
अमरावती : ग्रामीण भागात एखाद्या कुटुंबात शेतकरी आत्महत्या झाली तर त्या कुटुंबाची सर्व जबाबदारी घरातील महिलांवर येते. अध्र्यावर सोडलेला संसाराचा गाडा महिला स्वकर्तृत्वाने समोर नेते. अशा माताभगिनींना बचत गटाच्या माध्यमातून विविध व्यवसायांच्या संधी निर्माण होणे गरजेचे आहे. बियाणे निर्मितीच्या क्षेत्रातही व इतरही शेतीपूरक व्यवसायांत चांगली संधी असून, त्यासाठी महिलाभगिनींनी पुढाकार घ्यावा. अशा उपक्रमाला आवश्यक बळ मिळवून देऊ, अशी ग्वाही महिला व बालविकास राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी आज चांदूर बाजार येथे दिली.चांदूर बाजार येथील टाऊन हॉलमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्याव्दारे आयोजित कार्यक्रमात स्वंय सहाय्यता महिला बचत गटातील शेतकरी महिलांना बि- बियाणे व औषधींचे राज्यमंत्री कडू यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा समन्वय अधिकारी नितीन सोसे, मंगेश देशमुख, माविमचे संनियंत्रण अधिकारी केशव पवार, सावित्रीबाई फुले लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा अनिता शिंगाळे, कृषी सहायक प्रवीण मोहोड, पुष्पाताई बोंडे यांच्यासह बचतगटाच्या महिला मंडळी आदी यावेळी उपस्थित होते.राज्यमंत्री कडू म्हणाले की, ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाद्वारे विविध योजना राबविण्यात येत आहेत. बचत गटाच्या महिलांनी माविमच्या सहकार्याने आपापल्या गावात शेतीपूरक व्यवसाय करण्यासाठी पुढाकार घ्यावा. पेरणीच्या दिवसांत बियाण्यांची आवश्यकता असते. ही गरज लक्षात घेता महिला बचत गटांनी उत्तम दजार्चे बियाणे कसे निर्माण करता येईल यासाठी नियोजन करावे. माविमव्दारे आज वितरीत होणार्या बियाण्यांच्या बॅगच्या माध्यमातून आणखी बियाणे कसे तयार करता येईल, यासाठी कृषी क्षेत्रातील तज्जञांकडून मार्गदर्शन घेऊन तसे नियोजन करावे. पुढच्या वर्षी आपल्या बचतगटाव्दारे बियाणे विक्री व्हावी, असा निश्चय करुन एकजुटीने प्रयत्न करावे. उत्पादित बियाणे किंवा शेतीपूरक मालाचे मार्केटिंगसाठी पुढाकार घ्यावा. अशा प्रयत्नांतूनच आर्थिक स्थैर्य प्राप्त होऊ शकेल.
0 टिप्पण्या