
पाटणा : बिहारमध्ये सध्या लोकजनशक्ती पार्टीत जोरदार घडामोडी सुरू असल्याचे दिसत आहे. पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी पक्षनेते चिराग पासवान यांच्याविरोधात बंड करून, त्यांचे काका पशूपती कुमार पारस यांची नेतेपदी निवड केली असून, आता चिराग पासवान यांना लोकजनशक्ती पार्टीच्या अध्यक्षपदावरूनही हटववण्यात आले आहे. त्यामुळे चिराग पासवानसाठी या घडामोडी अतिशय धक्कादायक ठरत आहेत.
चिराग पासवान यांच्या जागी सूरजभान यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेली आहे. सूरजभान हे पक्षाच्या नव्या अध्यक्षाची निवड प्रक्रिया संपन्न करतील. पाच दिवसांच्या आत राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक बोलावून नव्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. या अगोदर चिराग पासवान यांना पक्षाच्या संसदीय नेतेपदावरून हटवण्यात आले होते. लोकजनशक्ती पक्षाच्या (एलजीपी) बंडखोर खासदारांनी नेतेपदी निवड केलेले पशूपतीकुमार पारस हे पक्षनेते चिराग पासवान यांचे वडील आणि लोकजनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू आहेत. तर, या सर्व धक्कादायक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चिराग पासवान यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या ट्विटसोबत त्यांनी एक जुने पत्र देखील जोडलेले आहे. वडिलांनी बनवलेला हा पक्ष आणि आपले कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी मी प्रयत्न केले, मात्र अयशस्वी ठरलो. पक्ष आई समान आहे आणि आईला धोका नाही दिला पाहिजे. लोकाशाहीत जनताच सर्वकाही आहे, पक्षावर विश्वास ठेवणार्या लोकांना मी धन्यवाद देतो. एक जुने पत्र सार्वजनिक करतो आहे. असे चिराग यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. लोक जनशक्तीपार्टीतील अंतर्गत कलहामुळे चिराग पासवान यांना फटका बसला आहे. लोक जनशक्तीपार्टीच्या पाच बंडखोर खासदारांची मागणी सभापतींनी स्वीकारली आहे.
0 टिप्पण्या