
अमरावती : विद्यार्थी व नागरिकांमध्ये विज्ञानविषयक जाणीव व वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या हेतूने शहरातील मध्यवर्ती भव्य सायन्सकोर मैदानाचे रूपांतर आता सायंटिफिक पार्कमध्ये होत आहे. हा उपक्रम महत्वाचे शैक्षणिक केंद्र असलेल्या अमरावतीच्या वैभवात भर घालणारा ठरेल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केले. सायन्सकोर मैदानावर सायंटिफिक पार्कचे भूमीपूजन करताना त्या बोलत होत्या. ग्रामीण आरोग्य यंत्रणेद्वारे १३ रुग्णवाहिकांचे लोकार्पणही यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झाले. मैदानावर निर्माण करण्यात आलेल्या जॉगिंग ट्रॅक व इतर सुविधांची पाहणीही पालकमंत्र्यांनी यावेळी केली.माजी राज्यमंत्री तथा विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे पाटील, विधानसभा सदस्य सुलभाताई खोडके, बळवंतराव वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलूभाऊ देशमुख, माजी राज्यमंत्री सुनील देशमुख, महापौर चेतन गावंडे, जि. प. उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, सभापती पूजा आमले, बाळासाहेब हिंगणीकर, सुरेश निमकर, जयंतराव देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा आदी उपस्थित होते.
सायन्सकोरवर तारांगण
सायंटिफिक पार्कमध्ये प्लॅनेटोरियमची उभारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे तारांगणाची शास्त्रीय माहितीसह अनुभूती अमरावतीकरांना मिळणार आहे. त्याचप्रमाणे, विज्ञानविषयक प्रदर्शनाचाही पार्कमध्ये समावेश आहे. सुमारे साडेचार कोटी रुपये निधीतून हा सुंदर प्रकल्प उभा राहणार आहे.
विहित मुदतीत काम पूर्ण करा
सायंटिफिक पार्कच्या रूपाने एक महत्वाचा प्रकल्प शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी साकारत आहे. त्याची नियोजित कामे विहित मुदतीत पूर्ण करावीत, असे निर्देश पालकामंत्र्यांनी यावेळी दिले. सायन्सकोर मैदानावर संरक्षण व सौंदर्यीकरण अंतर्गत १ कोटी ५२ लाख रुपये निधीतून मैदानाचे गेट, कुंपण भिंत, ४00 मीटर पेव्हिंग व जॉगिंग ट्रॅक बांधकाम करण्यात आले आहे. याठिकाणी वृक्षारोपण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी पालकमंत्र्यांनी संपूर्ण मैदानाची पाहणी केली व खेळाडू, तसेच चिमुकल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ग्रामीण आरोग्य यंत्रणेद्वारे १३रुग्णवाहिकांचे लोकार्पण झाले. त्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात येणार आहेत.
0 टिप्पण्या