
कोल्हापूर : मराठा समाजाच्या मागण्यांपैकी ज्या गोष्टी राज्य सरकारच्या हातात आहेत, निदान त्या तरी मार्गी लावाव्यात असे आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ठाकरे सरकारला केले आहे. नाशिकमध्ये मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सुरु असलेल्या मूक आंदोलनात संभाजीराजे बोलत होते.
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यभरात मूक आंदोलनांची हाक दिली आहे. कोल्हापुरातून या आंदोलनाची सुरुवात झाली होती. आज नाशिकमध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे. त्यावेळी त्यांनी जमलेल्या सर्वांना उद्देशून भाषण केले. या भाषणात त्यांनी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठीचे काही पर्याय सुचवले. मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून राष्ट्रपती, पंतप्रधानांपर्यंत प्रश्न पोचवणे आणि किमान राज्य सरकारच्या हातात जे आहे, ते तरी प्रश्न मार्गी लावणे हे ते पर्याय आहेत.
यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले, मराठा समाजाला ३६ जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्याची इच्छा नाही. मात्र राज्य सरकारने किमान आपल्या हातातले प्रश्न, मागण्या तरी सोडवाव्यात. ते पुढे म्हणाले, मी फक्त मराठा समाजाचा नेता नाही. मी सर्वांचा नेता आहे. मला बहुजन समाज एकत्र आणायचा आहे.
आजच्या आंदोलनानंतर राज्यातले सर्व मराठा समन्वयक एकत्र बसून आंदोलनाची पुढची दिशा ठरवतील असेही संभाजीराजे यांनी सांगितले. मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे भोसले यांनी मूक आंदोलनाला सुरुवात केलेली असताना राज्य सरकारने याची दखल घेऊन त्यांच्याशी काही दिवसांपूर्वी सविस्तर चर्चा केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण आदींच्या उपस्थितीत संभाजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्र्यांशी त्यांच्या प्रमुख मागण्यांबाबत चर्चा केली. या मागण्यांविषयी राज्य सरकारने सकारात्मक दृष्टीकोन दाखवला असल्याची माहिती संभाजीराजे यांनी दिली होती . मात्र, त्याचवेळी आंदोलन अद्याप स्थगित झालेले नसून पुढील निर्णय २१ जून रोजी नाशिकमध्ये घेतला जाईल, असे देखील त्यांनी स्पष्ट केले होते. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
0 टिप्पण्या