
नागपूर :अधिक रोजगार निर्मिती हे देशासमोरील आव्हान असून रोजगार निर्मितीसाठी उद्यमशीलता महत्त्वाची आहे. उद्यमशीलतेशिवाय रोजगार निर्मिती शक्य नाही. रोजगार निर्मिती झाली तर गरिबी आणि उपासमारही थांबवणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
उद्योजक आणि व्यावसायिकांशी एका आभासी कार्यक्रमात ते संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी बोलताना गडकरी पुढे म्हणाले, एमएसएमई हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. उद्यमशीलता वाढविण्यात आणि सामाजिक व आर्थिक विकासात एमएसएमईची भूमिका महत्त्वाची आहे. तसेच मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यातही या विभागाचा मोठा सहभाग आहे. ११५ मागास जिल्हे, कृषी ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रातील कच्चा मालावर आधारित उद्योगांची संख्या वाढली तर उद्यमशीलता वाढेल आणि रोजगार निर्मिती होईल. कृषी, पर्यटन या क्षेत्राचा विकास झाला, तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचे सकारात्मक परिणाम होतील. कृषी व वनांपासून मिळणार्या कच्च्या मालापासून बनलेल्या वस्तूंना जागतिक स्तरावर चांगली मागणी आहे. त्यामुळेच कृषी, ग्रामीण आदिवासी क्षेत्रात उद्यमशीलतेचा विकास होणे देशासाठी महत्त्वाचे आहे.
0 टिप्पण्या