• Mon. Jun 5th, 2023

फुलोरा : नैसर्गिक अभिव्यक्ती..!

    ‘चारोळी ‘हा काव्यप्रकार अत्यंत सोपा,सुटसुटीत असा आहे.प्रेम आणि चारोळी यांचं खूपच सख्यं नातं आहे.आतापर्यंत प्रेमावर लाखो चारोळ्या लिहिलेल्या आहेत.चंद्रशेखर गोखले,ज्ञानेश्वर वाकोडकर, लिलाधर गायकवाड, प्रा.प्रमोद गारोडे ,योगेश देवकर इ.कवींच्या चारोळ्या वाचलेल्या आहेत.यानंतर एक सकस, दर्जेदार, वाचनीय असा चारोळी संग्रह घेऊन वाशिमचे युवा कवी,ललितलेखक सतिश कोंडू खरात यांचा कोरा,करकरीत चारोळी संग्रह ‘फुलोरा’हातात आला.
    त्यांनी आपला चारोळी संग्रह आई-वडिलांना अर्पण केलेला आहे.

    प्रिय आईस…
    जिच्या परिस स्पर्शानं
    माझं जीवन सोनं झालं
    तिच्या अथांग प्रेरणेनं
    शब्द रचण्याचं बळ आलं.

    कुठलाही कवी,लेखक आपल्या आईवर चारोळी, कविता,लेख लिहतोच…कवी सतिश खरात याला अपवाद कसा असणार…?कवीला आईने जन्म दिला…कवीला चांगले संस्कार दिले…आज कवी सतिश खरात लोकमान्य पावत आहे.ही आई साठी अतिशय गौरवाची बाब आहे.आईच्या प्रेरणेने शब्द रचण्याचं बळ आलेले आहे.अतिशय मोजक्या शब्दात कवीने आपल्या संवेदना व्यक्त केलेल्या आहेत.

    ▪️शब्द फुलांचा सुगंध सारा
    वा-यावरती लहरू दे
    एवढंच स्वप्न साधसुधं
    फुलो-यासारखं बहरू दे!

    शब्द फुलांचा सुगंध वा-यावरती बहरू दे…एवढं स्वप्न पण हे साधंसुधं स्वप्न नाही.शब्द हे साधे नसतात कधीही..शब्दांतून राष्ट्र पेटते..शब्दांतून राष्ट्र विझते…एवढे सामर्थ्य या शब्दात आहे.शब्द हा अडीच अक्षर असलेला आहे.पण फार मोठे सामर्थ्य यात सामावलेले आहे.शब्द हे शस्त्रांसारखे काम करते.

    ▪️धगधगायला लागला
    आहेत शब्दज्वाळा
    उद्ध्वस्त होत आहेत
    काळोखाच्या बंदिशाळा!

    काळोखाला…अज्ञानाला…अविचाराला मिटविण्याचे काम शब्द…आणि फक्त शब्दच करू शकतात.जेव्हा शब्द धगधगायला लागतात तेव्हा त्सुनामी येते.शब्दफुलांमुळेच विचारांचा सुगंध सगळीकडे पसरतो.त्यामुळे कवी डाॅ.मनोहर नाईक व कवी सतिश खरात सर यांच्या कवितेचा आशय शब्दाभोवती गुंफलेला आपणास दिसतो.

    ▪️तुझं माझं नातं हे
    फुलापेक्षा कोमल आहे,
    सूर्यापेक्षा प्रखर अन्
    चंद्रापेक्षा शीतल आहे.

    ही प्रेमचारोळी आहे.नातं कोमल आहे,शितल आहे सुर्याहून प्रखर व चंद्रापेक्षा शीतल…दोन्ही प्रतिमा घेऊन कविने ही चारोळी समृद्ध केलेली आहे.प्रेमाचं नातं हे सर्वात प्रेमळ नातं आहे.त्यात वासना नसावी…जगातील सर्वात तरल नातं म्हणजे प्रेमाचेच..!

    ▪️स्मिताचे कवडसे कधी-कधी
    काळजावर गोंदूण जातात
    आणि जातांना नव्या स्वप्नांशी
    नातं मनाचं जोडून जातात.

    स्मिताचे कवडसे…ज्यांना लाभले…ते आनंदी असतात जीवनात…तोच सुवर्णआनंद कवीला सापडलेला आहे.स्वप्न, मन,नाते …याचं अगदी जवळून नाते असते.हे नाते कवींच्या मनाने जोडलेले आहे.मनाने जोडलेले नाते हे प्रामाणिक व विश्वास पुर्ण असतात.बाह्य विचाराने जोडलेले नाते हे स्वार्थी असतात.स्वार्थी नाते जास्त दिवस टिकत नाही.

    ▪️तू गेलीस आणि
    आयुष्याचा गंध गेला,
    काही बेसावध क्षणांनी
    जगण्याचाही भंग केला…

    कवीचा स्वप्नभंग,प्रेमभंग…झाल्यासारखा वाटतो…ही चारोळी वाचल्यावर…जगणे निरस झाल्यासारखे वाटते.जीवनात आशा आहे…म्हणूनच हे जीवन अनमोल आहे.कुठलाही कवी,लेखक हा प्रचंड आशावादी असतो.कवीने नेहमी आशावादी असावे.तोच धागा कवी सतिश खरात यांनी घ्यावा…आणि आपले आयुष्य आशावादी करावे.

