• Tue. Jun 6th, 2023

कुंकवाचा धनी…!

पेढी नदीच्या काठावर वसलेलं एक गाव होतं, डोंगर-दऱ्याच्या माथ्यावरुन सूर्यनारायण डोकावत होता, कोंबड्याची बाग ऐकून शेवंता उठली, डोळे पुशीत तिनं चुलीत लाकडं लावली अर्धा कप चहा घेतला, तोवर कमलाचा आवाज आला “शेवंते कुठे आहेस वं! झालं नाही का बाप्पा”…

शेवंतानं झपाट्यानं आपलं कामं उरकवलं.
“हो तुम्ही व्हा समोर, मी येतोच मागूनं”
असं म्हणत शेवंतानं आपली शिदोरी बांधली, अन निंघाली कमलासोबत कामाले.

कमला तिच्या सोबत बोलत होती, पण शेवंताच्या डोक्यात ईचाराचं कावूर माजलं होतं.
“काय वं शेवंते, दोन दिवसांच्या भांड्याचा होका आहे, चालशीन काय वं ?
शेवंताची तंद्री तुटली
हो हो ,माय चालू नाही तं सांगू कोणाले मले थोडं राणीवाणी घरात बसता येते, रातंदिस काम केल्या बिगर तीन-तीन पोरी थोड्याच उजयाच्या राहिल्या.

“बालीच्या बापाले कायी कराले लाव नं, तो काय निरा पसरलाच रायते काय ?”
जाऊ देनं माय!, काय करतं कर्माचे भोग हाये ते, माया कुंकवाचा धनी हाये थो, माया लेकराच्या आंगावरचं पांघरूण हाये थो, माया अब्रूचा राखंदार हाये, कसा बी असला तरी नवरा हाये थो, तीन पोरी झाल्या म्हणून सासू-सासर्‍यांनं लय छळ मांडला होता, पण त्यांनं मायी साथ दिली, टाकून निघून गेला खरा, पण दुसऱं लगनं नायी केलं, काय करतं आता बिचारा दुखण्यानं जर्जर झाला, घरचेयनं काढून देल्लं त्याले, सारी मस्ती जिरली त्याची आता, बरं जाऊ दे माय कमले…. बालीचं लगन कराचं हाये यंदा, येकेक वझं हलकं कराचं हाये, तब्येत साथ देत नायी बालीचा बापाची, बिना बापाच्या पोरीले पावना उतरणार नायी, माई जिंदगी तं गेली अशीच, पण माया पोरी तरी सुखी रायल्या पाहिजे, दोन पायरी नं काय तीन पायरीनं काम कराले तयार हाये मी, फकस्त पोरीचे लग्न झाले पायजे….
शेवंता काळीसावळी, उंचपुरी बाई होती, कपायावरचं रुपयाएवढं कुंकू, डोईवरचा पदर कधी पडला नाही तिचा, कामाले वाघिणीसारखी काटक, अन् मनानं तेवढीच शुद्ध, होती अडाणी पण साऱ्या जगाचं ग्यान तिच्या जवळ होतं, कोणाच्यायी लेकरालें जीव लावत होती, बिमार माणसाची सेवा करत होती, कोणाले दोन घासं खाऊ घातल्यानं कमी होत नायी भाऊ, असं म्हणाची स्वतःच्या कष्टाचं खाचं पण भीक मागाची नायी, असं तिचं धोरण होतं ,दिवस मान बोलू देत नवते, तिने नवर्‍याची लय सेवा केली, जे नाही ते त्याले खाऊ घातलं, पोरीले शिकवलं मोठ्या पोरीचं लगनं केलं, नवऱ्यासोबत पोरीचं कन्यादान केलं, बापाचं महत्त्व तीनं जाणलं होतं, ज्या नवऱ्यानं तिले कधीच सुखाचे चार घास दिले नायी, पण थो बालीचा बाप तीनं सदोदित जपला होता. कामाकामानं आणि कायजी कायजीनं, कमला कमजोर झाली होती, पण पुढच्या दोन पोरी तिले उजवाच्या होत्या. म्हनून रातंदिसं काम करत होती, एक दिसं कामावर असतानां शेजारचा बंड्या तिले बलवाले आला होता, तिच्या मधंव्या पोरीनं फाशी घेतली होती, आता मात्र अवसानं गळून गेलं होतं तीचं, हा आघात सहन करण्यासारखा नव्हता तिले, आईचं काम कमी व्हावं म्हणून पोरींनं आत्महत्या केली होती, ती धाय मोकलून रडाले लागली. नियतीच्या घाल्याले ती स्वतः जबाबदार समजत होती, नवऱ्याले मात्र तिनं एका शब्दानं दुखवलं नायी, काही दिवसांनी तिच्या नवऱ्याच्या दोन्ही किडन्या खराब झाल्या,स्वतःची किडनी त्याले दिली, तब्येत थोडी थोडी सुधारली, लहान पोरगी नोकरी करायला लागली, आता कुठं सुखाचे दिवस ती पाहत होती. तोच एक दिवस कामावर असताना शेवंताले अटॅक आला, शेवंता अनंतात विलीन झाली, देवाला नेहमी म्हणायची “देवा मले भरल्या कपायी नेजो, माया कुंकवाच्या धन्याले लय आयुष्य देजो, सात जन्म हाच नवरा देजो, उभ्या आयुष्यात शेवंतानं कधी नवी साडी नाही तं कधी सोन्याचा दागिना घातला नव्हता, पण शेवटच्या क्षणी मात्र शेवंता नव्याकोऱ्या कपड्यात, नवरी वाणी सजली होती, एका सुखाच्या शोधात तिनं आयुष्यभर कुंकवाचा धनी जपला होता….
या क्षणी मात्र नवरा जोरजोरात रडत होता, त्याच्या वागण्याचा त्याले पश्चाताप होत होता……
जिवंतपणी माणसाची किंमत कळत नसते, कमला त्याच्यासाठी काय होती हे त्याले कळलं होतं आता….

    सौ. शितल राऊत/ul>
      अमरावती

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *