
नांदगांव पेठ : स्थानिक स्वराज्य संस्थांमधून ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द केल्याने शनिवारी भाजपच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरत दीड तास ठिय्या आंदोलन केले. प्रचंड घोषणाबाजी करीत भाजप कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या या निर्णयाचा यावेळी जाहीर निषेध केला. यावेळी महामार्गावरील वाहतूक दीड तास खोळंबली होती. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची विनवणी केली मात्र आंदोलनकर्ते महामार्गावरून हटायला तयार नसल्याने अखेर पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना बळजबरीने वाहनांमध्ये बसवून पोलीस स्टेशनला नेले. यावेळी भाजप कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले होते. भाजप जिल्हाध्यक्षा निवेदिता चौधरी यांच्या मार्गदर्शनात आज हे आंदोलन करण्यात आले. प्रत्यक्ष स्थळ माहीत नसल्याने तसेच आंदोलनकर्त्यांकडून हिंसक कृती घडू नये यासाठी पोलीस कर्मचारी सकाळपासून पोलीस आंदोलनकर्त्यांच्या मार्गावर होते.भाजपा जिल्हा महामंत्री प्रशांत शेगोकार,भाजयुमोचे प्रदेश सदस्य विशाल केचे, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष सत्यजित राठोड, भाजप तालुकाध्यक्ष राजू चिरडे यांच्या नेतृत्वात नांदगांव पेठ बस स्टँड वर ठिय्या आंदोलन करण्यात आले.कार्यकर्त्यांच्या वतीने महाविकास आघाडीविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली तर सरकारच्या या काळ्या निर्णयाचा निषेध देखील यावेळी करण्यात आला. जोवर हा निर्णय मागे घेत नाही तोपयर्ंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी घेतला होता मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलनकर्त्यांना वाहनात बसवून पोलीस ठाण्यात घेऊन गेले
0 टिप्पण्या