• Mon. Sep 25th, 2023

यशवंत अन् स्मशानातलं जेवण..!

  नेहमीच हसत राहणारा यशवंत माझा फारच जवळचा नातेवाईक होता. त्याची आई आणि माझे बाबा सख्खे मावस-बहीण भाऊ होते. नातेवाईक, शेजारी, आणि समवयस्क असल्याने आमचं बालपण सोबतच गेलं.
  तसं पाहिलं तर १९५६ च्या दरम्यान तुळसाबाईचे लग्न धानोरा ताथोड तालुका कारंजा येथील किसन गडलिंग यांच्याशी झाले होते. किसन सुद्धा मूळचा धानोर्याचा नव्हताच, कारण त्याचे सर्व नातलग अमरावती जिल्ह्यातील होते. त्यांचे मामा धानोर्याचे होते. मामाच्या आधाराने ते धानोर्याला आले होते. आणि लग्नानंतर किसन गडलिंग आपली सासू शेवंताबाई धवणेकडे राहायला आले होते. शेवंताबाई म्हणजे किसन वानखडेची सख्खी आत्या व माझ्या वडिलांची मावशी होती. सुरुवातीला माझ्या घराला लागूनच त्यांचं झोपडं होतं. परंतु १९७० च्या दरम्यान ते चौधरीच्या निंबावाल्या आवारात राहायला गेले, नंतर चिंचेखालच्या चौधरी यांच्या आवारात राहायला आला. (हनुमान मंदिरासमोरच्या) तेथेच शेवंताबुडी आणि त्याची चांदणी नावाची लहान बहीण सुद्धा मरण पावली.

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  किसनचं आडनाव जरी गडलिंग असलं तरी अख्या करजगावात ते “गोल्डन” या नावाने सुपरिचित होते. बंजारा बहुल गावात अशिक्षित जास्त होते. त्यांना गडलिंग आडनाव उच्चारायला कठीण वाटे. त्याकाळी हॉटेलमध्ये दोन प्रकारचा चहा मिळायचा एक स्पेशल आणि दुसरा गोल्डन बस एकदा रोहिल्यांच्या तोंडून गडलिंग ऐवजी गोल्डन नाव निघाले, आणि हे नाव मात्र साऱ्यांनाच सोपं आणि सोयीचं वाटलं आणि त्यांचीही नावाबद्दल काहीच हरकत नव्हती तेव्हापासून किसन गावात गोल्डन म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि गाव सोडेपर्यंत हेच नाव कायम राहीलं. किसन गडलिंग आणि तुळसाबाई यांचं अख्ख आयुष्य मोठ्या चौधरी यांच्या (उकंडराव) खटल्यात गेलं. तुळसाबाई, कोलामांची भिमी, फुला, यांचेबरोबर चौधरी यांच्या पातीवर (शेतात नेहमीकरिता कामावर) असायच्या तर किसनरावकडे गाई म्हशी चारण्याचे काम होते. एकदा माडी जवळच्या मोठ्या आवारात सकाळी शेन काढायला गेला असता हल्याने त्यांना फारच घोळसले होते.

  GOLDEN दिवाळीला दंढारवाईचे गाणे छान म्हणायचा, प्रसिद्ध गायक अत्ताउल्लाखानसारखा त्याचा आवाज होता..! गावातील कलापथकात तसेच दंढारीमध्ये तो लुगडे नेसून स्त्रीपात्र रंगवायचा सुंदर नृत्य करायचा. घरी त्याच्या साज शृंगाराची पेटी होती, त्यात त्याचे दंढारीला लागणारे सर्व साहित्य ठेवलेले असायचे. बाकी त्या काळातील तो एक चांगला कलाकार होता. करजगावकरांच्या मनोरंजनात त्याकाळी त्याने फार महत्त्वाची भूमिका बजावली.

  लहानपणी रामचंद्र चौधरी यांच्या निंबावाल्या आवारात यशवंत व मी गाणे ऐकायला जायचो. तेथे भला मोठा रेडिओ होता. त्यात एक बाई आणि एक माणूस असते आणि तेच गाणं म्हणतात असं मला तो सांगायचा. बळवंता पाटील धवस कायम रामचंद्र चौधरी यांचे सोबत असायचा चौधरी चेन स्मोकर होते..! ते फारच बिड्या ओढायचे..! एक संपली की दुसरी पेटवायचे..! आम्हाला तिथे ५/६ खाली माचिस पेटी मिळायच्या. कधीकधी त्यांनी अर्धवट फेकून दिलेली बिड्याची थोटकांचे त्यांची नजर चुकवून आम्ही झुरके मारायचो.
  यशवंत बालमित्र असल्याने सोबतच खेळणं, फिरणं, गाणे म्हणनं, पोहणं पत्ते खेळणं, गिल्ली दांडू , कांचे, कवड्या, दगडी गोळ्या खेळणं, शाळेत जाणं वगैरे वगैरे सोबतच चालायचं तशी त्याची शाळेत तेवढी गती नव्हती. चौथी तो नापास झाला होता नंतर शाळेत आल्याचं आठवत नाही. पैसे कांचे खेळताना त्याचा निशाणा इतका अचूक होता की, कोणी त्याच्याशी जिंकतच नसे. फक्त रोहिल्याचा करीम खेळात असला तरच काट्याची टक्कर व्हायची, अन्यथा सामना एकतर्फीच व्हायचा. तो हमखास जिंकायचाच. त्याकाळी यशवंत आणि मी चांगलेच गॅम्बलर होतो. रात्र-रात्रभर पत्ते खेळायचो. मात्र देविदास बरडे आम्हाला कधीच जिंकू देत नसे. एकदा तर बरडेने किटीच्या खेळात पहिला हात राणीची परेल दाखवून आणि तिसरा हात राणीचीच जुट दाखवून मोठा डाव जिंकला होता. आम्हाला तेव्हा तर काहीच कळलेच नाही. पण डाव संपल्या नंतर लक्षात आलं होतं की बावन पत्त्यात पाच राण्या आल्या कुठून ? येनकेन प्रकारेन तो आम्हाला लुबाडायचा असो..!

