
नागपूर : नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्तपदी प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात विभागीय आयुक्त संजीव कुमार यांची बुहन्मुंबई येथे बदली झाली होती. आता त्यांच्या जागी मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता वर्मा यांना नागपूरच्या विभागीय आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली असून मंगळवारी सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचे आदेश काढले आहे.
प्राजक्ता वर्मा २00१ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे प्रांताधिकारी पदापासून त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात झाली.त्यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सीईओ, धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून २00९ साली काम पाहिले. तिथे धवल भारती अभियान राबविले. मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्याकडे सहसचिव म्हणून काम केले. विक्रीकर आयुक्त म्हणूनही त्यांची कारकीर्द गाजली. मुंबई येथील सिडकोच्या सहसंचालकपदी काम केले. २0१९-२0 मध्ये उत्पादन शुल्क आयुक्त असताना त्यांनी तब्बल हजार कोटींचा अतिरिक्त महसूल मिळवून दिला. सध्या त्या मंत्रालयात मराठी भाषा सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत होत्या. मुंबईतील स्थलांतरितांना वेळच्या वेळी भोजन मिळावे, तसेच त्यांचे अन्य प्रश्न सोडवण्याबरोबरच रुग्णालयांसाठी स्वयंसेवक तयार करण्याची जबाबदारी सचिव प्राजक्ता वर्मा यांच्याकडे देण्यात आली होती प्राजक्ता लवंगारे सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या अधिकारी आहेत. वर्मा यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक म्हणून जून २00९ ते मे २0११ दरम्यान काम पाहिले होते. या विभागाला अधिक तंत्रस्नेही बनविण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले. मुंबई महानगरपालिकेत त्यांचे वडील निरीक्षक होते. तर आई मनपा हॉस्पिटलमध्ये परिचारिका होत्या. प्राजक्ता वर्मा यांनी आजवर प्रत्येक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
0 टिप्पण्या