- करुणेच्या सागराला अश्रू दान देत
- आतून कोरडी होत जाणारी नदी
- आणि माझं दुःख मला घेऊन जात आहे विनाशाकडे
- दया क्षमा शांती आता कुठेही उरली नाही माझ्यात
- ठरवूनही होता येत नाही मला बुद्ध
- स्वतःच्या आत्म्याचा खून करून,
- माझी जीभ,हात आणि विचार करताहेत आता युद्धाची भाषा
- संपवून टाकावंस वाटतेय आता स्वतःलाच,
- अंतरातम्याशी लढता लढता
- तेंव्हा माझे दोन पिल्ले महिंद्रा संघमित्रा
- दया क्षमा शांतीचा संदेश घेऊन डोकावतात माझ्यात
- आणि गंभीर मुद्रा धारण केलेल्या माणसाच्या गालावर फुलवतात हास्य
- जग म्हणतात अजून थोडं आमच्या साठी
- डोळ्यात अश्रू आणि गालावर हास्य घेऊन
- लढत रहा म्हणतात स्वतःच्या दुःखाशी
- हे युद्ध थांबवण्यासाठी…
- हे बुद्धा तुझा तो धम्म मला अजूनही कळला नाही रे
- मी गुंतून पडलोय माझ्याच दुःखाला खत पाणी घालत
- आणि माझ्या अंगणातला बोधी ज्ञानवृक्ष उन्मळून पडत आहे हवेच्या झोक्याने
- हे बुद्धा गरज आहे पुन्हा एकदा धम्म चक्र प्रवर्तनाची
- पण यावेळेस धर्म , जात, पंथ बदल करून होणार नाही माणसांच्या माणुसकीत परिवर्तन
- गरज आहे धम्म क्रांतीची जिची मशाल
- पेटली पाहिजे प्रत्येक माणसाच्या अंतर्मनात
- आणि जाळून टाकल्या पाहिजेत सर्व जाती
- प्रतिकात्मक रावण जाळून आता होणार नाही काहीही उपयोग
- आता स्वतःच स्वतःला जाळले पाहिजे
- आतून बाहेरून राख होण्यासाठी
- कुठल्याही स्त्री ची अभ्रू न लुटणारा रावण जाळला जातो आज भर चौकात
- आणि हजारो घरे उध्वस्त करून
- आया बहिणींची इज्जत वेशीवर टांगणारे फिरतायेत मोकाट, गावागावात घराघरात
- आणि आपण निर्भया साठी मेणबत्ती पेटवून मोकळे झालो
- बा भीमा तू पुन्हा ये परिवर्तन घडवायला,
- माझं वर्तन घडवायला…
- सुरेश पेंढरवाड
- वणी जि.यवतमाळ
- 9623595312