    ▪️जिद्द आणि परिश्रम
    सोबतीला ठेव धैर्य
    तारेच काय माथ्यावर
    मग ओंजळीतही येईल सूर्य

    ही प्रचंड अशी आशावादी, ध्येयवादी,प्रयत्नवादी कविता आहे.जिद्द,परिश्रम,धैर्य या गुणांमुळे मनुष्य महान ठरल्या जातो…त्यामुळे हे तिन गुण आपल्या स्वभावात ठेव…मग यशाचा सूर्य तुमच्या ओंजळीत आल्याशिवाय राहणार नाही.

    ▪️धर्माचं वर्चस्व कशाला
    काय आहे जातीत
    हाडा-मासांचे देह कुजतात
    शेवटी एकाच मातीत.

    माणूस म्हणून आपण जगलो पाहिजे. धर्म, जाती या धूर्त माणसाने केलेली योजना आहे.युवा गझलकार रमेश बुरबुरे यांचा शेर आठवतो.

    रंगून धर्म सारे रक्तात पाहिले मी!
    आश्वस्त शांततेला धम्मात पाहिले मी!

    तुम्हाला जर शांती हवी असेल तर…बुद्धाचा धम्म याला शरण जावे लागेल.त्याशिवाय पर्याय नाही. धर्म,जात,गीता,कुराण कुठलेही पुस्तक वाचा…पण..

    चाहे गीता बाचिए, या पढीए कुर्आन…
    मेरा-तेरा प्यार ही ,हर पुस्तक का ज्ञान!

    असे निदा फाजली सांगितले आहे.जोपर्यंत माणूस माणसा सोबत प्रेमपुर्वक व्यवहार करणार नाही…तोपर्यंत कुठल्याच गोष्टीला महत्त्वाचे स्थान असणार नाही.प्रस्तावना आकर्षक व प्रवाही आहे.साहित्यिक मा.निशा डांगे प्रस्तावनेत म्हणतात-
    “मनातील नाजूक,अलवार भावभावनांची तरल गुंफण आणि ह्रदय सागरातील आर्तता,अगतिकता उचंबळून आल्यावर कवी सतिश खरात यांच्या लेखणीतून “फुलोरा”हा चारोळी संग्रह लेखणीबद्ध झाला आहे.भेगाळलेल्या ह्रदयावर आशेचे सिंचन झाल्यावर हळव्या स्वप्नांचे बिजारोपण होत असते.”.

    मनोगत मध्ये कवी म्हणतात-“फुलोरा “चारोळी संग्रह मी ज्या परिस्थितीत जगलो त्या अनुभवाचे प्रतिबिंब साकारले आहे.असे म्हटले जाते की,कवीचं जगणे हा त्याच्या साहित्यात उमटणारा ठसा असतो:तेच या फुलो-यातून मांडलेले आहे.
    काही प्रतिमा सुरेखपणे कवीने योजलेल्या आहेत.उदा.जिच्या परिस स्पर्शानं, तुझा मोरपंखी हात,आयुष्याच्या काळोखात,डोळ्यांची पालखीही,चंद्रापेक्षा शीतल,सूर्याहून प्रखर,चंद्रासारखा मुखडा,काळजाचा तुकडा,काळजावर गोंदूण, तळं आठवणीचं,…इ.सुंदर असा चारोळी संग्रह “फुलोरा “कवी सतिश खरात यांचा पहिला आहे.ते एक उत्तम कवि ,ललितलेखक आहेत.काही चारोळ्या या दैववादाकडे घेऊन जाणा-या आहेत.कवीने आपले जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला पाहिजे…त्यानूसार आचरण केले पाहिजे…हा ज्ञानप्रकाश आपण कवी म्हणून देऊ शकू.

    सुंदर असे मुखपृष्ठ मा.जालिंदर पावसे यांनी काढले.रेखाटने उद्धव शहाणे यांचे आहे.मेला पब्लिकेशन, अमरावती यांचे विशेष आभार…त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे हा चारोळी संग्रह प्रकाशित केला.कवी सतिश खरात सर…यांचे खूप खूप स्वागत व शुभेच्छा…!

    ▪️समीक्षक

    ▪️प्रशांत नामदेवराव ढोले
    श्रावस्ती नगर, पो-सावंगी (मेघे),ता.जि.वर्धा.
    पिन नंबर-442107
    ता.जि.वर्धा
    ▪️संवाद-9923308638
    ▪️संदर्भ ग्र॔थ-
    ▪️निदा फाजली
    खोया हुआ सा कुछ
    वाणी प्रकाशन, नवी दिल्ली-2007.
    ▪️रमेश बुरबुरे
    अस्वस्थ वर्तमानाचे संदर्भ
    थिंक टॅक,सोलापूर-2019
    ***********************************
    ▪️ कवी-सतिश कोंडू खरात
    ▪️ चारोळी संग्रह-फुलोरा
    ▪️ प्रकाशक-संजय रा.महल्ले
    ▪️ मेधा पब्लिकेशन, अमरावती
    ▪️ पृष्ठे-114
    ▪️ मूल्य-50/-

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *