Header Ads Widget

लुंबिनी वनातून बुध्दगयेकडे गेलेल्या प्रकाशवाटेने निघालेली कविताः "मी उजेडाच्या दिशेने निघालो "- तान्हाजी खोडे

विदर्भातील प्रसिध्द कवी तथा समीक्षक 
अरुण विघ्ने यांचा ‘ मी उजेडाच्या दिशेने 
निघालो ’ हा कवितासंग्रह मिळाला; 
पुस्तकाकडे पाहून कुणालाही मोह व्हावा 
इतके देखणे मुखपृष्ठ पाहून मलाही भूरळ 
पडलीच . तसा हा त्यांचा चौथा कवितासंग्रहआहे. याआधी त्यांचा 'पक्षी', 'वादळातील 
दिपस्तंभ 'आणि व-हाडी बोलीतील 'जागल 'असे तीन कवितासंग्रह 
प्रकाशित आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला 
परिचीत असलेले अरुण विघ्ने साहित्य 
वर्तूळात वेगळा ठसा उमटवून आहेत.

उच्च विद्याविभूषित असलेले अरुण विघ्ने 
आंबेडकरीआणि ग्रामीण साहित्याचे गाढे 
अभ्यासक आहेत. वैदर्भीय तळागाळातील 
वंचीत ,शोषीत आणि बहूजनांच्या 
जगण्याची होरपळ बघितलेल्या अस्वस्थतेचे पडसाद त्यांच्या कवितेत 
प्रकर्षाने जाणवतात.

खरी कविता ही प्रसव वेदनेनंतरचे अपत्य 
असते. हे विधान विघ्ने यांच्या बाबतीत 
तंतोतंत लागू होते. शेती-  माती आणि ग्रामीण संस्कृतीशी नाळ 
जुळून असलेला हा कवी सुधारणावादी ,
क्रांतिकारी विचारांचा पुरस्कर्ता आहे. डॉ. 
भूषण रामटेके यांनी प्रस्तावनेत 
म्हटल्याप्रमाणे भगवान बुद्धांच्या वैचारिक 
मुशीतून पुढे जाणरी ही कविता आहे. त्याही पुढे जाऊन मी म्हणेन की, महापुरूषाच्या 
विचारांचे अजब रसायन आहे.

फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा मूळ पाया असलेल्या ह्या  कविता अस्सल वऱ्हाडी बाजाच्या असून धम्मक्रांती ,समाजकक्रांती, अर्थक्रांती आणि ग्रामोन्नतीसाठीच्या प्रवासाला निघालेल्या आहेत. 
भविष्यातील उद्भवणारे धोके लक्षात घेता; कवी समाज बांधवासाठी महापुरूषांच्या 
विचारंची मशाल हातात घेऊन क्षणोक्षणी जागल्या झालेला जाणवतो.

शेतकरी कष्टकरी आणि वेठबिगारी वर्गाच्या देहातून रक्त शोषून आपली भूक शमविणाऱ्या सारस्वतांच्या वृत्तीवर आसूड ओढत ; वंचितांना नवी दिशा दाखवणाऱ्या स्त्री शिक्षणाचे 
जनक ज्योतिराव फुले यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी ‘ ज्योतिबा ’ ही संग्रहाची नमन कविता एका महापुरुषाप्रति कृतज्ञता व्यक्त करणारी असल्याने साहित्यकृती वेगळ्या उंचीवर जाते .

"तुम्ही झुगारलेत गुलामगिरीचे बंध
तोडलेत जातिभेदाचे साखळदंड 

मात्र आम्ही कृतघ्न होऊ नये
तुमच्या परिवर्तनाशी- एवढंच वाटतंय ".

राजरोस भडकणाऱ्या धगधगत्या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधात खंत व्यक्त करणारी कविता - ' गर्दी अशी पांगायला नको होती .'
उजेडाच्या दिशेने चालताना तरुण पिढीला हा कवी सोबत येण्याचे आवाहन करतो आहे . सत्यापासून गाफिल असलेल्यांची कान उघाडणी करत मर्मभेदी प्रश्न विचारतो आहे. केवळ कलम कसाई न होता भुकेचा एल्गार करणाऱ्यांना सुस्तीसाठी विखारी धर्माची गोळी दिली जाते. त्याच सुस्तीच्या नशेत देशभक्तीची लस टोचून देशाच्या भुकेचा आजार बरा होत नाही. त्यासाठी पोटात खळबळणाऱ्या आतड्यांना भाकरीच हवी असते हे सांगणारे  अरुण विघ्ने क्रांतीकारी विचारांचे पाईक वाटतात. पहिल्याच ओळीत ते खेद मांडतात -

"शोषितांनाच टीकेच्या पिराण्या टोचून
काय हाशील होणार आहे मित्रहो !"

