• Mon. Sep 25th, 2023

मनाला स्पर्शून जाणारी कविवर्य स्व. दादासाहेब काळमेघ यांची काव्यसंपदा

  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थीप्रिय कुलगुरू, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे लोकप्रिय अध्यक्ष स्व. दादासाहेब काळमेघ यांच्या दि. 29/07/2021 ला असलेल्या 24 व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या विचारांचे त्यांच्याच कवितेतून काव्यमय दर्शन घडविणारा ”मनाला स्पर्शून जाणारी कविवर्य स्व. दादासाहेब काळमेघ यांची “काव्यसंपदा” हा प्रा. अरुण बुंदेले यांचा लेख येथे वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  – संपादक

  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे विद्यार्थीप्रिय कुलगुरू, डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांचे शैक्षणिक व सामाजिक विचार आचरणात आणणारे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे लोकप्रिय अध्यक्ष, विद्वत्तेचा उपयोग लोककल्याणासाठी करणारे लोकमहर्षी, राष्ट्रसंताचे व संत गाडगेबाबांचे तत्त्वज्ञान-विचारसारणी आंमलात आणणारे कीर्तनकार, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात डोळसपणे कार्य करणारे बहुआयामी व प्रभावी व्यक्तिमत्त्व स्व. प्रा. वा. मो. उपाख्य दादासाहेब काळमेघ यांच्या दि. 29/07/2021 ला असलेल्या चोविसाव्या स्मृतिदिनानिमित्त मी आदरांजली अर्पण करतो.

  बहुजन साहित्य परिषद, अमरावती या परिषदेचे प्रकाशक प्रा. डॉ. नरेंशचंद्र काठोळे यांनी प्रकाशित केलेले अभंग दादांचे हा कवितासंग्रह वाचण्यात आला आणि कविवर्य स्व. दादासाहेबांच्या विचारांचे त्यांच्या शब्दात काव्यमय दर्शन त्यातून घडले. त्यातील दादांसाहेबांच्या काव्यरचना मनाला स्पर्श करून गेल्या. त्यातूनच या लेख प्रपंचाची निर्मिती झाली. कविवर्य स्व. दादासाहेबांच्या कविता समाजप्रबोधनात्मक, समाजपरिवर्तनात्मक असून त्या अलंकारयुक्त, रसयुक्त, काव्यगुणयुक्त व छंदयुक्तही आहेत. अध्यात्मिक व वैज्ञानिक ज्ञानाचा संगम त्यांच्या काव्यसंपदेत दिसतो.राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांविषयी कविवर्य स्व. दादासाहेब काळमेघ यांच्या मनातील भाव त्यांच्या राष्ट्रसंत वंदन या कवितेत दिसून येतो. राष्ट्रसंताचे ध्येय काय होते? हे सांगताना दादासाहेब म्हणतात की,

  टिळकांचे लक्ष होते स्वराज्य । नेहरूंचे ध्येय होते लोकराज्य।
  गांधीचे स्वप्न होते रामराज्य । माणिकांचे ध्येय होते ग्रामराज्य ।
  भारत निर्माया श्रमिकांचे राज्य । त्यास तू अर्पिती ग्रामगीता ॥

  राष्ट्रसंताना खेड्यापाड्यातील शेतकरी हा सर्वांचाच पोशींदा आहे म्हणून त्यांचे ग्राम हे समृद्ध झाले पाहिजे, तेव्हाच शेतकरी सुखी व समृद्ध होईल असे राष्ट्रसंतांना वाटत होते. म्हणूनच राष्ट्रसंताचे ग्रामराज्य हे ध्येय असल्याचे दादासाहेबांंनी आपल्या कवितेतून सांगितले आहे. यासाठी ग्रामनाथाला राष्ट्रसंतांनी ग्रामगीता अर्पण केल्याचा उल्लेख शेवटच्या काव्यपंक्तीत केलेला आहे. राष्ट्रसंत वंदन याच कवितेत पुढील कडव्यात सत्य व सदाचार वृद्धिगंत करण्याचा प्रयास राष्ट्रसंतांनी जीवनभर केल्याचे दादासाहेबांनी सांगितले आहे ते म्हणतात की,

