मुंबई : माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतिनिमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकर्यांना मदतीची हमी देतानाच केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारला काय करायचे ते करू द्या. त्यांना कोणतेही कायदे करू द्या, मात्र शेतकर्यांच्या हिताला धक्का लागेल अशी एकही गोष्ट महाराष्ट्रात होऊ देणार नाही. महाविकास आघाडी सरकार तुमच्यापाठी खंबीरपणे उभे आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
राज्यातील शेतकर्यांना उद्देशून बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार शेतकर्यांच्या हक्काचे सरकार असल्याचे म्हटले आहे. शेतकर्यांच्याच मेहनतीने राज्य, देश आणि जग चालत आहे. शेतकरी हाच राज्याचे वैभव आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकर्यांचा गौरव केला आहे. महाविकास आघाडी सरकार शेतकर्यांच्या पाठीशी आहे. अन्नदाता आणि जीवनदाता एकच आहेत, असे सांगतानाच राज्यावर आर्थिक संकट असतानाही हे सरकार शेतकर्यांना मदत करणारच, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठामपणे सांगितले.
राज्यातील शेतकर्यांनी नेहमीच प्रयोग करत राहिले पाहिजे. शेतकर्याने यासाठी प्रयोगशील होणे आवश्यक आहे असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशातील एका शेतकर्याच्या प्रयोगशीलतेचे उदाहरण दिले. उत्तर प्रदेशातील एका शेतकर्याने जपानमधील आंबा पिकवल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. शेतकर्यांनी प्रयोगशील होणे आवश्यक असून शेतकर्यांच्या प्रयोगासाठी महाविकास आघाडी सरकार मदत करेल, शेतीक्षेत्रासाठी जे जे काही करता येईल ते ते आम्ही करू, असे ठाकरे पुढे म्हणाले.राज्यातील शेतकरी कायमचा चिंतामुक्त व्हायला हवा आणि त्याच्यावर कर्जाचा डोंगर राहता कामा नये, असे सांगतानाच ज्या दिवशी शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहील, त्या दिवशी राज्यात हरित क्रांती झाली असे म्हणता येईल, असे मुख्यमंत्री शेवटी म्हणाले.
शेतकर्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही-मुख्यमंत्री
Contents hide