खायला उठलेल्या धुऱ्याच्या चक्रव्यूहात अडकलेल्या जगाच्या पोशिंद्याकडे पाहताना कवी दु:ख व्यतीत करतो . बळीला बळीचा बकरा करणाऱ्या संसदीय ठरावांच्या  विरोधात उठलाच एखादा... पेटलाच एखादा कर्तबगार तर त्यालाही अस्थेची भांग पाजून घेतले जातात कापून त्याचे अंगठे...  गुरुदक्षिणा म्हणून एकलव्यासारखे... त्यामुळे इतिहासाची पुनरावृत्ती करत दक्षिणाधार्जीण्यांना टाळूत कवी अरुण विघ्ने मित्रांना आपल्यासोबत खऱ्या महापुरुषांच्या विचार उजेडाकडे यायला सांगतात .

"बळीचा बळी घेणारे कायदे
व्यवस्थापन केव्हा बदलणार आहे ? "

महामारीच्या आक्राळ-विक्राळ बाहूंच्या प्रचंड घट्ट विळख्यात अडकलेल्या समस्त मानवाकडे पाहताना कवी अरुण विघ्ने प्रचंड व्यथित होतात. त्यातून त्यांना वाटणारी खंत ही परमोच्च आहे. लोकशाही प्रधान देशाच्या अस्मितेलाच  बाधीत करू पाहणाऱ्यांना खडा सवाल करतात . 

"लोकशाहीच्या एकेका 
अॉक्सिजन तत्वांचा 
लिलाव तर होत नाही ना ?"

दोन वेळच्या भूकेच्या भ्रांतीने पिचलेल्या अवतालभोवतालाकडे पाहताना विघ्ने यांना संशय वाटतो. लोकशाहीप्रधान देशात सत्ता कोणाची ? दर पाच वर्षांनी नखाला निळी शाई लावणाऱ्या गणाची ?  प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मानसिक गुलामीची ? की खऱ्या लोकप्रतिनिधीची ? की ? देश , समाज आणि लोकशाही घातकी छुप्या विचारांची ? त्यांचे प्रश्न स्वार्थाची पोळी भाजून घेणारे नाही तर... भीषण वास्तवाचे खंडन करणारे आहेत .

"आतून बाहेरून अर्थाची सूज आलेल्या
धुरिणांना कोण विचारणार सुजीचे कारण ?
कोण बसविणार जरब ?"

मानसिक विचारांच्या प्रदूषण सदृश्य वातावरणात मातीत वाढणारे बिजांकुर हिरवीकंच कसे दिसतील ? फक्त दिनदर्शिकेच्या पानावरच्या तारखा बदलल्याने खरंच बदल होतो का ? 
डोळ्यांसाठी कनव्हसवरची हिरवाई भावस्पर्शी असेलही... पण त्याला पाना फुलांचा गंध कसा असेल ? योजनांची पोकळ हाडे चघळताना आपल्याच हिरड्यांच्या रक्ताने पोट भरते का ? हे सर्व मर्म जाणून विघ्ने सावध करतात.

"वळवळणाऱ्या रातकिड्यांच्या भूतकालीन
काळ्या रात्री भेदून-----
आम्ही त्या 
शाश्वत उजेडाच्या दिशेने 
निघालो पाहिजे... कायमचे...!"

दिव्यांनीच ठरवावं ह्या कवितेत कवी अत्यंत मर्मिक उपमा वापरून प्रतिपाद्य विषय वाचकासमोर ठेवतो. या कवितेचा लक्षार्थ प्रचंड ताकदीचा आहे. दिवा , पणती , सूर्य आणि तारे हे प्रतीकं  वजा उपमा कवी समाजात ज्ञान प्रसविणाऱ्या तमाम सुधाकरांसाठी वापरतो . थोर महापुरुष एखाद्या सूर्याप्रमाणे असता आसमंत उजाळीत समाजासाठी झिजून गेले . त्यांच्या पश्चात आपण एखादी ठिणगी होऊन ते कार्य पुढे सुरू ठेवायचं . यथाकुवतीने येथे जसा अंधार असेल तसं आपण पेटत जायचं . कुणासाठी दिवा व्हायचं तर कुणासाठी पणती व्हायचं ; पण ज्ञानाचा, सत्याचा उजेड मात्र देत राहायचं. म्हणून अरुण विघ्ने यांची कविता केवळ उजेडाकडे जाणारी नाही तर ती स्वतः उजेड होऊन समाजिक स्तरावरील अंधार जाळत जाणारी कविता आहे.

"झोपडीत नसतो एखादाही दिवा
तेथे अश्रूंनी का नाही पेटायचं... 
जाळून मनामनांतील काजळी
अंतर्बाह्य चकचकीत व्हायचं...!" 

मानवतावादाचे पुरस्कर्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर 
१९५६  नागपूरच्या दीक्षाभूमीवर तमाम 
बहुजनांना बुद्धांच्या विज्ञानवादी विचारांचे अनुयायी बनवून दीक्षा दिली. भगवान गौतम बुध्दाच्या आचार-विचारांचा प्रसार  आणि मानवामध्ये सम्यक विचारधारा प्रसवून नवे आयाम खुले करून दिले. म्हणूनच कवी अरुण विघ्ने म्हणतात प्रत्येक मानवाने या दीक्षाभूमीवर येऊन या बुद्धीच्या , ज्ञानाच्या सम्यक  महासागराच्या काठावर बसून त्या महासागरांचा एक थेंब होऊन रहस्य शोधावं . हे असले विधान करणारे विघ्ने यांचे शब्द एक प्रकारची विनंतीवजा आवाहन वाटतात. 

"बाबासाहेब !
पिढ्यांन् पिढ्या आमच्या डोक्यात
जमलेली जळमटं तुम्हीच काढलीत...!"

एखाद्या महामानवाचे महापरिनिर्वाण हे समस्त मानवी संवर्गाच्या काळजाला चटका लावून जाते. जेव्हा ०६ डिसेंबर १९५६ ला सकल बहुजनांच्या डोक्यात ज्ञानाचा , जाणिवांचा आणि लढण्याचा प्रकाश टाकत क्रांतीसूर्य मावळला त्या क्रांतीसूर्याची किरणं आजही समाजाला दिशादर्शक निश्चितच आहेत. त्याचीच साक्ष म्हणून असलेले अरुण विघ्ने आपल्या कवितेतून त्या महामानवाला एक प्रकारे अभिवादन करताना दिसतात.

"नतमस्तक होतात लाखो डोकी
तुमच्या विचारांसमोर प्रज्ञासूर्या
सर्वांनीच घ्यावा तुमचा आदर्श
तरच घडेल सेवा समाजाची साऱ्या."

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रूढी-परंपरेचे कुप्रथेचे उखळात मिरच्या कुटाव्यात तसं कांडण करून माणसाला माणसात आणले. उभ्या देशाला संविधान देऊन जातीभेद आवळून ठेवणारे साखळदंड तोडले. अशा बाबासाहेबांच्या उपकाराचे ऋण केव्हाच फिटणार नाहीत . म्हणून तुकारामाच्या अभंगाप्रमाणे -

"काय द्यावे त्यासी व्हावे उतरायी 
ठेवीता हा पायी जीव थोडा..."

अशी भावना अरुण विघ्ने यांच्या' दयन दयते भिमाई' या कवितेत दिसते. त्यामुळे भीमराव रामजी आंबेडकरांना मायची उपमा देऊन ऋणाईत मानणारी कविता वाचकाला आपलेसे करते.

"मायी माय भीमाबाई
करी जात्यात दयन
उखयात मिर्च्यावानी
करी कुप्रथाचं कांडन "

भगवान गौतम बुद्धांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारी कविता 'बोधिवृक्षाखाली '. या कवितेत कवी असीम चराचराला शांती बहाल करणाऱ्या गौतमांच्या विचारांचे पाईक होण्यासाठी आवाहन करताना दिसतो. कवितेतील नायक आपल्या प्रेयसीला, पत्नीला गयेच्या बोधिवृक्षाखाली, करूणाकराच्या मायेखाली आभाळ पांघरून क्रांतीचे नवे घर बांधण्याचा विचार सांगतो. आपले उर्वरित आयुष्य भरकटलेल्या निळ्या पाखरांना शांतीचे, प्रेमाचे स्वर देत उजेडाच्या दिशेने अंतिम प्रवास करू असे ठामपणे म्हणतो. 

