
नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने शाळा बंद असताना आणि नंतरही विद्यार्थ्यांच्या घरगुती अध्ययनात पालकांच्या सहभागासंदर्भात मार्गदर्शक नियमावली जारी केली आहे.
महामारीच्या काळात या पूर्णपणे नवीन परंतु हळूहळू सवयीच्या होऊ लागलेल्या परिस्थितीमध्ये बालकांचा विकास आणि शिक्षण यामध्ये पालकांची भूमिका अतिशय महत्त्वाची असल्याचे मानून, शाळा बंद असताना बालकांच्या अध्ययनात कोणतीही शैक्षणिक पात्रता असलेल्या पालकांना सहभागी होता यावे आणि त्यासाठी का, कशासाठी व कशा प्रकारे याबाबत माहिती देण्याच्या उद्देशाने ही नियमावली तयार करण्यात आली आहे, असे केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांनी ट्विटर संदेशात म्हटले आहे.
घरी राहून शिकण्यासाठीच्या नियमावलीने यासाठी सुरक्षित, गुंतवून ठेवणारे आणि शिकण्यासाठी सकारात्मक प्रभाव टाकणारे वातावरण ठेवणे, पाल्याकडून अवास्तव अपेक्षा न ठेवणे, तसेच आरोग्याची काळजी घेणे, पौष्टिक खाणे यासोबतच मुलांसोबत मौजमजेसाठी वेळ देणे या बाबींवर भर देण्यात आला आहे. ही नियमावली केवळ पालकांसाठी नसून अन्य काळजीवाहू , कुटुंबातील इतर सदस्य, आजी-आजोबा, समाजातील इतर घटक तसेच मुलांच्या विकासात हातभार असणारी त्यांची मोठी भावंडे यांनाही मार्गदर्शन करते.
पालकांनी तसेच इतरांनी मुलांना सहकार्य करण्यासाठी सहाय्यक ठरणार्या अनेक महत्त्वाच्या बाबी या नियमावलीत समाविष्ट आहेत. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शालेय शिक्षणाच्या विविध स्तरांनुसार या सूचना आहेत.
0 टिप्पण्या