
महागाव : इंडीया वन या खासगी कंपनीचे एटीएम चोरट्यांनी काल गुरुवारी मध्यरात्री पळविले. एखाद्या चित्रपटात शोभावी, अशी थरारक घटना महागाव शहरात घडल्याने पोलिसांच्या निष्क्रियतेची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली आहेत. महागाव शहरातील गजबजलेल्या कै. वसंतराव नाईक चौकालगत राजू देवराव नरवाडे यांचा गाळा किरायाने घेऊन बेंगलोर येथील इंडिया वन कंपनीने एटीएम सेवा सुरु केली आहे. अगदी बाजुलाच स्टेट बँकेचे एटीएमसुध्दा आहे. रात्री अज्ञात चोरट्यांनी इंडिया वन कंपनीची संपुर्ण एटीएम मशीन चोरली व वाहनात टाकून पोबारा केला.
हा खळबळजनक प्रकार सकाळी निदर्शनास आला. माहिती मिळताच पोलिसांची झोप उडाली. ठाणेदार विलास चव्हाण पोलिस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. उपविभागीय अधिकारी वालचंद मुंडे यांनीही भेट दिली. एटीएम चोरीची गंभीर घटना घडल्याने चक्रावून गेलेल्या पोलीसांनी श्वानपथक व ठसेतज्जञास पाचारण केले मात्र चोरट्यांचा सुगावा लागू शकला नाही. इंडिया वन एटीएम कंपनीचे व्यवस्थापक नागपूर येथून कारभार पाहतात. पुसद येथून एक कर्मचारी
एटीएममध्ये रक्कम ठेवत असतो. ३ दिवसांपूर्वी एटीएममध्ये ५ लाख रुपये कॅश ठेवण्यात आल्याचे कळते. रात्री एटीएम मध्ये नेमकी किती रक्कम होती हे अद्याप स्पष्ट झाले नाही. एटीएम असलेल्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आलेले नाहीत. एटीएम ऊश्मच्या चाव्या
घटनास्थळीच अढळून आल्या असून चौकीदार असलेला व्यक्ती चावी तेथेच ठेऊन घरी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. वर्दळीच्या रस्त्यावर एटीएम असूनही चोरट्यांनी अत्यंत नियोजनपूर्वक संपूर्ण मशिनच चोरून नेल्यामुळे शहरात कायदा व सुव्यस्था किती ढासळली, हे अधोरेखित होते.
0 टिप्पण्या