  तरूणास सांगोनी ज्ञानधर्म । राष्ट्रास दाविला राष्ट्रधर्म।
  विश्वास बोधिला विश्वधर्म । मानवास दाखवी मानवधर्म ।
  भाविकांशी दिधले भक्ति मर्म। सृष्टीत वाढविण्या सत्यशील-प्रेम ।
  दादा न सोडी हा कधी रस्ता ।

  राष्ट्रसंतांनी ज्ञानधर्म तरूणास, राष्ट्रधर्म राष्ट्रास, विश्वधर्म विश्वास, मानवधर्म मानवास दिल्याचे सांगून या समाजामध्ये सत्य, शील आणि प्रेम वृध्दिगंत करण्याचे कार्य राष्ट्रसंतांनी केल्याचे दादांनी येथे सांगितले. एवढेच नव्हे तर या कडव्यात शेवटच्या काव्यपंक्तीमध्ये दादांनी राष्ट्रसंतांचा हा मार्ग जीवनात विविध पदे भूषविताना स्वत: आचरणात आणल्यामुळेच त्यांचे जीवन सुखी, समृद्ध व विकसित झाले होते, हे त्यांच्या जीवन चरित्रावरून दिसून येते, म्हणजेच राष्ट्रसंतांच्या तत्त्वज्ञानाचा उपयोग दादांनी प्रत्यक्ष जीवनात करून स्वत: सोबतच इतरांचेही जीवन सुखामय व समृद्ध केले.‘निष्काम कर्मयोगी-संत गाडगेबाबा’ या कवितेतील आठ कडव्यामध्ये ’कर्मयोगी संत गाडगेबाबांचे’ जीवन व तत्त्वज्ञान उपमा व यमक अलंकारात वर्णिलेले आहे. गाडगे बाबांना देवाची उपमा देताना धृवपदात दादासाहेब म्हणतात की,

  किती वर्णू मी तुझा महिमा डेबूजी देवा ॥

  खरोखरच दीन-दु:खितांचे, आंधळ्या-पांगळ्यांचे, भुकेलेल्याचे, तहानलेल्यांचे, रोगी माणसांचे व निर्वासितांचे गाडगेबाबा देवच होते. जो देतो तो देव या नुसार सर्वांना संत गाडगेबाबा सतत देतच राहिले, म्हणूनच दादा त्यांना म्हणतात. ’डेबुजी देवा’ यमक व उपमा अलंकारात लिहिलेल्या या कवितेत गाडगेबाबांना हिरा ही उपमा देताना ते कोणत्या भूमित जन्मास आले याचेही अगदी प्रसाद हा काव्यगुण असलेल्या प्रासादिक भाषेत म्हणतात की,

  भारत देशात। महाराष्ट्र भूमित।
  विदर्भ प्रंतात । पूर्णामायच्या कुशीत ।
  वर्हाडच्या खाणीत । निपजला हिराबाबा।

  अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील शेणगावचा दिवा संपूर्ण महाराष्ट्रात व भारतातच नव्हे तर विश्वात देखील त्यांच्या समाजकार्याचा, त्यांच्या सर्वांना समजणार्या भाषेतील कीर्तनातील समाज प्रबोधनात्मक व समाज परिवर्तनवादी वाणीचा प्रकाश पोहचला हे सांगताना कविवर्य दादासाहेब म्हणतात की,

  शेणगावचा दिवा । सार्या महाराष्ट्राचा ठेवा ।
  जगास वाटे तुझा हेवा । बाबा डेबुजी देवा ।

  संत गाडगेबाबा हे निष्काम कर्मयोगी होते. त्यांनी स्वत:जवळ कोणतीही संपत्ती बाळगली नव्हती. एवढेच नव्हे तर अंगावर चिंध्यांच्या वस्त्रांची बंडी व पूर्ण पेहराव, हातात छडी म्हणजे झाडू आणि डोक्यावर खापर आणि यालाच ते स्वत:ची धन-दौलत माडी समजत असत हे सांगताना दादासाहेब म्हणतात की,

