Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

निसर्गाच्या परोपकाराची परतफेड करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करूया.!

निसर्गाने मानवाला भरभरून खूप दिले. एवढेच नाही तर हे सर्व पवित्र व गुणवत्तापूर्वक सुद्धा होते. ह्यामध्ये मानवाला आवश्यक असलेला प्राणवायू, सूर्यप्रकाश, पाणी, खनिज संपत्ती, पक्षी, प्राणी  व वनस्पती आहे. ते सुद्धा विनामूल्य व कुठलेही अपेक्षा न ठेवता जणू मानवावर निसर्गाने परोपकाराचं केले. जणू काही निसर्गाचा जन्मो जन्मीचा  दृढसंबंध असलेले नाते होते. जणू काही निसर्ग मानवावर अतोनात प्रेम करतो. जसे काही निसर्गाने मानवाचे पालकत्व घेतले व त्याप्रमाणे तो मानवाचे पालन पोषण करतो आहे.  

मानवाची निसर्गही हा खूप काळजी घेतो. त्याची तहान भागली पाहिजे, त्याला प्राणवायू मिळाला पाहिजे. त्याला सूर्यप्रकाशातुन डी जीवनसत्व मिळाले पाहिजे. वनस्पती पासून औषधी मिळाल्या पाहिजे. खाणींमधून खनिजे व समुद्रातून नैसर्गिक साठा मिळाला पाहिजे.  

मानवाने निसर्गा पासून आता पर्यंत घेण्याचेच काम केले आहे व ही प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. औद्योगिकरणाच्या नावा खाली, मोठं मोठे महामार्गाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड झाली आहे व होत आहे. 

ह्या निसर्गाच्या अमूल्य ठेवींचा उपसा सुरूच आहे व त्यामुळे निसर्गाचे तापमानात मोठया प्रमाणात वाढ झाली आहे व त्याचे दुष्परिणाम मानव जातीवर होत आहे. तरी पण मानव जात ही काही सुधारल्या सुधारत नाही आहे. हे मानवासाठी  मोठी धोक्याची घंटा आहे. त्याचे दुष्परिणाम आपण सध्या भोगत आहोत. 

सध्या गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीने विश्व जखडले गेले आहे. निसर्ग मुबलक प्रमाणात प्राणवायू देत होता त्याचे मूल्य आता मानवाला कळले आहे आणि ह्याच प्राणवायूसाठी  माणूस वाटेल ते करायला व वाटेल ती किंमत द्यायला तयार झाला आहे.  

ह्यासाठी काही ठोस प्रामाणिकपणे उपक्रम राबविण्याची नितांत गरज आहे. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत जनजागृती होणे फार गरजेचे आहे. जसे की, १) शालेय व महाविद्यालयीन स्तरांपर्यंत पर्यावरणाचे महत्व व त्यावर उपाय हा विषय प्रत्येक स्तरावर असणे अनिवार्य असले पाहिजे. कारण की, लहानपणा  पासून जर आपण पर्यावरणाचे महत्व रुजविले तर त्याचे नक्कीच चांगले परिणाम भविष्यात बघायला मिळतील. २) प्रोत्साहनपर  योजनांना प्रोत्साहन : जे नागरिक पर्यावरण संबंधी उपक्रम राबवितात  त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे. मग ते सत्काररूपी  असतील, बक्षिसे रुपी  असतील किंवा प्रमाणपत्र रुपी असतील. ३) जनजागृती व्हावी : अजूनही आपला देश पूर्णपणे साक्षर झाला नाही  आहे. सर्वच काही शाळा महाविद्यालयात शिक्षण घेत नाहीत. परंतु त्यांना सुद्धा निसर्गाचे  महत्व पटविण्यासाठी मोहल्या मोहल्ल्यात, खेडो पाडी, वस्त्या-वस्त्यात - झोपडपट्टीत पर्यावरण विषयक पथनाट्य आयोजित करून जनजागृती करायला पाहिजे. ४) तात्काळ कृतीचे प्रोत्साहन : आपण बऱ्याच समाजपयोगी  कृतींना प्रोत्साहन देत असतो. जसे एखादे शौर्य कार्य केल्यास, कोणाचे प्राण वाचविले असल्यास. असेच एखादे पर्यावरण उपयोगी कोणी कार्य केल्यास त्याचा गौरव केला पाहिजे.  आज आपणास बऱ्याच ठिकाणी पाण्याचा अपव्यय होताना दिसत असतो. जसे की, पाण्याची पाईप लाईन फुटलेली असते, बरेच पाणी वाहत जात असते ते जर कोणी उत्स्फूर्त पणे लक्षात आणून दिले तर त्याचा गौरव करायला पाहिजे जेणे करून दुसरे प्रोत्साहित होऊन अशाप्रकारचे कार्य करतील व पर्यावरणाचे नुकसान होणार नाही. ५) सामाजिक आंदोलन उभे केले पाहिजे : आपणास माहीतच आहे की, इवल्याशा ग्रेटा थुनबर्ग ने सर्व विश्वाचे पर्यावरणासाठी लक्ष्य वेधले.  आपण सुद्धा चांगल्या पर्यावरणासाठी सामाजिक आंदोलन छेडले पाहिजे व सरकारला चांगल्या पर्यावरणासाठी आपला हक्क उजागर केला पाहिजे. अशाप्रकारचे आत्तापर्यंत आंदोलन झाले नाही पण येत्या काळात करणे फार गरजेचे आहे. कारण की, पर्यावरण आहे तर मानव आहे. ६) नैसर्गिक संपत्तीची काटकसर - पाणी, खनिज व वनस्पती आदी संपत्तीची काटकसर करणे फार गरजेचे आहे. ह्या संपत्ती बहुमोल असून त्याची नितांत गरज आहे.  

आपण बरेच काही निसर्गा कडून घेतले आहे पण निसर्गाला आपण दिले काहीच नाही. आता गरज आहे ते आपण ज्या नैसर्गिक संसाधनांचा उपयोग घेतला ते पुनर्रस्थापित  करण्याचा. हे देणे आपण काय निसर्गाला देतो असे नाही तर ते मानवालाच मानव कल्याणासाठी देतो आहे. कालपर्यंत माणूस हा मडक्यातून पाणी आणायचा आता तो रेल्वे ने या शहरातून त्या शहरात नेतो आहे. दक्षिण आफ्रिकेत तर फार भयावह  स्थिती आजच निर्माण  झाली आहे. तिथे पाण्या अभावी शहरचं खाली करण्यात येत आहेत. आता आपल्याला पाणी आडवा पाणी जिरवा ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबवावी लागणार आहे.  

निसर्गामधील सजीव आणि निर्जीव घटकांचा परस्पर संबंध म्हणजे इकॉलॉजि होय आणि ज्या विषयांतर्गत याचा अभ्यास केला जातो तो म्हणजे पर्यावरणशास्त्र होय. पर्यावरणशात्र हा अनेक विषयांना स्वतः मध्ये सामावून घेणारा विषय आहे. ज्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशात्र, जीवशास्त्र, अभियांत्रिकी, भूगोल, तंत्रज्ञान, अर्थशात्र, समाजशाश्त्र, नीतिशास्त्र, इतिहास, कला या सारख्या अनेक विषयांचा पर्यावरण शास्त्रामध्ये समावेश  होतो. दिवसेन दिवस वाढत चाललेली मानवी लोकसंख्या व मानवाच्या वाढत जाणाऱ्या गरजा आणि त्यातून होणारे नैसर्गिक साधनसंपत्तीचे अतोनात नुकसान यामुळे पर्यावरणाची न भरून येण्याजोगी हानी होत आहे. आपली जीवनशैली बदलून पर्यावरणाकडे पाहण्याचा मानवी दृष्टिकोन बदलण्यासाठी आज पर्यावरणशास्त्रा विषयी जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे.  

१९७४ पासून संयुक्त राष्ट्रांनी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन साजरा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दरवर्षी एक थीम ठरवून जगभरातील  सरकार, उद्योग, विविध संस्था  पर्यावरणाशी संबंधित  प्रयत्न करतात. २०२१ वर्षासाठीची थीम आहे इकोसिस्टम रिस्टोरेशन (Ecosystem Restoration ) म्हणजे परिसंस्थेचे हानी रोखत तीच संतुलन  भरून काढण्याचे प्रयत्न करणे हे होय.  

जगभरात दर तीन सेकंदांनी एखादया फुटबॉलच्या मैदाना एवढ जंगल नष्ट होतंय. जगभरातल्या एकूण प्रवाळांपैकी ५०% प्रवाळ ( Corals ) नष्ट झाली असून २०५० पर्यंत ९०% प्रवाळ नष्ट होण्याचा अंदाज आहे.  

पर्यावणाची हानी टाळली, संतुलन साधलं गेलं तर त्याचा फायदा मानव जातीला होईल, गरिबी कमी होईल, हवामान बदल कमी होतील आणि विविध प्रजाती नामशेष  होणार नाहीत.  

ह्या अश्या भयावह परिस्थीतूतून बाहेर पडायचे असेल तर निसर्ग राजाची काळजी घेणे फार गरजेचे आहे. जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!
- अरविंद सं. मोरे, 
नवीन पनवेल पूर्व 
मो.९४२३१२५२५१, 
ई-मेल : arvind.more@hotmail.com  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code