Header Ads Widget

सोशल मीडियावर नियंत्रण आणण्याचे धोरण हवे.!

मुंबई : सोशल मीडिया झपाट्याने बदलत असून त्याची व्याप्तीही मोठी आहे. या माध्यमाची व्याप्ती असली तरी त्यातवर कोणाचे नियंत्रण नसल्याने त्यातून पसरवल्या जाणार्‍या चुकीच्या माहितीला, अफवांना बळी पडता कामा नये. त्याबाबत सावध राहिले पाहिजे. हे एक दुधारी शस्त्रच असून लोकप्रियता विशेष करून सवंग लोकप्रियता हा त्या माध्यमाच्या यशाचे गमक झाले आहे. मात्र यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारला धोरण आणावे लागेल, आर्थिक तरतूदही त्यासाठी करावी लागेल, असे मत मेजर जनरल नितीन गडकरी (नवृत्त) यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरने रविवारी १३ जून २0२१ यादिवशी आयोजित केलेल्या ऑनलाइन संवादामध्ये मेजर जनरल नितीन गडकरी (नवृत्त) बोलत होते. भारतातील सोशल मीडियाच्या शस्त्राला कसे रोखावे, या विषयावरील एका महत्त्वपूर्ण संवादात त्यांनी खूप मोलाची माहिती दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरचे मानद संचालक ब्रिगेडियर हेमंत महाजन (नवृत्त) यांनी ऑनलाइन कार्यक्रमात ही संवादवजा मुलाखत घेतली. मुलाखतीचा हा दुसरा भाग होता. महाजन यांनी विविधांगी प्रश्न विचारले. गडकरी म्हणाले की, या सोशल मीडियामध्ये इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप असे विविध घटक येतात. लोकांना काय आवडते यावर हे सोशल मीडियाचे प्रकार असून त्यावर त्यांची लोकप्रियता अवलंबून आहे. हे त्यामुळे एक प्रकारचे शस्त्रच झाले आहे. प्रिंट मिडियासारखे जबाबदारीने बोलणारे वा जबाबदारी घेणारे येथे कोणीच नसते. सवंतपणामुळे मिळणारी लोकप्रियता आणि त्यामुळे अफवा वा खोट्या बातम्यांना बळी पडणे हे प्रकार होतात. त्यात मिळणार्‍या लाइक्सवर ही लोकप्रियता अवलंबून राहाते. विचार डावा असो वा उजवा त्यात सुधारणावादी विचारांना मात्र येथे विचारातही घेतले जात नाही. लोकांची मते, दृष्टिकोन विभाजित करणे व दुही पसरवणे हीच संकल्पना येथे निर्माण झाली आहे. ही बाब सोशल मीडियाला शस्त्रासारखे स्वरूप देणारी ठरली आहे. चीन, पाकिस्तान वा युरोपातीलही देशातील प्रिंट मीडियावरील व सोशल मीडियावरील बातम्या, माहिती यामुळे हे सर्व शस्त्रीकरणच चालले आहे. त्यांना योग्य उत्तर देणे, त्वरेने खोटेपणा उघड करणे हे गरजेचे आहे. परदेशातील सामाजिक प्रसार माध्यमांमधील, प्रिंट मिडियामध्ये भारतविरोधी बातम्या वा माहिती प्रसिद्ध होते , त्यांना उत्तर त्यांच्या स्पर्धक माध्यमातून देता येऊ शकते. उत्तर देण्याचे ते प्रमाण वाढवायला हवे. मुळात हे प्रकार थांबणारे नाही, असेही गडकरी यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

goverdhan म्हणाले…
सोशल मीडिया हा आज बहुजन मीडिया म्हणून प्रसिद्ध पावत आहे वेगवेगळे विचार प्रवाह पुढे येत आहेत त्यातून हवे ते घेणे आपापली जबाबदारी आहे परंतु सोशल मीडियावर बंदी आणणे हात यावर पर्याय नाही. असे अनेक दुधारी शस्त्र असतात शिक्षण सुद्धा दुधारी शस्त्रच आहे कारण शिकलेले श्लोक समाजाची अधिक फसगत करतात म्हणून शिक्षण वाईट होत नाही त्यासोबत शीलाची आवश्यकता असते आणि ती धम्म आचरणाने मिळते म्हणून आज जगाला धम्माची गरज आहे.