"उर्वरित आयुष्य बहाल करू
भरकटलेल्या निळ्या पक्षांना
गीत गाऊ सत्य, शांती, प्रेमाचे
अंतिम प्रवासाला निघताना."

गौतम बुद्धाच्या मार्गाने निघालेला हा कवी बुध्दाच्या मार्गाला उजेडाकडे जाणारा मार्ग समजतो. जो मार्ग शब्दांच्या पलीकडील अव्यक्त दुनियेतून जातो. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर दुःख मुक्त होऊन छिन्न विछिन्न मनाच्या जखमांना तुझ्या करुणेचा ओलावा उभारी देईल. असे मानत पिढ्यानपिढ्या कवटाळून असलेल्या बंधनांना झुगारून काळोखातून; शब्दांच्या पलीकडे असलेल्या गौतमाच्या शांतीमय दुनियेत अंतर्बाह्य शुद्ध होण्याच्या निर्व्याज हेतूने कवी उजेडाकडे निघाला आहे.  त्यासाठी तो बुद्धाला बोधिवृक्षाखाली दोन पावलांची जागा रिती ठेवण्याची विनंती करीत आहेत .  म्हणून संग्रहाचे शीर्षक ' मी उजेडाच्या दिशेने निघालो ' हे यथार्थ वाटते.

"तुझ्याकडेच येत आहे शांतीदुता
मी उजेडाच्या दिशेने निघालो आहे "

माणुसकी हे विश्वातील चिरंतन सत्य असलेले पवित्र नाते आहे. त्यासाठी इतर कुठल्याही बाबीची गरज भासत नाही.  एक धागा नात्याचा या कवितेमध्ये समता हे एकेकाळच्या महापुरुषांच्या विचारांचे अधिष्ठान आहे. त्यामुळे प्रेमाने जोडलेले एक एक अक्षर हे एक एक माणूस जोडणाऱ्या ओळी व्हाव्यात अशी अपेक्षा कवी करतो .

"कोणत्याही जाती, धर्म, पंथ, देश, 
वर्णाच्या एकेका माणसाला 
समाजसमूह बनविण्यासाठी "

असत्य आणि दुःखाचा नि:पात करणाऱ्या पाऊलखुणा पाहून आपल्या सकल बांधवांना या वाटेवर चालताना आपल्या मेंदूचा विचार घेऊन आपल्या सोबत येण्याचा सल्ला देतो. बुद्धाच्या पंचशील तत्व, दहा पारमिता आणि अष्टांगिक तत्व अंगीकारून मी उभा आहे.  तेव्हा हे अजान बंधो तुम्ही माझ्यासोबत मैत्री करा अहिंसा आणि शांतीच्या मार्गाने चला अशी करुणा भाकणारे विघ्ने अस्सल बुद्धवादी विचारांचे अनुयायी शोभतात. ते प्रतीत करणाऱ्या ओळी-

"तुझ्या आस्तिक मेंदूचा विचार घेऊन 
विचार झाला की मला सांग 
मी उभा आहो... तुझी वाट बघत..."

मानव मुक्तीचा जाहीरनामा म्हणजे भारतीय संविधान अशी थोडक्यात पण मार्मिक व्याख्या करणारे अरुण विघ्ने भारतीय संविधानाला वंदनीय मानून संविधानाप्रती आपला आदर व्यक्त करतात.

संविधान म्हणजे घटनाकारांच्या कुशाग्र बुद्धीचा जागर... संविधान म्हणजे पिढ्यान् पिढ्यांचा अंधार दूर करणारा उजडाशी करारनामा...  संविधान म्हणजे मानव मुक्तीचा जाहीरनामा... संविधान म्हणजे न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुता प्रदान करणारा दस्ताऐवज... संविधान म्हणजे शोषितांच्या, वंचितांच्या आयुष्याचा आधार...  संविधान म्हणजे आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, समाजिकतेचा सलोखा... संविधान म्हणजे मानव मुक्तीचा खरा जाहीरनामा. अशा कितीतरी चपखल व्याख्या करून संविधानाची महती छातीठोकपणे कवी विघ्ने सांगतात.

या संविधानाचा आदर करताना अनेक अर्थ लावणाऱ्यांनी गद्दार होऊ नये. स्वार्थापायी दगलबाजांच्या कंपूत राहून स्वाभिमान विकू नये. संविधान आमचा सन्मान आहे हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तो एक फक्त मार्गदर्शक दस्तऐवज नाही तर देशाचा आत्मा आहे आणि मानव मुक्तीची कथा आहे. असे सांगणारे असे अरुण विघ्ने संविधानाला आपले सर्वस्व मानतात . 