  अंगावरची बंडी, हातामधली छडी।
  तुझी धन दौलत माडी । बाबा डेबुजी देवा ।

  संत गाडगेबाबांनी जीवनभर प्रत्यक्ष समाजसेवा केली. ती गाडगेबाबांची ’दशसुत्री संदेश’ म्हणून ओळखली जाते. भुकेलेल्यांना अंन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्यां नांगड्यांना वस्त्र, गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत, बेघरांना आसरा, अंध-पंगू-रोगी यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार, पशू-पक्षी मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरूण-तरूणींचे लग्न, दु:खी व निराशांना हिंमत आणि गोरगरिबांना शिक्षण ही गाडगे बाबांची दशसुत्री दादासाहेबांनी प्रासादिक भाषेत ’निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा’ या कवितेत वर्णिलेली आहे. ते म्हणतात की,

  भुकेल्यास जेवण । तहानलेल्यास पाणी ।
  अडाण्यास शिक्षण दिले । डेबुजी देवा ॥
  रोगी भोगींना दया । मुक्या प्राण्यांना दया ।
  निर्वासितास छाया । दिली बाबा डेबुजी देवा ॥

  शेवटच्या कडव्यामध्ये गाडगेबाबांच्या ’इतरांची सेवा करणे हाच खरा धर्म, हेच खरे कर्म’ या तत्त्वज्ञानाचा दादासाहेबांच्या मनावर प्रभावी परिणाम झाला होता. जीवनात त्यांनी कोणतेही कर्म करताना ते तत्त्व अंगिकारले होते. हे सांगताना शेवटच्या काव्यपंक्तित दादासाहेब म्हणतात की,

  भक्ति म्हणजेच करम । सेवा हाच धरम । दादास हे वर्म दिले । बाबा डेबुजी देवा ॥

  भाारतीय संस्कृतीची देण असलेला ’होळी’ या सणाविषयीचे ’होळी’ या कवितेतील दादासाहेबांचे विचार आजही तेवढेच आचरणीय आहेत. धृवपदात ते जनतेला होळीच्या निमित्ताने का होईना अंतरीची घाण नष्ट करायला सांगतात, संत गाडगे बाबा दिवसा ग्रामातील कचरा साफ करीत आणि रात्री कीर्तनातून माणसाच्या मनातील घाण साफ करीत. दादांनी ’होळी’ या कवितेतून ही घाण साफ करण्याचा अनमोल संदेश दिलेला आहे. ते म्हणतात की,

  होळीचा हा सण । संस्कृतीची देण । अंतरीची घाण । नष्ट करा।
  दुराचारी जे असतात ते यमाच्या घरी पाणी भरतात म्हणून जीवनात दुराचारी न बनता सदाचारी बनावे हे सांगताना दादा या कवितेत म्हणतात की,

  प्रल्हाद अवतारी । होलगा दुराचारी । यमाच्या ती घरी । पाणी भरी ॥

  होळीच्या निमित्ताने दादासाहेबांनी परस्पर द्वेष करून नका, बलात्कार-भष्टाचार-हिंसाचार करू नका, कसायास गाई विकू नका, दुसर्याचे हाल करू नका असा उपदेश करीत असतानाच आनंदाचा गुलाल उधळून अर्थात एकमेकांवर प्रेम करून सर्व जन आनंदाने जगा हे सांगताना ते हास्यरस व करूणरसयुक्त कवितेत म्हणतात की,

  उधळा गुलाल । हासा गालोगाल । दुसर्याचे हाल । करू नका ॥

  दारू, वरली मटक्याने जीवन बरबाद होते. दारूमुळे अनेक संसार उद्ध्वस्त झालेले आहेत व होत आहेत. वरली मटक्याने माणूस कंगाल होतो, तर हुंडाप्रथा नवविवाहित स्त्रीचे जीवन नष्ट करतो. म्हणून दादासाहेब ’सुधरा’ या कवितेत म्हणतात की,

  दारू आणि सट्टा, हुंडा आणि बट्टा ।
  वरली आणि मटका, तुम्ही सोडाना ।
  नीती आणि कर्म तुम्ही मानाना ।

  समाजातील मुलीच्या वडिलांची स्थिती आजही खूप भयावह आहे. म्हणून मला म्हणावेसे वाटते की,

