• Sun. May 28th, 2023

मोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील बससेवा पूर्ववत सुरू करा

  मोर्शी : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागतील आठवी ते बारावी पर्यंत नियमित वर्ग सुरू झाले आहेत. मात्र, ग्रामीण भागातील रा. प. महामंडळाच्या बसेस शालेय वेळेत सुरू नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थी बस अभावी शिक्षणापासून वंचित राहत आहे. मोर्शी हे तालुक्यातील सर्वात महत्वाची व मोठी बाजारपेठ असून सद्या पेरणीचे दिवस असल्यामुळे खूप लोकांना तालुक्याला ये जा करावे लागत असल्यामुळे कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आली असून तात्काळ बससेवा सुरू करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुका अध्यक्षा सौ वृषालीताई विघे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, युवक शहर अध्यक्ष अंकुश घारड, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक उमेश गुडधे, समीर विघे यांनी विभाग नियंत्रक यांच्याकडे केली आहे.

  मोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोना काळात लॉकडाऊन मध्ये बससेवा बंद करण्यात आल्या मुळे विद्यार्थ्यांना, सामान्य मानसाला , शेतकऱ्यांना खरेदी व सर्वसाधारण व्यवहारासाठी तालुक्याच्या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या आडचनीचा सामना करावा लागत आहे. सध्या खाजगी रिक्षा जीप वाले अव्वा च्या सव्वा पैसे घेऊन जनतेची आर्थिक लूट करीत आहेत तसेच जीप , रिक्षांची पूर्ण भरती झाल्याशिवाय जीप रिक्षा, निघत नाहीत त्यामुळे जनतेचा वेळ व पैसे वाया जात असून मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
  मोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळा व महाविद्यालयात हजारो विद्यार्थी नियमित शिक्षण घेतात. शिक्षण घेण्यासाठी दररोज हजारो विद्यार्थी ग्रामीण भागातून बाहेरील गावाहून मोर्शी येथे येतात. या मार्गावर नियमित प्रवास करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. मात्र ग्रामीण भागामध्ये बसफेऱ्या बंद असल्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची पायपीट सुरू असून हाल होत आहे. शेकडो विद्यार्थ्यांनी बस नसल्याने शाळेत न जाण्याचेच पसंत केले आहे. शाळेत कसे जायचे? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. परिणामी विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद असणारी एस. टी ग्रामीण भागात अद्याप बंद असल्याने मोर्शी तालुक्यातील शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे.

  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली बससेवा अनलॉक प्रक्रियेत सुरू करण्यात आली मात्र अद्यापही ग्रामीण भागात बससेवा नियमित सुरू न झाल्याने विद्यार्थ्यांना व ग्रामीण भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बससेवा त्वरित सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ विभागीय नियंत्रक यांच्याकडे केली असून मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.!

  रुपेश वाळके
  उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँगेस पक्ष मोर्शी तालुका.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *