• Mon. Sep 18th, 2023

‘प्रकाश’मान’ कर्तृत्व-नेतृत्व : डॉ.प्रकाश धोंडू बच्छाव

  (प्राथमिक शिक्षक ते JD सहसंचालकपदापर्यंतचा थक्क करणारा प्रवास!)
  ———————————————-

  अभावातून प्रभाव निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्वाबद्दल आज लिहिणे गरजेचे वाटते म्हणून हा शब्दप्रपंच! ते १९९९ साल असावे. मी नुकतीच डी. एड. उत्तीर्ण झाले होते. नोकरीसाठी वर्तमानपत्र रोज छोट्या जाहिरातींपासून बारकाईने वाचत असे. ‘प्राथमिक शिक्षक पाहिजेत’ अशी जाहिरात बघायला डोळे व्याकूळ होत. तसं आतापेक्षा त्या काळात ‘जाहिरात आणि नोकरी’ याबाबत ‘बऱ्यापैकी बरं’ होतं. अध्यापनाचा अनुभव घ्यावा म्हणून आईबरोबर जाऊन नाशिकरोडच्या काही खाजगी शाळांमध्ये अर्ज देऊन आले होतेच. सेंट फिलोमीना मराठी शाळेत एका शिक्षकाच्या सहा महिने रजाकाळात बदली शिक्षिका म्हणून अस्थायी कामही केले. त्या सहा महिन्यांचे तब्बल पाच हजार असे काही बिल निघाले होते. त्यानिमित्ताने का होईना बँकेत स्वतःचे खाते उघडले. काही दिवस त्या पाच हजारांची श्रीमंत मालकीण होती ही विशीतली पोर! एकंदर फील भारीच होता तो! ते सहा महिने संपले आणि तात्पुरती नोकरी संपुष्टात आली. पण त्या कॉन्व्हेंटमध्ये खूप चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या.

  Thank you for reading this post, don't forget to subscribe!

  खरं तर त्या उमद्या वयात नोकरीबिकरीचे अनुभव अगदी नवीन होते. बारावीनंतर लागलीच डी.एड.ला प्रवेश घेतला होता. महाविद्यालयीन जीवनाची स्वप्नं स्वप्नंच राहिली. नाशिकच्या सी.बी.एस. जवळ शासकीय अध्यापिका विद्यालयात पांढरी शुभ्र साडी आणि हातात गुंडाळ फळा, कॉर्नर घेऊन नाशिकरोड ते सी.बी.एस. असा प्रवास दोन वर्ष सुरू होता. एकदम पंजाबी ड्रेस, स्कर्टमिडीमधून साडीत वावरायचं म्हणजे खूप ताण यायचा मनावर; पण सरावाने ते जमू लागलं. घरात दादां(वडील)पासून साऱ्यांनाच माझ्या ‘मास्तरीण’ होण्याचं भारी कौतुक होतं. असो! तर सेंट फिलोमीनाची नोकरी संपली आणि मी प्रथम वर्ष पदवीला नाशिकरोड येथील आरंभ महिला महाविद्यालयात प्रवेश घेतला.

  आता नियमित कॉलेज करण्यात मजा वाटत नव्हती. डी.एड.ची व्यावसायिक पदवी हातात असताना नोकरीसाठी धडपड करावी वाटे आणि बघता बघता चक्क एके दिवशी वर्तमानपत्रात ‘प्राथमिक शिक्षक पाहिजेत!’ ही मातोश्री सावित्रीबाई फुले विद्यामंदिर, पखालरोड, द्वारका, नाशिक ह्या शाळेची जाहिरात वाचली. मग काय, अर्ज लिहिला अन आईसोबत जाऊन तिथे नेऊन दिला. तेव्हा रेणुका नगरला खूप अडचणीच्या ठिकाणी ह्या शाळेचे कार्यालय होते. कालानुरूप प्रगती होते तशी शाळेचीही झालीय व आता त्या शाळेची भव्य आणि सुंदर इमारत आहे.

  अर्ज केल्यावर थोड्या दिवसांनी मुलाखती झाल्या व मध्ये काही काळ गेल्यावर एके दिवशी सायंकाळी त्या शाळेचा शिपाई शाळेत रुजू होण्यासाठीचे पत्र आमच्या घरी घेऊन आला. अर्थात विनाअनुदानित वर्गासाठी मी अध्यापनाचे काम करणार होते हे समजले. इयत्ता पहिली ते चौथीच्या चार तुकड्या अनुदानित आणि इतर चार विनाअनुदानित तत्वावर सुरू होत्या. पुढे ह्या तुकडयांनादेखील टप्प्याटप्प्याने अनुदान मिळेल असे मला खूप उशिरा समजले. केवळ घरी न बसता कुठे तरी काम करावे व शिक्षणही घ्यावे म्हणून मी पखाल रोडच्या शाळेत २००० साली रुजू झाले. अजूनही तो भारलेला दिवस नेणिवेत ठळक आहे माझ्या. माझ्याबरोबर विनाअनुदानितला एक खैरनार सर, एक महाजन मॅडम, कीर्ती पाटील, शिल्पा आव्हाड होत्या. आम्ही सारे विशी-बाविशीतील होतो तेव्हा. आमची विनाअनुदानित शाळा सकाळी व अनुदानितचे चार वर्ग दुपारी भरायचे.

  ह्या संपूर्ण लेखात अत्यंत महत्त्वाचं विशेष जे मला सांगायचं आहे त्यासाठीची सारी पार्श्वभूमी सांगताना नमनालाच घडाभर तेल वाया गेलंय, पण ते सारं लिहिणंही गरजेचंच होतं म्हणा. जरा बावरल्यासारखा शिक्षिका म्हणून शाळेचा पहिला दिवस सुरू झाला. सकाळी साडेसात वाजता मी शाळेत पोहचले. शिपायाने आमचे वर्ग आम्हाला दाखवले. प्रार्थना झाली, मुलं वर्गात बसली आणि मुलांशी ओळख-परिचय चाललाच होता की, अचानक दारात एक ठेंगणीशी सफारी ल्यालेली मूर्ती उभी राहिली. प्रसन्न चेहरा, तीक्ष्ण-जाणकार नजर, केसांचा एका बाजूला व्यवस्थित पाडलेला भांग, दोन्ही हात खिशात, चेहऱ्यावर चाणाक्ष भाव, एकूणच वावर कमालीचा आत्मविश्वास असलेला, ”तुम्ही प्रतिभा जाधव का?” मी हो म्हणाले. मग ती सफारीतली व्यक्ती पुढील वर्गाकडे गेली, त्या शिक्षकांचादेखील त्यांनी परिचय करून घेतला. आम्हाला प्रश्न पडला हे कोण असतील बरं? मग जाताना व्हरांड्यात थांबून ते म्हणाले ,”मी ह्या प्राथमिक शाळेचा मुख्याध्यापक प्रकाश बच्छाव!” मुख्याध्यापक म्हटल्यावर आम्हा नवागतांचे चेहरे आज्ञाधारक लेकरांसारखे झाले होते. आदरणीय बच्छाव सरांशी झालेली ही पहिली आणि कायम लक्षात राहील अशी भेट!

  हे आमचे तत्कालीन मुख्याध्यापक प्रकाश धोंडू बच्छाव म्हणजेच आजच्या घडीला सहसंचालक ,उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे या पदावर नुकतेच आरूढ झालेले आदरणीय डॉ. प्रकाश धोंडू बच्छाव होत.* नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील जुनी बेज येथील साधारण कष्टकरी-शेतकरी कुटुंबातून आलेला एक कष्टाळू, ध्येयासक्त, कमालीचा बुद्धिमान, नवोदय विद्यालयात शिक्षण घेतलेला तल्लख बुद्धिमत्तेचा तरुण! खरं तर सरांच्या नावातच सारं काही ‘प्रकाशमान’ आहे. सरांच्या ह्या यशाचे, भरारीचे औचित्य साधत हा लेख लिहिणे मला खूप गरजेचे वाटले. कारण जगाला यशस्वी ‘आज’ दिसतो पण त्यामागच्या कष्टाचा, त्यागाचा, तडजोडींचा ‘काल’ माहिती नसतो.

  असो! पुन्हा शाळेतला प्रवास बघू. मुख्याध्यापक म्हणून शाळेत सरांचा दरारा होता, सरांची आदरयुक्त भीती वाटे. नंतर नंतर सरांच्या मिश्किल विनोदबुद्धीचीही कल्पना येत गेली. भीती कमी झाली आणि आदर अधिक दुणावला. सरांचे अक्षर अक्षरश: मोत्यासारखे सुंदर होते म्हणजे आजही आहे. त्यावेळी सर बहिस्थ: स्वरुपात मराठी विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेत होते. आमच्या टाचण वहीवर सर प्र.धो.बच्छाव अशी बाकदार वळणाची देखणी मराठी सही करायचे. सरांचे शुद्धलेखन व व्याकरणाचे ज्ञान वाखाणण्यासारखेच होते. त्यामुळे आम्हीही टाचण शुद्ध लिहिण्यावर भर द्यायचो.

  आम्हा विनाअनुदानित तत्त्वावर कार्यरत शिक्षकांना तेव्हा एक हजार रुपये मानधन मिळायचे. त्या पगाराचा ‘फिल’ही काहीतरीच ‘भारी’ असायचा. विद्यार्थ्यांना महिन्याला वीस रुपये फी होती. त्याची नोंद रजिस्टरमध्ये ठेवणे, दर शनिवारी जमलेल्या फीचा हिशेब करून, पावत्या फाडून भरणा करण्यासाठी आम्ही शिपायाकडे रक्कम देत असू. त्यानिमित्ताने का होईना पर्समध्ये महिनाभर पैसे असायचे आणि ते आम्ही जीवापाड जपायचोही.

  माझ्या आयुष्यातली एक सुंदर आठवण म्हणजे माझा पहिला पगार, स्वतःच्या हक्काचे हजार रुपये हातात आले. पगार मिळाल्याच्या सह्या बच्छाव सरांनी घेतल्या आणि आमच्या चेहऱ्यावरचा अपार आनंद आणि उत्साह बघून सर मिश्किलपणे म्हणाले , ”सांभाळून हळूहळू जा बरं जाताना!” आणि हसत हसत आम्ही कार्यालयातून बाहेर पडलेलो… तो प्रसंग अजून स्मरणात आहे.

  आता शाळेत मुलांबरोबर आम्हीही रमू लागलो. मी तेव्हा पदवीला प्रवेश घेतल्याने सकाळची शाळा करून दुपारी तशीच कॉलेजला जायचे. कॉलेजमध्ये काही तास करून पुन्हा तीन-चार वाजेपर्यंत घरी जेलरोडला पोहचायचे. कॉलेजमध्ये मी नियमित जात नसले तरी सर्व स्पर्धांमध्ये न चुकता भाग मात्र घ्यायचे, बहुतेक वेळा बक्षीस मिळवायचे. कॉलेजमध्ये काही स्पर्धा असली की, बच्छाव सर कधी कधी शाळेतून लवकर जाण्याची सवलत देत. सर शिस्तप्रिय होते. शाळेजवळच्याच इमारतीत सर राहायचे व तिथल्या खिडकीतून शाळेचे मैदान त्यांना दिसत असावे. प्रार्थनेस कोण शिक्षक व किती विद्यार्थी असतात? कोण शिक्षक किती वाजता आले? ह्याकडे सरांचे लक्ष असायचे. अर्थात त्यांच्या पद्धतीने ते नंतर शिक्षकांची फिरकीदेखील घ्यायचे म्हणा. त्या पंचक्रोशीत सरांना लोक मानत, त्यांच्या शब्दाला किंमत देत. सर मुख्याध्यापक असताना प्राथमिक शाळेचे ग्रंथालय समृद्ध होत गेले होते. अनेक नवी, चांगली पुस्तके आम्हाला वाचायला भेटायची. एकदा प्रकाश धुळे यांचे ‘कवितेचे दिवस’ मी वाचायला घेतले. त्यात काय आहे हेही मला माहित नव्हते, पण तेव्हा सर गंमतीने हसलेले. पुस्तक वाचल्यावर समजले की, त्यात सर्व प्रेमकविता आहेत. सरांचे वाचन अफाट होते व आकलन तर जबरदस्त आहे हेही कळत गेलं. वेगवेगळ्या पुस्तकाचे वा लेखकांचे संदर्भ, वाक्य सर बोलताना सहजी वापरत. सर एक उत्तम प्रशासक तर आहेतच पण त्याहीआधी सर उत्तम शिक्षक आहेत, कारण चौथीच्या वर्गात सरांना शिकविताना मी ऐकलेलं आहे. ‘लाल टांगा घेऊन आला, लाला टांगेवाला! ऐका गाणे गातो लाला लल्लल लल्लल लल्लल ला…’ ही कविता चौथीच्या वर्गात तन्मयतेने गातानाचे बच्छाव सर आम्ही बघितलेले आहेत. पालकांच्या समस्या जाणून घेताना, सोडवताना आम्ही सरांना बघितले आहेत.

  सरांच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे वेळेच्या बाबतीत सरांचा काटेकोरपणा व आपल्या कामाप्रती असलेली बांधिलकी, प्रामाणिकता! वेळ व्यर्थ दवडायला सरांना आवडत नसे. याचे उदा. म्हणजे एकदा कोणा एका शिक्षकास अधिक रजा हव्या होत्या, तेव्हा वेळेचे महत्त्व सांगताना सर म्हणाले होते की, “एवढ्या रजा कशाला? माझ्या स्वतःच्या लग्नाला मी केवळ चार दिवस सुटी घेतली होती.” सर नेमके, मोजके व अभ्यासपूर्ण बोलायचे. उगाच कुणाशी कामाव्यतिरिक्त गप्पा मारताना मी तरी त्या काळात सरांना बघितले नाही. सरांच्या आचरणातून अनेक चांगल्या गोष्टी आम्हीही आपसूक शिकत गेलो.

  ह्याच शाळेने पहिल्यांदा वार्षिक कार्यक्रमात मोठ्या समुहासमोर मला बोलण्याची संधी दिली. अर्थात तीदेखील आदरणीय बच्छाव सरांच्या गुणग्राहकतेमुळेच. शाळेत महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी साजरी होई. तेव्हा सकाळच्या सत्रात आम्ही इनमिन चार डोकी बोलणारी, त्यातही मी जरा बरी बोले म्हणून माईक बरेचदा माझ्याकडे यायचा. मग काय ‘चुका आणि शिका’ पद्धतीने बोलत राहिले, वाचत राहिले, लिहीत राहिले. याच काळात कळू लागले की, थोडं फार जमतंय आपल्याला भाषणबिशन! मग काय? मागे वळून बघितलंच नाही आजवर.तर झालं असं की, रेणुकानगरच्या माध्यमिक शाळेत सर्व शिक्षकांची ‘दादां’नी सभा घेतलेली. ‘दादा’ म्हणजे ह्या महात्मा फुले शिक्षण संस्थेचे तत्कालीन सरचिटणीस, ज्योती स्टोअर्सचे *स्वर्गीय दादासाहेब खैरनार.* सर्वजण त्यांना ‘दादा’च म्हणायचे. ते प्रेमळ होते तेवढेच शिस्तप्रियदेखील. वयाच्या सत्तरीत असलेल्या दादांचा संस्थेत त्यावेळी दबदबा होता. गोरीपान कांती, पांढरेशुभ्र धोतर आणि शर्ट घातलेले, पायात बूट, तेल लावून मागे वळलेले केस, टोकदार नाक, धीरगंभीर, विचारी मुद्रा, डोळे बारीक करून बोलण्याची सवय, कित्येकदा तर ते डोळे मिटूनच वाक्य बोलायचे. नजर मात्र तीक्ष्ण होती दादांची आणि स्मरणशक्ती अफाट. घरची भरपूर श्रीमंती असूनही दादांनी त्याचा कधी बडेजाव केला नाही. ते रिक्षाने पौर्णिमा स्टॉपला उतरत आणि तिथून पायी पायी शाळेत येत. आले की कित्येकदा माझ्या वर्गासमोर थांबून थोडा वेळ माझ्याशी बोलत. शहरातील एवढी मोठी प्रतिष्ठीत आसामी, संस्थेचे सरचिटणीस आपली एका विनाअनुदानित वर्गाच्या शिक्षिकेची आवर्जून विचारपूस करतात म्हणून मला जरा संकोच व अप्रूपही वाटे. त्यामुळे तर दादांबद्दलचा आदर कैकपटीने मनात वाढला.

  तर त्या रेणुकानगरच्या माध्यमिक शाळेत तत्कालीन खासदार माधवराव पाटील यांच्या उपस्थितीत वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिक वितरण सोहळा होणार होता. संस्थेच्या वार्षिक सोहळ्याची तारीख तेव्हा ३जानेवारी म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा जन्मदिवस हे औचित्य असे. या दिवशी संस्थेतील एक शिक्षक सावित्रीबाईंच्या कार्यावर भाषण करत असे. एव्हाना संस्थेत येऊन मला काही महिनेच झाले होते. मी चांगलं बोलते असं बच्छाव सरांनी दादांना आधी खाजगीत सांगितले असावे. बच्छाव सरांच्या बुद्धीवैभवाने दादाही खूपच प्रभावित होते. मग त्यादिवशी भरसभेत दादा म्हणाले, “मुली तू बोलशील का कार्यक्रमात सावित्रीबाईंवर ? तुमचे मुख्याध्यापक सांगत होते की, तू चांगलं बोलतेस; पण एवढे सिनियर लोक डावलून तुला कशी संधी द्यायची?” झालं… मनीध्यानी नसताना एकदम माझ्यावर असा शाब्दिक बॉम्ब पडलेला. प्रथमच दादांशी समोरासमोर बोलण्याचा हा योग होता. मी म्हणाले, “दादा, इतर कुणी बोलत असेल तर माझी काही हरकत नाही, मला संधी नाही दिली तरी चालेल.” दादा म्हणालेले “तू तर आक्रमक आहेस!” त्याचा अर्थ तेव्हा मला नीटसा कळालाही नव्हता. मुख्याध्यापक बच्छाव सर स्मित करत पहिल्या बाकावर बसलेले, आम्ही सर्वात मागे. कुणास ठाऊक का ? पण दादांनी मला सभा संपल्यानंतर तिथल्या कार्यालयात बोलवले व “बोल काय भाषण करणार आहेस तू? थोडं बोलून दाखव.” अनपेक्षित प्रसंग आलेला; मग काय ? डी.एड.ला असताना लिहिलेली माझी *‘सावित्री तू होतीस म्हणूनच…!’* ही प्रिय कविता जरा बिचकतच दादांपुढे सादर केली. दादा तंद्री लागल्यासारखे डोळे मिटून कविता ऐकत होते. दादांनी डोळे उघडल्यावर काय प्रतिक्रिया येते? म्हणून मला जरा दडपण होतेच. पण आश्चर्य, दादा कविता ऐकून खूप खुश झाले. दादांनी मला आनंदाने वार्षिक सोहळ्यातील भाषणाची संधी दिली आणि त्यानंतर संस्थेतील प्रत्येक कार्यक्रमात माझ्याकडे माईक असायचाच असायचा.

  साधारण २००३ पर्यंत तेवढ्याच तुटपुंज्या मानधनावर ह्या शाळेत मी नोकरी केली. शाळेची नवीन इमारत बांधण्यासाठी पावतीपुस्तक घेऊन फिरलो. मुलांच्या प्रवेशांसाठी सर्व्हे केला. विद्यार्थ्यांना तांदूळ वाटले, खिचडी-वरणभात वाढला. फी न देण्यावरून पालकांशी कधी भांडलो, कधी बस-रिक्षाच्या भाड्यालाही मानधनाचे पैसे पुरायचे नाही म्हणून वैतागलो. मला तर शिक्षणासाठीही पैसा लागायचा. ह्याच शाळेत नोकरी करताना बी.ए. झाले. मग के.टी. एच.एम. महाविद्यालयात एम.ए. मराठीला प्रवेश घेतला. तेव्हा एम.ए. चे वर्ग सायंकाळी पाच ते सात या वेळेत भरायचे. सकाळी शाळा व सायंकाळी पदव्युत्तर वर्ग, के.टी. एच.एम. महाविद्यालय ते जेलरोड बसची वाट बघत कधीकधी रात्रीचे नऊ वाजायचे घरी यायला . पुन्हा सकाळी उठून शाळा असा दिनक्रम असायचा. त्यात काही काळ रविवारी आदरणीय *प्रा. देवीदास गिरी* सरांकडे नेट-सेटच्या क्लासला हजेरीही लावली . नेट-सेटच्या परीक्षेतील खूप बारकावे गिरी सरांच्या क्लासमधुन समजले. प्रा. देवीदास गिरी सर एक उत्तम वव्यक्ती व मार्गदर्शक आहेत याची प्रचिती येत गेली.

  एकूणच मीही नोकरी करत शिकत होते तेव्हा एक लक्षात येत होते की, आपण जसे शिकतोय तसे बच्छाव सरही सतत काहीतरी अभ्यास करत असतात, वाचत असतात. चौथीच्या शिष्यवृत्तीचे क्लासेस घ्यायला सर तेव्हा सकाळी लवकर शाळेत यायचे. त्या हुशार मुलांबरोबर सर खूप रमायचे, हसत-खेळत आत्मीयतेने बोलायचे. एकूणच हुशार विद्यार्थी सरांना खूप आवडायचे. त्यांच्यात डबा खातानाही मी सरांना पाहिले होते. बुद्धिमत्तेची उदाहरणे, आकडेमोड आणि गणित यात सर कधीच चुकत नाही, सरांचे पाठांतर व स्मरणशक्ती ‘बाप’ आहे हेही लक्षात येत गेले. यावरून त्यावेळी झालेल्या किरकोळ तात्त्विक कुरबुरी आजही सरांच्या तपशीलवार लक्षात असतील म्हणा.(गंमत हं!) त्याकाळात सर घरी रात्री उशिरापर्यंत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचे व दिवसा नोकरी. सकाळी शाळेत आले की, सरांचे डोळे अनेकदा सुजलेले असायचे. सरांची समंजस आणि मितभाषी असलेली पत्नीही कधीकधी शालेय परिसरात भेटायची.

  सर कोणतीतरी परीक्षा देताय एवढेच त्यावेळी माहिती होते. नेमकं कसली परीक्षा ? माहिती नव्हतं. पण एके दिवशी सर शाळेत आले तेच पेढे घेऊन! सर लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. सरांच्या सततच्या कष्टाला फळ आले होते. काही दिवसातच सरांनी मुख्याध्यापक पदाचा राजीनामा दिला आणि सरांचा छोटेखानी निरोप समारंभ दादांच्या, संस्थेच्या सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. मला मात्र त्या सोहळ्यात सरांविषयी बोलायचे होते, कृतज्ञता व्यक्त करायची होती; पण साऱ्या मोठ्या माणसांमध्ये मला संधीच मिळाली नाही. घरी निघताना खूप उदासवाणे वाटत होते, आपण चांगल्या मार्गदर्शक, नेतृत्वास मुकलो आहोत याची तेव्हा ठळक जाणीव झाली.

  २००२ साली माझे वडील ह्रदयविकाराच्या झटक्याने गेले. त्यांची प्रकृती गंभीर असताना आणि अत्यंविधीलाही बच्छाव सर, माध्यमिक विभागाचे मधुकर बच्छाव आपुलकीने आलेले. सरांनी आम्हा सर्वांचा निरोप घेतला आणि २००३ साली सर कलासंचालनालय, महाराष्ट्र राज्य, परीक्षा नियंत्रक म्हणून रुजू झाले. जाताना माझ्या धडपडीस सदिच्छा देताना सर म्हणाले होते की, “मॅडम बी.एड.करण्याची संधी कधी मिळाली तर जरूर करा.” ते वाक्य माझ्या लक्षात होतेच. २००२ साली मी बी.ए. झाले. २००३ साली बी.एड. साठी पहिल्याच यादीत निवड झाली आणि सरांपाठोपाठ माझीही पखाल रोडची शाळा कायमची सुटली. २००४ साली डी. एड.बेसवर प्राथमिक शिक्षिका म्हणून निफाड येथे आश्रमशाळेत रुजू झाले. दरम्यान लग्न, संसार, मुलं ह्या जबाबदाऱ्या पेलत एम.एड. पूर्ण केले. सेटचा अभ्यास जमेल तसा करत राहिले. २००९ साली सेट उत्तीर्ण झाले. २०१० साली पीएच.डी.साठी पुणे विद्यापीठात नोंदणी केली. २०११ साली माझे स्वप्न पूर्ण झाले व लासलगाव वरिष्ठ महाविद्यालयात मराठी विभागात मी रुजू झाले. हे इथे एक-एक वाक्यात लिहिले असले तरी प्रत्यक्ष सारी तारेवरची कसरतच होती मधल्या साऱ्या संघर्षात! मधल्या काळात पखाल रोडची शाळा वगैरे सारं स्मृतींच्या सुप्त कोशात मागे पडलं. तिथेच माध्यमिक विभागात शिक्षक असलेले कवी स्व.विलास पगार सर तेवढे अधूनमधून संपर्कात होते बस्स! बाकी काही अद्ययावत माहिती नव्हती. सारेच त्यांच्या व्यापात व्यस्त असण्याचा हा आयुष्याचा टप्पा असतो. पूर्वी मोबाईल वगैरे नसल्याने व तशीही मी नाशिक शहरातून ग्रामीण भागाकडे नोकरीनिमित्त आल्याने संपर्क थोडे कमी झाले होते. आता समाजमाध्यमांच्या कृपेने प्रचंड वाढलेत ही गोष्ट वेगळी!

  दरम्यान व्याख्यानं जोरात सुरू झाली. वाचणं अन बोलणं दोन्ही आवडत्या गोष्टी जगणं अधिक समृद्ध करत होत्या. अशातच अनपेक्षितपणे एक वर्तुळ पूर्ण झालं. बच्छाव सर मंत्रालयातून पुणे येथील सहसंचालक कार्यालयात प्रशासन अधिकारी म्हणून रुजू झाले होते. पण मला काही थांगपत्ता नव्हता. सिन्नर महाविद्यालयास व्याख्यानास गेले होते, त्या कार्यक्रमाचा फोटो वार्षिक अंकात बघून बच्छाव सरांनी डॉ.राहुल पाटील यांच्याकडून माझी माहिती घेतली. पाटील सरांनी मला तसे कळवलेदेखील. बच्छाव सरांचा संपर्क क्रमांक मिळेना. मग एका सुटीत सहकुटुंब पुण्यात गेलो, आदरणीय बच्छाव सरांची भेट घेतली. सर आता मोठे पदाधिकारी झाले होते, अभिमानाने ऊर भरून आला. सरांनी प्रसन्न-हसतमुख मुद्रेने आमचे स्वागत केले. मात्र त्या दिवशी तेरा वर्षांनी भेटलेले बच्छाव सर हे ‘तेरा वर्षांपूर्वीचेच बच्छाव’ सर होते ही जाणीव सुखद होती. त्यांच्या कर्मचार्‍यांना आत्मीयतेने ओळख करून देत होते की, “एकेकाळी जाधव मॅडम माझ्या सहकारी होत्या.” सरांचा एकूणच प्रवास खूप स्फूर्तिदायक तसा थक्क करणारा आहे. विशेष म्हणजे मधल्या काळात प्रशासकीय कामांच्या एवढ्या व्यस्ततेत सरांनी डॉक्टरेटदेखील प्राप्त केली आहे. एका छोट्याशा खेड्यातून आलेले, कुठलीही शैक्षणिक, उच्चपदांची पार्श्वभूमी नसलेल्या साधारण कुटुंबातून आलेले, सुरुवातीस प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक असलेले आदरणीय डॉ.प्रकाश बच्छाव सर आज स्वतःच्या क्षमता, बुद्धिमत्ता, पात्रता, जिद्द, मेहनत यांच्या जोरावर उच्च शिक्षण संचालनालय, पुणे येथे सहसंचालक म्हणून रुजू होतात ही अत्यंत उल्लेखनीय, प्रेरक व अभिमानास्पद अशी बाब आहे.

  सुरूवातीस जे.जे स्कूल ऑफ आर्ट्स या आशियाखंडातील सर्वात मोठ्या लौकिकपात्र अशा कलासंस्थेत सरांची रजिस्ट्रार म्हणून नियुक्ती झाली. पुढे कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य, परीक्षा नियंत्रक या पदावर रुजू झाल्यावर सरांनी अत्यंत उल्लेखनीय असे काम केले. तेथील सेवेत त्यांनी शालेय व महाविद्यालयीन स्तरावर ज्या कला परीक्षा होत त्यातील परीक्षा पद्धती, मूल्यमापन केंद्र निकाल कार्यपद्धती यात आमुलाग्र असा बदल केला. त्यानुसारच आज कला संचालनालयाचे काम सुरू आहे. त्यानंतर सरांनी प्रशासन अधिकारी, महाराष्ट्र उच्च शिक्षण सेवा गट अ ही परीक्षा दिली व सर उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे प्रशासनाधिकारी म्हणून नियुक्त झाले. आज त्याच पुणे कार्यालयात सर जॉईंट डायरेक्टर आहेत.

  सरांचा सुरुवातीपासूनचा प्रवास ज्यांनी पाहिला आहे, त्यांना नक्कीच सरांच्या जिद्दीची आणि बुद्धीची कल्पना येईल. सामान्य म्हणून आपण जन्मास येतो, पण कर्तृत्वाच्या जोरावर आव्हानं स्वीकारत, इतरांना सामाजिक-शैक्षणिक बाबतीत सतत मदतीचा हात देत असामान्य म्हणून जगण्यात खरी ऐट, रुबाब, मजा, अर्थ आहे हेच सरांचा प्रवास अधोरेखित करतो. आजही सर आमच्यासारख्यांसाठी प्रेरणास्थान आहेत. प्रसिद्धी विन्मुख असलेल्या आदरणीय सरांना हे मी लिहिलेले कितपत आवडेल माहित नाही, पण आज सरांच्या यशाबद्दल हे लिहिणे मला तरी अत्यावश्यक वाटले.

  आपले ध्येय गाठण्यासाठी कशा प्रकारची एकाग्रता व चिकाटी असावी? आभाळाएवढं यश मिळूनही पाय धरणीवर ठेऊन कसे कार्यरत असावे ? सामाजिक भान कसे जपावे? याचे उत्तम उदाहरण म्हणजे आदरणीय डॉ. प्रकाश बच्छाव सर! सरांचे उदाहरण माझ्या विद्यार्थ्यांनाही मी देत असते. या सार्‍यापल्याड सर एक उत्तम ‘माणूस’ आहेत ही बाब खूप सुखावह आहे. सरांचे मनापासून अभिनंदन व आगामी उज्ज्वल वाटचालीस सदिच्छा! सरांच्या एकूण प्रवासाबद्दल शेवटी एवढेच म्हणेन की,

  “रुकावटे आती है सफलता की राहो में ये कौन नही जानता
  फिर भी वह मंजिल पा ही लेता है जो हार नही मानता !”
  -प्राथमिक शाळेतील आपली एकेकाळची सहकारी
  डॉ. प्रतिभा जाधव-निकम
  मराठी विभागप्रमुख
  कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,लासलगाव
  ता .निफाड, जि. नाशिक
  pratibhajadhav279@gmail.com

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,