहे. परिवर्तनाची ही लढाई निश्चितच प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारी आहे.

    बाबासाहेबांनी लाखो अनुयायांना तथागताच्या विज्ञानवादी बौद्ध धम्माच्या छत्रछायेखाली आणले. ज्या भूमीवर धम्मचक्र प्रवर्तनाचा पहिला प्रयोग केला ती दीक्षाभूमी खऱ्या अर्थाने बौद्धांसाठी ऊर्जाभूमी ठरली . त्या ऊर्जेनेच लाखो अस्पृश्यांच्या झोपडीत उजेड परावर्तित झाला. ही रक्तविरहीत वैचारीक क्रांतीनेच अनेकांच्या आयुष्यातील अंधार हद्दपार केला. याविषयी सर्वसामान्यांची ही बोलकी प्रतिक्रीया कविच्या लेखनीतून उमटताना दिसते.

    “उजेडाच झाळ आलं गळेहो
    बुद्ध गयेतून
    कितीक पिळ्याचा अंधार गेला
    माया झोपळीतून.”

    ऊर्जादायी दीक्षाभूमी, बोधिवृक्षाखाली, करुणाकाराच्या पाउलखुणा, प्रकाशपर्वाचा साक्षीदार या रचना बुद्धाच्या मानतावादी विचाराशिवाय जगाला पर्याय नसल्याचे सूर्यसत्य मांडते. बाबासाहेबांच्या या क्रांतीला प्रमाण मानून त्यांचे अनुयायी हा विचार पुढे नेण्याचे निश्चित करताना दिसतात. त्या अनुषंघाने कविच्या पुढील ओळी आश्वासक वाटतात.

    ” बाबासाहेब !
    तुम्हीच आमच्या अस्तित्वाचं मूळ
    तुम्हीच आमच्या जाणीवांच सूर्यकुळ
    तुम्हीच आमच्या डोक्यातील प्रज्ञा
    तुम्हीच आमचे मुक्तिदाते आहात.
    फक्त तुमच्या कार्यास वाहून घेऊ इच्छितो
    चळवळीच्या रथाला पुढे नेऊ इच्छितो”

    कविच्या मनातील भाव आणि ध्यास आंबेडकरी चळवळीला गतीमान करण्यास ऊर्जादायी व साहाय्यभूत ठरणारा आहे.
    माता भिमाई बाबासाहेबांसाठी कायम प्रेरणास्रोत राहिल्यात.अनिष्ट प्रथा परंपरांचे आणि अस्पृश्यतेचे चटके बाबासाहेबांच्या कुटुंबानेही सहन केलेत.अस्पृश्यता निवारणाशिवाय समाजाचा उद्धार नाही हे भिमाईने त्याचवेळी बाबासाहेबांच्या बालमनावर रुजविले होते. तीच क्रांतीची मशाल डॉ. आंबेडकरांनी तेवत ठेवत समग्र परिवर्तन घडवून आणले. हाच भाव कवी समर्पकपणे आपल्या काव्यात व्यक्त करताना दिसतात.

    “जातीभेदाले मायनं
    जवा जात्यात दयलं
    गाणं संविधान गात
    साखळदंडाले तोडलं”

    आईची महती ब-याच साहित्यातून व्यक्त होत आली आहे. त्या तुलनेत बाप तितकाच सीमित राहिला.आई वात्सल्याचं, प्रेमाचं,त्यागाचं आणि समर्पणाचं प्रतीक आहे .तर बाप संकटे,वादळे,वेदना, दुःख,झेलणारा आणि पचविणारा असतो.हे विसरून चालणार नाही.जीवनात बापाचं स्थान अढळ आहे. माय बरोबरच उपेक्षित राहिलेल्या बापाचं अप्रतिम असं वर्णन कवींनी आपल्या कवितेत केल आहे. कवी बापाला अर्थमंत्री, नियोजनमंत्री,प्रधानमंत्री अशा भूमिकेतून बघतात.कवी म्हणतो बाप घराचा रखवालदार अन मुलाच्या भविष्याचा शिल्पकार आहे.बाप थंडीतली ऊब पावसातली छत्री,लेकराची सावली आणि चालती फिरती बँक असते.गणितज्ञ आणि कृषीतज्ञही असतो बाप. कवी आई-वडीलांना सर्वोच्चस्थानी ठेवून अनेक प्रतिमांची माळ वाहताना “माय सुखाची सावली ” या व-हाडी रचनेत दिसतो.