' बा!' क्रांती सूर्याला वंदन करणारी कविता - हजारो वर्षापासून बुरसटलेल्या रूढी परंपरेच्या जाळ्यात खाच खळग्याचे आयुष्य कठणाऱ्यांना तळपत्या सूर्याकडे बघण्याची दृष्टी देणारे महामानव... ग्लानी आल्यासारखे निपचीत पडलेल्यांना लढण्यासाठी वाघाची जिद्द देणारे राष्ट्रपुरूष... ज्यांनी परिस्थितीशी दोन हात करण्याची ताकद दिली . मनगटात रग आणि छातीत धग असलेल्या स्व-सामर्थ्याची जाणीव तुम्हीच करून दिली. आमच्या इच्छित सुखांची बाग फुलवली.  हे सारं करताना स्वतःच्या सुखावर पाणी फेरले आहे. सतत शोषीतांची कणव वाहिली म्हणून कवी त्यांना बाप म्हणतो. कनवेच्या पाझराने तुझ्या लेकरांनी ह्या तुझ्या त्यागाची जाणीव ठेवून वागलं पाहिजे . तेव्हाच बाबा तुमचा त्याग व्यर्थ जाणार नाही. असा आशावाद कवी जपतो आहे.

"तू आम्हास तळपत्या सूर्याकडे
बघण्याची दृष्टी दिलीस
स्व- सामर्थ्यावर उभे राहण्याची शक्ती दिलीस!"

अरुण विघ्ने यांच्या कविता म्हणजे मुक्या शब्दांचा टाहो आहे . त्यामधून ते एक संदेश देतात. मरून जगायचं की जगून मरायचं आपल्या कर्मावर ठरतं. असा सोप्या शब्दात जीवनमरणाच्या पलिकडील सिंध्दांत विषद करणारे विघ्ने संभाव्य धोक्याची चाहूल घेऊन सतर्कतेचा इशारा देणारे आहेत. त्यामुळेच ते चिरंतन उजेडाच्या दिशेने निघाले आहेत. 

स्वातंत्र्या ! या कवितेत नामदेव ढसाळांच्या विचारांचा सौम्य विद्रोह जाणवतो. तुझ्या चौऱ्याहत्तराव्या वाढदिवसाच्या दिनी आम्ही उघडे-नागडे, अर्धपोटी, उपाशी अन्याय-अत्याचाराचे ओझे घेऊन  बेंबीच्या देठापासून तुझा जय जयकार करतो फक्त आमचे स्वातंत्र्य अबाधित राहावे म्हणून... 

"झोपडीतील अन्याय, अत्याचार, आत्महत्या
हिंसाचार, महागाई, भ्रष्टाचार, भूक
भेदभाव यांची चव तू कधी
घेतलीच नाही !"

बोलीभाषेतून सासुरवाशीन पोरीच्या जीवाची घालमेल, बापाप्रति असलेले प्रेम आणि माहेराची ओढ... खुशाली म्हणून वासुदेवाला सांगताना ग्रामीण वऱ्हाडी बोलीची लकब, शुद्ध उच्चार, शब्द निर्मितीची मवाळता प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे कवीची ग्रामीण संस्कृतीशी असलेली नाळ अधिक स्पष्ट होते.

"माया माहेरच्या दादा
माया निरोप तू नेजो 
माया घरची खुशाली 
माझ्या बापाले सांगजो 

सुखी हाये मना इथं 
तुह्या कायजाचा गोया
माहेराले न्यायासाठी 
जाऊ दे जो मना पोया "

सोसलेल्या वेदनांचा हुंकार ऐकविणारे विघ्ने न केलेल्या गुन्ह्याचा भार वाहताना गद्दार भावनांच्या उमलत्या कळ्यांच्या लिलाव पाहून खंत व्यक्त करतात. रात्रीच्या गर्भात उद्याचा सूर्य असेल असा आशावाद वादात रमणारे खरे कवी वाटतात.' गणित बळीराजाच्या आयुष्यातलं '  ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या आयुष्याचा हिशोब मांडणारी कविता... ह्या कवितेत बापाचं छत हरवलेलं घराची नव्याने पुन्हा उभे राहण्यासाठी, जगण्यासाठी कुतरओढ मांडतो... माती, पाऊस , पाणी , कष्ट आणि आटलेल्या रक्ताची गोळाबेरीज मांडताना कवी कमालीचा हाताश होतो. कारण - उपाशी जगावं लागतं असं म्हणणारा व्यवस्थेचा बळी घेत नाही. 