  १९७१ सालची आठवण जरी आली की, आजही अंगावर काटा उभा राहतो. संपूर्ण देशच दुष्काळाच्या आगीत होरपळत होता. दुष्काळात लोकांची मोठ्या प्रमाणात उपासमार झाली. लोकांना मायलो (लाल रंगाची) ज्वारी खावी लागली. जनावरांचे खाद्य म्हणून अमेरिकेकडून आयात केलेला जव गहू खाल्ला. मोहफुल, अंबाडी भाजून खाल्ली, कच्चे बेल उकडून खाल्ले. बोरीखाली ढेप विकणारा यायचा त्यांच्याकडून शेंगदाण्याची ढेप विकत घेऊन लोक खायचे. लोक ओंजोळभर घुगर्यावर दिवसभर काम करायचे. रिकाम्या पोटाला कशाचेच वावडे नसते. दुष्काळात आम्ही काय काय नाही खाल्लं? अन् पचवलं विचारूच नका. त्याची कल्पना सुद्धा करवत नाही. आंबील, घुगऱ्या, उकळलेले बेल, फांदीची भाजी, तरोट्याची भाजी, अक्षरशः मुर्दाड सुद्धा ! जव गव्हाच्या पोळ्याचा घास अन्ननलिकेतून रूतत गेल्यासारखा वाटायचा. फांदी, तरोटा किंवा अंबाडीची भाजी उकडून त्यात थोडे पीठ टाकून भाकरी केली जायची ती खाल्ल्यावर हिरव्या चाऱ्यावरील जनावराच्या शेना सारखीच विष्ठा असायची. झाडाचे कच्चे बेल उकडून खायचो त्यावेळी शौचास फारच त्रास व्हायचा. माय आमच्यासाठी मोठ्या गंजात शेर दीडशेर पीठ वरायची त्यात मीठ टाकून उकळी आल्यावर जर्मनच्या परातीत आम्हाला आंबील प्यायला द्यायची. तर कधी उकळत्या पाण्यात जाडं भरडं पीठ टाकून त्यांच्या कन्या बनवायची. भाकर कधीमधीच डोळ्यांनं दिसायची.

  त्या काळी बरेच लोक मेसकामायची पूजा करायला जायचे. तेथे खारीक, बदाम, हळकुंड, चिकण सुपारी,आणि पैसे सुध्दा ठेवायचे. कोणी अंडे पण ठेवायचे.कधी कधी तर नवसाचा कोंबडा सुद्धा सोडायचे ते घरून पाहताच आम्ही मेस्कामाय जवळ घुटमळाचो आणि पूजा करणारे जाताच आम्ही तिथं जाऊन ते घरी आणायचो.

  १९७१ च्या उन्हाळ्यातच यशवंत आणि मी मेस्कामायच्या निंबाखालच्या ओट्यावर खेळत होतो. त्याच वेळी महादेव चौधरी यांच्या घरचे लोक मेस्कामायच्या विहिरीला लागून असलेल्या भाऊराव खोड्याच्या खारित आले. आणि ज्या जागेवर रामचंद्र चौधरी यांना जाळले होते त्या ठिकाणी आलेत. बहुतेक आखोजीचा दिवस होता. त्या ठिकाणी त्यांनी काहीतरी पूजा विधी केला, आणि चांगल्या पक्वानांनी सजवलेलं पातर (पत्रावळी) तिथं ठेवलं हे सारं आम्ही निंबावरून पाहत होतो. आणि त्यांच्या जाण्याचीच वाट पाहत होतो. जसे ते परत जायला लागले त्या दिशेने एक कुत्र पण येऊ लागलं होतं. आता आम्हाला कुत्र्यापूर्वी तिथे पोहोचायचे होते, म्हणून आम्ही तिथून पळत सुटलो. कुत्र्याने त्या पात्राला तोंड लावण्यापूर्वीच हाऽऽड हाऽऽड म्हणून गोटे मारले. त्याला हाकललं. आणि मग त्या पात्रावरच्या पक्वान्नावर तुटून पडलो. यशवंत माझ्यापेक्षा थोडा मोठा होता. तो खायला मागेपुढे पाहत होता. म्हणत होता मसानखुटीत भूत असते. आणि भरदुपारी इथं खाल्ल्याने ते भूत आपल्याला लागण, पण माझ्या उपाशी पोटाला कशाची आली भुताची भीती ? पात्रावर पुरणपोळ्या, रस, भजे, वडे, पापड, कुरोड्या, धापोडे असं बरंच काही होतं. ते सारं संपवलं तेव्हाच मी थांबलो. त्याकाळात जिथे चटणी-भाकरीची मारामार होती. तिथं स्वर्गीय रामचंद्र चौधरी यांच्या कृपेमुळे आम्ही तृप्त झालो होतो. स्मशानातलं ते स्वादिष्ट जेवण हैदराबादच्या ताज पॅलेस या सेवन स्टार हॉटेलातील जेवणापेक्षा कुठेच कमी नव्हतं हे मात्र नक्कीच खरं असणार..!