    “माय चुलीतला जाय
    माय लंगळ्याचा पाय
    बाप घराचं छप्पर
    माय आळ्याचा आधार”

    भारतीय संविधान भारत देशासाठी अमुल्य अशी देणगी आहे.मानवतावादी विचारांचं प्रतिबिंब म्हणजे भारतीय संविधान.भारतीय संविधानानेच विषमतावादी समाजरचनेला छेद देत देशात आर्थिक,सामाजिक सांस्कृतिक,राजकीय,धार्मिक क्षेत्रात समानता घडवून आणली. कवी संविधानास “मानव मुक्तीचा जाहीरनामा” संबोधतो . संविधान या देशाचा एक मार्गदर्शक दस्तऐवजच नाही ,तर तो देशवासीयांचा स्वाभिमान आहे. ती मानवतेची जिवनमूल्ये रुजविणारी एक प्रक्रिया आहे. म्हणूनच आम्ही त्याला जपलं पाहिजे.कुणाची तरी वक्रदृष्टी आम्ही भेदली पाहिजे. त्या दिशेनेच आम्ही चाललो पाहिजे .असे कवी आवर्जून समस्त भारतीयांना आवाहन करताना दिसतात.

    कवी सर्वसाधारण कुटुंबातील आणि ग्रामीण भागातील असल्याने कवींनी जे भोगले,सोसले,अनुभवले,दृष्टीस पडले तेच त्यांनी काव्यात शब्दबद्ध केले आहे. आपण स्वातंत्र्य,समता,बंधुता व न्यायाच्या तत्वाचे पाईक असतानाही जात,पोटजात ,आणि गटा-तटाचे तुंगे(काही विशिष्ट लोकांचा समूह) करून राहतो आहे .आम्हाला यापुढे तुंगे करून राहता येणार नाही. कारण धम्मदीक्षेनंतर आम्ही फक्त बौद्ध आहोत , हा विचार जपला पाहिजे. असे सांगतात कवी आपल्या मनातील चीड व्यक्त करतात.

    “ठरवून घेतले आहेत
    इथे आपापले तुंगे मेटकरानी
    केल्यात, सीमा कडीबंद
    घुसू नये कुण्या अनामिकाने म्हणून.”

    कवींनी सामाजिक जाणिवेतून मनातली सल व्यक्त केली आहे . सामाजिक-आर्थिक विषमतेची दरी लक्षात घेता श्रीमंतापेक्षा गरिबांना आर्थीक सहकार्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. परंतु धनीक अधिक धनीक होतो आणि गरीब आणखी दारिद्र्याच्या खाईत लोटल्या जातो . ही वास्तवता मांडताना कवी उद्वेगाने म्हणतो…

    “प्रकाशानेच दिपतात जेथे डोळे
    तेथे तेल कशाला वाया घालवायचे
    झोपडीत नसते एखादीही पणती
    तेथे दिव्यांनी का नाही पेटायचे ?”

    कोरोना सारख्या महामारीने संपूर्ण जगाला कवेत घेतले. कष्टकरी,शेतकरी शेतमजुरांचे जिने कठीण झालेत. उद्योगधंद्यातील मशीनरीची चाके थांबलीत.लाखो लोकांच्या हातचे काम गेले.लोकांच्या हाताला काम नाही.खर्चासाठी दाम नाही.अशा वेळेस जीवन जगायचे कसे? एवढेच नव्हे तर स्पृश्य- अस्पृश्यतेतील भेदभावाचं गांभीर्यही या महामारीतील सामाजीक विलगीकरणामुळे ब-याच लोकांना कळून आलं .कवींनी कोरोना आणि जातीयता यांच्या सहसंबंधाकडे वाचकांचे लक्ष वेधले आहे.

    “पण आज आलेल्या कोरोणाच्या संकटानं
    स्पृश्य-अस्पृश्यत्तेच्या भेदाचं रहस्य उलगडलं
    काय असतात विलगीकरणाच्या वेदना
    आज त्यांनाही जाणवू लागलं “
    किंवा
    “असे जातीयतेचे विषाणू बरेच दिवस पचवलेत आम्ही
    पण एका डॉक्टरानं अशी लस शोधून काढली की,
    त्याच्या प्रज्ञा उर्जेन जाळून टाकलेत सारे वळवळणारे विषाणू !”

    समाजाने आता तरी आपली मानसीकता बदलली पाहिजे. या जगात कुणीच कुणाचं नसतं. माणुसकीच आपला खरी धर्म असला पाहिजे. मानवी जिवन हे एका शन्यापासून दुस-या शून्यापर्यंतचा प्रवास आहे . खाली हात आया है, खाली हात जाएगा . हे जिवनातलं कटुसत्य आहे .याची कोरोणाने जाणीव करून दिली आहे. धन दौलत कमविण्यापेक्षा माणुसकी कमविने,माणसं जोडणे, परोपकार, त्याग करणे हेच महत्वाचे आहे. शेवटी मृत्यूनंतर आपल्यासोबत काहीही येत नाही . आपलं नाव व कर्मच येथे शिल्लक राहते.