"माती+बियाणं+पाऊस+मेहनत=वार्षिक उत्पन्न
....
कासरा+झाड किंवा जहर नाहीतर विहीर "

दळभद्री आयुष्याचं जुनेर ठिगळ लावताना पुन्हा पुन्हा फाटते. कवी त्याला पुन्हा पुन्हा टाके भरतो. हे चक्र असेच सुरू आहे .  रोजच्या घामाची कमाई जुनेर बदलायला पुरेशी नाही. रफ्फू करून पुन्हा नव्याने परिधान करता येत नाही आणि फेकताही येत नाही. अशी सल नेक कमाई या कवितेत दिसते. 

"बदलवताही येत नाही 
हे दळभद्री आयुष्य 
चिरंतन फाटलं ते फाटलंच "

कोरोनाच्या महामारीने जगाला कवेत घेतलं... गर्दी पांगली माणसं आपल्याच घरात कैद झाले . सगळे प्रश्न सामान्याच्या दारात यक्षासारखे उभे राहिले. हात पोटावर घेऊन राबणाऱ्या जीवांची ससेहोलपट आणि दैनंदिन प्रश्न डोंगराएवढे झाले . थैलीत दाणे नाहीत... डब्यात पीठ नाही... चुलीत निखाराही नाही. ताटात भाकर  नाही. आहे फक्त एक सतावणारी भीती... मृत्यूच्या भयाचे समाचार घेऊन येणारे गडद काळे आकाश नियमांच्या चौकटीत राहून शिक्षण शाळेतून मोबाईल , लपटॉप आणि संगणकात घुसलं.  लोकशाहीचे आधार स्तंभ न्यायाच्या पारड्यासारखे एकीकडे झुकले .  सगळं अलबेल आहे .अशाच बेकिंग न्यूज रोज येत आहेत. 

केवळ शब्दांनी आणि खोट्या सहानुभूतीने पोट भरत नसते म्हणून काही करायचे असेल ?  काही करण्याची इच्छा असेल ; तर मित्रा एका सांजेची सोय कर.  रित्या पोटाच्या धगधगत्या प्रश्नांची उकल करताना भुकेला खोटी सहानुभूती किंवा शब्दांचे घोट कसे शमविणार ? एका सांजेची सोय ही कविता वाचताना 'कविवर्य नारायण सूर्वे ' यांच्या 'भाकरीचा चंद्र' ह्या कवितेची आठवण झाल्याखेरीज राहत नाही. 

या संग्रहात एकूणच ८३ कविता आहेत. त्यामध्ये ५८ कविता आहेत आणि २५ गझलांचा समावेश आहे.  ह्या कविता काही केवळ मनोरंजन आणि मनोवृत्तीच्या प्रतिभाशाली भावाचे दर्शन न करता सत्य आणि वास्तवाचा आरसा आहे. त्यामुळे ही समाजात स्थान टिकून धरणारी आहे . तळागाळातील पिचलेल्या जीवाच्या डोक्यावरून मायेच्या हात फिरवून आधार देणाऱ्या ह्या कविता जनमानसाच्या कविता आहेत. वामन दादा कर्डक म्हणायचे 'भीमा तुझ्या मताचे जर चार लोक असते' परंतु आजच्या कवी अरुण विघ्ने यांच्याकडे पाहून वामनदादाचे ते स्वप्न साकार होण्याची शाश्वती वाटते. ह्या लयबद्ध नसतील पण व्यथेच्या जन्मजात लयीतून प्रसवलेल्या 
निश्चित आहेत . डॉ. भूषण रामटेके यांची न्यायिक प्रस्तावना आणि डॉ. प्रमोद मुनघाटे यांची पाठराखण पुस्तकाला साजेशी आहे. त्याचप्रमाणे अरविंद शेलार यांचे मुखपृष्ठ डोळ्यांत भरणारे आहे. रेखाटने संजय ओरके व प्रशांत डोंगरदिवे यांचे. मध्यमा प्रकाशनने प्रकाशीत केले. ह्या सुंदर साहित्यकृतीला लाख लाख शुभेच्छा...!

आभिप्राय
- तान्हाजी खोडे
नाशिक
९८२३३१६८३८

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या