
नवी दिल्ली : टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडून ८ गडी राखून पराभव पत्करावा लागला. आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ४ ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भाग घेणार आहे. या प्रतिष्ठित मालिकेपूर्वी बीसीसीआयचे अधिकारी ब्रिटनमधील कोरोनाच्या परिस्थितीचे आकलन करत आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना कदाचित बायो बबलमधील हॉटेलमध्येच राहावे लागू शकते. ब्रिटनमधील कोरोनाच्या प्रकरणात वाढ झाली आहे.
या क्षणी भारतीय खेळाडू आणि प्रसारण दल हे सुट्टीवर असल्याने ते मुक्तपणे फिरत आहेत. परंतु जर परिस्थिती सुधारली नाही, तर बीसीसीआय काही निर्बंध लादू शकते. कठोर कारवाई करण्याची गरज नाही, हे बीसीसीआयच्या लक्षात आल्यास खेळाडूंना स्वातंत्र्य मिळेल. बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी सांगितले, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवत आहोत आणि जर ही परिस्थिती आणखी वाईट झाली, तर आम्ही त्यानुसार निर्णय घेऊ. याबाबत आम्ही अंतिम निर्णय घेतलेला नाही.
बीसीसीआयने सर्व खेळाडूंना लसीचा पहिला डोस दिला आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी इंग्लंडमध्ये दुसरा डोस दिला जाईल, अशी बोर्डाची योजना होती. ब्रिटन सरकारने लॉकडाउनवरील निबर्ंध शिथिल केल्यामुळे बीसीसीआयने पुरुष आणि महिला दोघांनाही आपल्या कुटुंबीयांसह प्रवास करण्यास परवानगी दिली.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलची सांगता २३ जूनला झाली. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी भारतीय खेळाडूंना पुरेसा वेळ मिळेल. रवीचंद्रन अश्विन, विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे खेळाडू आपल्या कुटुंबीयांसह यूकेमध्ये आहेत. कोणत्याही प्रकारच्या निर्बंधामधून जाऊ नये, अशी भारतीय खेळाडूंना आशा आहे.
ब्रिटनमध्ये कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. एका आठवड्यात ही संख्या १0,000च्या जवळपास पोहोचली आहे. इंग्लंड सरकार आणि बीसीसीआय या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि लवकरच यावर काही निर्बंध घातले जाऊ शकतात.
0 टिप्पण्या