    “माणसं जोडून जा
    नाव ठेवून जा
    परोपकार करून जा
    सुखी होऊन जा “

    अतोनात स्वार्थाने माणसांपासून दूर जाण्यापेक्षा ,ज्यांच्यासाठी आपण एवढा आटापीटा करतो ,ते तरी आपले होतात का? त्यांच्या पायावर उभं करून देऊन त्यांना धडपडू द्या !
    शेतकऱ्यांची दैनावस्था आणि त्याची होणारी ससेहोलपट बघून कवीचे मन उद्दीग्न होते. कवी स्वतः शेती-मातीत राबल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या असह्य वेदनांची जाणीव आहे. तीच व्यथा “माझ्या जन्मदात्यानो,माझ्या मातीची उद्दीग्नता,काय घेऊन जाशील? रानपाखराची माय,गणित बळीच्या आयुष्यातलं,” या रचनेतून दिसून येते. बळीराजा शेतीमातीत राबराबतो.सुखी संसाराचे स्वप्न रंगवितो.मात्र त्यांनी मांडलेलं गणित नेहमी अचूक ठरतेतच असं नाही.

    “स्वप्नातील गणित अनेकदा चुकताना अनुभवलं असतं त्यांनं,
    तरी पुन्हा पुन्हा तो नव्यानं मांडत जातो शेती
    माती+बियाणं+पाऊस+मेहनत=वार्षिक उत्पन्न,
    वार्षिक उत्पन्न-उत्पादन खर्च-कर्ज=शुन्य,
    या शून्यानं संसाराचा अंतिम हिशेबही शून्यच उरते !”

    जगाच्या पोशिंद्यची होणारी होरपळ आणि शासनाच्या धोरणाची चिरफाड अचूकपणे यातून केलेली दिसते.भारतीय संस्कृती ही उदात्त संस्कृती म्हणून सर्व जगभर परिचित आहे.भारतीय संस्कृती पूज्यस्थानी असतानासुद्धा पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरनानं स्त्रियांची /मुलींची सुध्दा मुस्कटदाबी व्हायला लागली. स्त्रियांची होणारी ही हेळसांड व दररोच्या जिवघेण्या अमानवीय घटना कवीला स्वस्थ बसू देत नाहीत.

    “कुठे हरवली माणुसकी?
    कुठे हरवली आपुलकी?
    कुठे हरवली संस्कृती?
    का द्यावी तिनेच आहुती?”

    किंवा

    आता तुलाच झाशीची राणी
    अन फूलन देवी बनावं लागेल
    स्वतःचं सुरक्षाकवच आता
    स्वतःलाच बनावं लागेल !”

    स्त्री असो वा मुलगी आता सुरक्षित राहिली नाही. दिवसाढवळ्या होणारा अन्याय-अत्याचार आणि बलात्कार ही नित्याची बाब झाली आहे. महिला सुरक्षितता व सक्षमीकरणाचे विषय केवळ भाषणबाजी आणि साहित्यापुरतेच मर्यादित राहिले आहेत काय ? अशी शंका आल्यावाचून राहत नाही. स्त्रियांवर होणारा हा अन्याय अत्याचार असह्य आहे. म्हणून स्त्रियांनी व मुलींनी स्वतःचं सुरक्षाकवच स्वतःच बणलं पाहिजे.अशी भावना कवी नाईलाजास्तव व्यक्त करताना दिसतात. काव्यसंग्रहातील सर्वच रचना समग्र परिवर्तनाच्या दृष्टीने आलेल्या दिसतात. त्यांनी अष्टाक्षरी, अभंग, मुक्तछंद, गीत आणि गझल असे सर्वच प्रकार हाताळलेले आहेत.मध्यमा प्रकाशन नागपूरद्वारा हा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला.यात एकूण ८३काव्यरचना आहेत.शिर्षकास न्याय देणाऱ्या मुखपृष्ठासाठी आणि अंतरंगातील रेखाचित्रासाठी अनुक्रमे अरविंद शेलार आणि संजय ओरके, प्रशांत डोंगरदिवे यांनी जीव ओतला आहे. डॉ.भूषण रामटेके यांची प्रस्तावना काव्यसंग्रहाची उंची आणि अंतरंग उलगडण्यास साहाय्यभूत ठरणारी आहे.एकूणच सखोल चिंतन आणि सामाजिक जाणीव ठेवून हा काव्यसंग्रह जीवनाच्या विविध पैलूंना स्पर्श करणारा आहे. आंबेडकरी विचारांचा वारसा पुढे नेणारा आहे. म्हणूनच कविला आता भीमाच्या बागेची राखन करायची आहे जागल्या होऊन ! त्या दिशेने निघालेल्या कविला व त्यांच्या कवितेला उजेडप्रवाही प्रवासासाठी व पुढील सकस साहित्य निर्मितीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!

    प्रा. डॉ.नरेश शं.इंगळे
    अर्थशास्त्र विभाग प्रमुख
    श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय,पिंपळखुटा
    ता.धामणगाव रेल्वे
    जि.अमरावती
    मोबाईल– ९९७०९९१४६४
    कावितासंग्रह : मी उजेडाच्या दिशेने निघालो
    कवी : अरुण हरिभाऊ विघ्ने
    मोबाईल : ९८५०३२०३१६
    मूल्य: २३० रुपये
    प्रकाशन: मध्यमा प्रकाशन,नागपूर

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,