  वय झाले पोरीचे लगीन नाय झाले । हुंडा देया पैसा नाय बा तेयचे बोंबले ॥

  ’सुधरा’ या कवितेत त्यांनी दिलेला उच्च-निच भेद, लहान-मोठा भेद, जाती-वर्ण भेद विसरून सर्वांनी एकत्र येण्याचा उपदेश आचरणीय आहे.लोकशाही या पोवाड्यात राज्य कोणाचे हवे तर चोरांचे, भित्र्यांचे, सावकारांचे, जुगार्यांचे, स्वत:चे पोट भरण्यार्या भ्रष्टाचारी लोकांचे राज्य दादासाहेबांना नको होते तर त्यांना लोकांचे, शेरांचे, समृद्धीचे, हिर्यांचे, त्यागी लोकांचे राज्य दादासाहेबांना अपेक्षित होते. लोकांचे राज्य निर्माण करण्यासाठी गुलामगिरी जाऊन लोकशाही आली. हे दादासाहेबांनी लोकशाही या पोवड्यात सांगितले आहे. ते म्हणतात की,

  गेली गेली गेली गुलामगिरी, आली लोकशाही ।
  निर्माया राज्य लोकांचे । येऊ द्या राज्य समृद्धीचे ।
  आम्हा नको राज्य चोरांचे । आम्हा नको राज्य जुगार्यांचे ।
  आम्हा नको राज्य सावकारांचे । आम्हांस हवे राज्य त्यागींचे जी-जी-जी॥

  सर्व थोर पुरूषांना नमन करून दादासाहेबांनी भारतमातेच्या पोवाड्याला सुरूवात केली. भारत देशाचा इतिहास फार मोठा आहे. तो कधीच संपू शकत नाही. हे सांगताना भारतमाता या पोवाड्यात दादासाहेब म्हणतात की,

  भारत विशाल देश,
  त्याची कीर्ती दाही दिशेस,
  किती शूरवीर घातले जन्मास,
  नाही संपणार त्यांचा इतिहास,
  त्यांचा इतिहास जी-जी-जी॥

  याशिवाय ग्रामगीता या कवितेत ग्रामगीतेचे महत्त्व सांगितले आहे. ती ग्रामनाथाचा संपूर्ण विकास करणारी कशी आहे ? हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो जसा असे या मोठा अभंग या छंदामधील अभंग रचनेत त्यांनी चित्ताच्या शुद्धीकरणाला महत्त्व दिले आहे. ते या अभंगरचनेत म्हणतात की,

  दादा म्हणे चित्त । शुद्ध नाही ज्याचे । गाठोडे पापाचे । पाठी त्याच्या ॥

  अर्थात शुद्ध चित्ताची आवश्यकता प्रत्येक मानवाला आहे, हेच येथे दादासाहेबांना सांगायचे आहे. गोपालकाल्याचे अतिशय सुंदर व अर्थपूर्ण वर्णन यमक अलंकारामध्ये केलेले आहे. त्यांच्यामते काला म्हणजे सहभोजन, सहधर्म, यशकर्म, सहयोग, भुकेलेल्यांचे सांत्वन आणि सामाजीकरण होय. हे सांगताना गोपालकाला या कवितेत म्हणतात की,

  काला भुकेल्यांचे सांत्वन । काला म्हणजे सहभोजन ।
  काला म्हणजे सहधर्म । काला म्हणजे यशधर्म ।
  काला, दादा म्हणे, सहयोग-समाजीकरण ॥

  याप्रमाणे कविवर्य स्व. दादासाहेब काळमेघ यांच्या अभंग दादांचे या काव्यसंग्रहात मनाला स्पर्शून जाणार्या समाजप्रबोधनात्मक, समाजपरिवर्तनात्मक, भाव कविता, रसयुक्त कविता, काव्यगुणयुक्त प्रासादिक कविता, मधुराभक्तियुक्त कविता, उपमा व यमक अलंकारयुक्त कविता आहेत. पण हा लेख दीर्घ होण्याच्या भयास्तव येथे कविवर्य स्व. प्रा. वा मो. उपाख्य दादासाहेब काळमेघ यांच्या आज असलेल्या चोविसाव्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र आदरांजली अर्पण करून लेखनीला पूर्णविराम देतो.

  डॉ. पंजाबराव देशमुख एज्युकेशनल नॅशनल अवार्ड प्राप्त
  प्रा. अरूण बाबारावजी बुंदेले,
  माजी पर्यवेक्षक,
  नांदगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,
  नांदगाव खंडेश्वर, जि. अमरावती.
  भ्र.ध्वनी. 8087748609

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,