Header Ads Widget

संपूर्ण लसीकरणानंतरच शाळा सुरू करा

नवी दिल्ली : सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत कालानुरूप बदल करावा लागेल, संपूर्ण मुलांचे लसीकरण झाल्यानंतरच शाळा सुरू कराव्या, असे प्रतिपादन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केले. ते आज (दि. २८) सीआयआय संघटनेच्या वतीने आयोजित सार्वजनिक आरोग्य परिषदेत बोलत होते. मुलांना लस देण्यात आल्यानंतरच योग्य पध्दतीने शाळा सुरू होऊ शकतील, असेही त्यांनी नमूद केले. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट तसेच डेल्टा प्लस व्हेरिएंट यामुळे देशवासियांच्या चिंतेत भर पडली आहे. अनेक संस्थानी केलेल्या अभ्यासात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे धोके समोर आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर डॉ. गुलेरिया यांनी संवाद साधला. डॉ. गुलेरिया म्हणाले की, कालानुरूप आपणास सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत बदल करावा लागेल. आयुष्यमान भारत सारख्या योजनेमुळे बदलास सुरुवात झाली आहे. भूतकाळापासून आपण धडा घेण्याची आवश्यकता आहे. तिसरी लाट आणि डेल्टा प्लससारख्या नव्या व्हेरिएंटचा सामना करण्याची आपली तयारी आहे. ही तयारी केवळ कोरोनाच्या बाबतीत असता कामा नये तर इतर प्रकारच्या आरोग्य संकटाचा मुकाबला करण्यासाठी असणे गरजेचे आहे. भविष्यातही वेगवेगळ्या प्रकारच्या रोगराईचा प्रादुर्भाव झाला तर त्याला प्रतिकार करण्याकरिता आपण सज्ज असले पाहिजे. पब्लिक हेल्थ सिस्टीम म्हणजे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था तंत्रज्ञान आणि डेटाच्या आधारावर चालविणे जाणे गरजेचे आहे, असे सांगत डॉ. गुलेरिया म्हणाले की, लहान मुलांसाठी लस तयार होणे ही एक मोठी उपलब्धी ठरेल. मुलांचे पूर्ण लसीकरण झाल्यानंतरच शाळा खर्‍या अर्थाने सुरू होतील. सध्या २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीवर काम सुरू असून सप्टेंबर महिन्यापयर्ंत ट्रायलचे निष्कर्ष समोर येऊ शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या