  तसा यशवंत हा स्वभावाने शांतच होता. मुद्दामूहून तो कोणाशीच भांडत नसे. त्याला राग आलाच तर तो राग स्वतःवरच काढायचा. काही खात असला तर ते फेकून द्यायचा. जेवणाचे ताट सुद्धा फेकताना मी त्याला लहानपणी पहिले. शाळा सोडल्यावर तो काही काळ प्रभाकर चौधरी यांच्या दुकानात कामाला होता. नंतर बकऱ्या राखायचा. एकदा सुट्टीत मी घरी आल्यानंतर त्याच्यासोबत बकऱ्या राखायला गेलो होतो. सिंगलावाल्या वावरात स्टेशनवरच्या गौतम्याने आमच्यावर फारच दगडफेक केली होती. त्यात तो जखमी पण झाला होता.१९७९ ला आम्ही चंदनशेष कला वृंद नाट्य मंडळाची स्थापना केली, आणि “संगीत गंगासागर” चे गावात आणि आजुबाजूच्या गावात अनेक प्रयोग केलेत त्यात तो सोबत असायचा रक्षकाची भूमिका सुद्धा त्याने केली होती.

  १९८० च्या दशकात चौधरी यांच्या खटल्याचे विभाजन झाले. १९८१ च्या दरम्यान पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी गाव सोडलं आणि मग सुरू झाली त्यांची धरण भटकंती .”चीरकुटा धरण, ईसापुर धरण, कळमनुरी, टाकळी पेन, सुलतानपूर जवळ खळेगाव, मेहकर जवळ चायंगाव, खामगाव जवळ बोडजवळा तिथून जवळच असलेल्या हिवरा आश्रमला” ते स्थाईक झाले. नंतर मलकापूरचे आमदार चैनसुख संचेती यांच्या गाडीवर यशवंत ड्रायव्हर म्हणून लागला. त्याच्या भाऊ भिमरावला सुद्धा तिकडेच काम मिळाले. १९८४ च्या दरम्यान बोडजवळा येथे असताना त्याचे राजेगाव येथील गवईच्या मुलीशी लग्न झाले. त्याला एक मुलगी आणि दोन मुले राम आणि लखन आहेत. ते औरंगाबादला अकुशल कामगार म्हणून कंपनीमध्ये काम करतात. भिमरावचे सुद्धा १९९० साली शिवनीपिसा येथील जाधवांच्या मुलीसोबत लग्न झाले. त्याला एक मुलगा एक मुलगी आहेत दोघांचे पण लग्न झाले, भीमरावचा मुलगा आकाश कॉम्प्युटर इंजिनिअर असून पुण्याला सेवारत आहे. पण त्यांनाही आपल्या करजगावचे आकर्षण आहेच.या जीवन-मरणाच्या प्रवासात १९८३ ला त्याचा मधला भाऊ ज्ञानेश्वर हा कळमनुरी मुक्कामी धरणात बुडून मरण पावला. १९८५ मध्ये चायंगावला असताना आई तुळसाबाई बकऱ्या चारायला गेली असताना विहिरीत पडून मरण पावली. आणि किसनराव गडलिंग २००० मध्ये मलकापूर मुक्कामी हृदय विकाराने मरण पावले. आज हिवरा (आश्रम ) ला भीमनगर मध्ये दोघाभावांची घरे आहेत. भीमराव पोकलॅण्डवाहक कंटेनरवर ड्रायव्हर आहे, तर यशवंत हिंगणघाट जिल्हा वर्धा येथे टिप्परवर ड्रायव्हर आहे.

  आज १५ जुलै यशवंतच्या वाढदिवसाच्यानिमित्ताने त्यांचा सर्वांना परिचय व्हावा, माझ्या जीवाभावाच्या यशवंतवर वाढदिवसी शुभेच्छांचा वर्षाव व्हावा त्यासाठीच हा शब्दप्रपंच…! माझ्या जीवाभावाच्या यशवंतला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..!

  -प्रा. रमेश वरघट
  करजगाव ता. दारव्हा
  जि. यवतमाळ

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,