स्वीडनच्या स्टॉकहोम येथे, दिनांक 5 ते 16 जून 1972 दरम्यान झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण विषयक पहिल्या परिषदेच्या यशस्वीते नंतर , 15 डिसेंबर रोजी झालेल्या परिषदेच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने ” 5 जून हा दिवस “जागतिक पर्यावरण दिन ” साजरा करण्याचे ठरविले. पहिल्यांदाच पर्यावरणाचा विचार मोठ्या प्रमाणात जागतिक पातळीवर चर्चेला आणला गेला. पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचे जागतिक भान तयार करण्याचे काम यामधून झाले. जगाच्या पाठीवरील प्रत्येक मनुष्यामध्ये पर्यावरण विषयी जागृती निर्माण करणे , आणि संपूर्ण राष्ट्राने पर्यावरणाबाबत पुढाकार घेऊन पर्यावरण जनजागृती निर्माण करणे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन 1974 सालापासून दर वर्षी 5 जून हा “जागतिक पर्यावरण दिन” साजरा केला जातो .या वर्षीच्या जागतिक पर्यावरण दिनाची Ecosystem restoration , हि थिम असणार असून मानवाच पर्यावरणाशी असलेला संबध स्पष्ट करणारी हि थीम असणार आहे . विविध प्रकारची जीवसृष्टी तसेच मानवी समूह किंवा समाज ज्या परिसरात राहतात , त्या परिसरातील सर्व घटकाला आपण पर्यावरण असे म्हणतो. पर्यावरण हे भौतिक व जैविक घटकाचे मिळून बनले असल्याचे आपल्याला बघायला मिळते . जैविक घटकांमध्ये वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांचा समावेश होतो . तर भौतिक घटकामध्ये जमीन, पाणी , तापमान आणि वातावरणातील वायूंचा समावेश होतो . समृद्ध जैवविविधतेने नटलेल्या आपल्या भारत देशामध्ये हजारो प्रकारच्या प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजाती वास्तव्य करीत असतात .जगाच्या 8% जैवविविधता आपल्या भारतात आढळते.पृथ्वीवर वनस्पती मानव व इतर प्राणी ज्या पर्यावरणात वास्तव्य करीत असतात त्या पर्यावरणातील विविध घटकात संतुलन प्रस्थापित झालेले असते. सजीवांच्या एका जातीने टाकलेला पदार्थ किंवा त्या जातीला नको असलेला अपशिष्ट पदार्थ, दुसऱ्या एखाद्या जातीसाठी किंवा दुसऱ्या सजीवाच्या पोषणासाठी इष्ट असू शकते. अशा या परस्परावलंबन मुळे पर्यावरणाची एक संरचना सातत्याने टिकून राहत असल्याचे चित्र आपल्याला दिसते .आणि त्यामुळे पर्यावरणाचा समतोल साधला जातो.आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणामध्ये अनेक प्रकारच्या भौतिक, रासायनिक , आणि जैविक क्रिया आणि प्रक्रिया घडून येत असतात . मानव आणि इतर सर्वच सजीव सभोवतालच्या वातावरणाशी, परिस्थितीशी जुळवूण घेण्याचा प्रयत्न करतो . प्रत्येक सजिव बाहेरच्या परिस्थितीशी स्वतःला जुळवून घेण्याच्या प्रयत्नात असतो. जूळवून घेण्याच्या क्रियेतून किंवा गरजा भागविण्याच्या चयापचयी उत्सर्गामुळे पर्यावरणात नको असलेले दूषीत घटक सोडले जातात . ज्यामुळे जीवन चक्रावर परिणाम झालेला दिसतो . पृथ्वीवरील वातावरण वनस्पती ,प्राणी व इतर जीवसृष्टीला पोषक राहावं यासाठी प्रत्येकामध्ये सजगता निर्माण व्हावी मागील काही दशकांपासून मानवाने स्वतःचेआयुष्य सुखी, समृद्धी बनवण्यासाठी निसर्गाचा बेसुमार , सडेतोड , वापर करायला सुरुवात केली. यामध्ये च औद्योगिक क्रांतीनंतर नवनवीन तंत्रज्ञानाचा विकास झाला , आणि या नवनवीन तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे निसर्गातील मुख्य आणि आवश्यक अशा घटकांचा ऱ्हास झाला. अवाढव्य शहर निर्माण झाली . शहर ही माणसाने निर्माण केलेली कृत्रिम परिसंस्था आहे. खरं तर निसर्गातील नैसर्गिक परिसंस्थेमुळे जीव- भू- रसायन चक्रांमध्ये नैसर्गिकरित्या परिसंस्थेत समतोल राखला जातो . पण मानवाने तयार केलेल्या शहर रुपी कृत्रिम परिसंस्थेत मात्र नैसर्गिक परिसंस्थेचा समतोल बिघडविण्याचे चित्र दिसत आहे. सिमेंट कॉक्रिंटची जंगले निर्माण होत आहे . यंत्राच्या कोलाहलामुळे प्रदूषणाचा भयानक भस्मासूर फोफावत आहे . आधुनिक समाजातील बदलती जीवनशैली ,नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिवापर, वीज, इंधने यांचा अतिवापर झाल्यामुळे, औद्योगीकरण वाढल्यामुळे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे मानवाच्या अनंत गरजा , पूर्ण करीत असताना निसर्गाची ओढातान झाल्यासारखे होत आहे. निसर्ग मानवाच्या अन्न ,वस्त्र, व निवारा या गरजा पूर्ण करू शकतो पण अवास्तव आणि अमर्याद छंद पूर्ण करण्याची क्षमता निसर्गात नाही.कोरोना वैश्वीक महामारी च्या काळामध्ये जगातील बहुतांश देशांनी डाऊन केल्यामुळे आपल्या पृथ्वीवरील वातावरण थोडे स्वच्छ झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे . हवेतील प्रदूषण कमी होऊन वातावरण स्वच्छ झाल्याचे काही प्रमाणात पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या विषाणूने जगभर थैमान घातले आहे, या साथीच्या रोगांमध्ये आपल्या देशातीलच नाही तर जगातील कितीतरी लोक ऑक्सिजन अभावी मृत्युच्या दाढेत ओढल्या जात आहे . या वैश्विक महामारी दरम्यान सगळ्यांनाच आज कळून चुकले आहे की पर्यावरण आणि मानवी आयुष्य यांचा किती जवळचा संबंध आहे.जंगल तोडीमुळे हवेतील ऑक्सिजन व कार्बन डाय-ऑक्साइड यांचा समतोल बिघडत आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी होतांना आपल्याला बघायला मिळत आहे, जंगल भुईसपाट झाल्यामुळे प्राणीजीवन ऱ्हास होत आहे. जमिनीची धूप होत आहे. आणि दिवसेंदिवस जमीन नापीक बनत आहे. पन्नास वर्षांपूर्वीच्या जीवनशैलीचा जर आपण विचार केला तर, साधारणता सगळ्याच गरजा निसर्गात मिळणाऱ्या पदार्थांपासून भागविल्या जायच्या . इमारतींना पिवळी माती किंवा चुन्याचा पांढरा रंग लावला जायचा, मिठाईसाठी केशर वापरला जायचा, कापड रंगीत करण्यासाठी निळीचा वापर केला जायचा. आणि नैसर्गिक पदार्थांपासून मिळणारे रंग रोजच्या दैनंदिन जीवनात वापरली जायची. कापसाच्या धाग्या पासून बनणारे सुती कापड वापरले जायचे. तागापासून तयार केलेले जाडेभरडे गोणपाटासारखे कापड आणि रेशमी कापड एवढेच कापड प्रकार उपलब्ध होते. आणि त्यांना नैसर्गिक रंगाचा वापर केला जायचा ,. रेफ्रिजरेटर च्या जागी थंड माठाचे पाणी , पिण्यासाठी वापरलं जायचं. पण आधुनिक काळात मात्र हे सर्व इतिहास जमा झाले ,व नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले .मानवाच्या गरजा अमर्याद झाल्या, त्या पूर्ण करण्यासाठी नवनवीन संशोधन समोर आली . त्यातच नायलॉन , टेरेकॉट, ची नवीन टिकाऊ आणि टिकाऊ पदार्थ, कधीही नष्ट न होणारे धागे तयार झाले . अनेक प्रकारची प्लास्टिक तयार झाली .औषध ,कृत्रिम स्पंज, रबर, अनेक पदार्थ कारखान्यात तयार करण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांमध्ये रासायनिक प्रक्रिया घडवून आणावे लागतात. आणि या प्रक्रियांमधून नको असलेला घातक घटक वातावरणात हवेत मिसळतो. सध्याच्या स्थितीत वापरले जाणारे टाकाऊ रंग, वाहनाच्या सिटीमधील स्पंज, विविध रासायनिक खते, रेफ्रिजेटर सारख्या यंत्रात थंडावा निर्माण करण्यासाठी वापरला जाणारा वायू , अशा प्रकारच्या संश्लेषित पदार्थांच्या निर्मितीसाठी ज्वालाग्रही विषारी किंवा अपायकारक कच्चामाल म्हणून कारखान्यात वापरला जातो .वरील वस्तूंच्या उत्पादन क्रियेत कारखान्यातून बाहेर पडणारा धूर , दूषित वायू आसपासच्या हवेत मिसळतो आणि हवा दूषित होते. सूर्य हा आपला उर्जेचा मूख्य स्त्रोत आहे . आपल्याला प्रकाश आणि उष्णता सूर्यापासून मिळत असते . त्यातील काही उष्णता पृथ्वीकडून वातावरणात परत फेकाली जाते पण
5 जून जागतिक पर्यावरण दिन
Contents hide
औद्योगिक कारखान्यातून पडणारे दूषित वायू , वाहनामधून निघणार धूर ,कार्बन डायऑक्साईड , कुजणाऱ्या पदार्थामधून बाहेर पडणारा मिथेन, नायट्रोजन ऑक्साईड ,क्लोरोफ्लोरो कार्बन यांची संयुगे निर्माण होऊन वातावरणात मिसळतात , आणि या वातावरणामध्ये यांचे प्रमाण वाढल्यामुळे पृथ्वी कडून आकाशात फेकली जाणारी उष्णता हे कण अडवितात , व पुन्हा जमिनीकडे पाठवितात त्यामुळे परिसरातील वातावरणाचे तापमान वाढते ,सहाजिकच पृथ्वीचे तापमान वाढू लागले आहे, याला आपण हरीतगृह परिणाम असे म्हणतो . पृथ्वीवरच वाढतं तापमान हे सर्व जगापुढील मोठे संकट आहे .आणि या तापमानवाढीची चाहूल जगाला लागली आहे .त्या दृष्टीने आज प्रत्येक देश पुढील वाटचाल करीत आहे , या तापमानवाढीमुळे पृथ्वीच्या ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळूण समुद्राच्या पाण्याची पातळी वाढेल ,अनेक देशातील समुद्राच्या किनाऱ्यालगतच्या मोठमोठ्या शहरांना धोका निर्माण होईल . मोठा भूभाग समूदाच्या पाण्याखाली जाईल , मोठमोठी वादळे निर्माण होतील. पावसाळ्याचा कालावधी बदलून सर्वच ऋतूमध्ये अनियमितता निर्माण होईल . वातावरण उबदार होईल आणि उबदार वातावरणात विषाणू, परजीवी, आणि किटक यांची संख्या वाढून साथीचे रोग पसरतील. त्यातच काय आपण कोविड-१९ च्या विषाणुचा कहर आज आपण अनुभवतच आहोत . याला कोण जबाबदार आहे याचेही मानवाला आत्मचिंतन करावे लागेल .
साधारणत जमिनीपासून २० ते २५ किलोमीटर उंचीपर्यन्त निर्माण झालेला , ओझोन वायूचा थर म्हणजे निसर्गनिर्मित पृथ्वीवर धरलेली विशेष प्रकारची ही नैसर्गिक छत्री आहे . सूर्याकडून येणारी अतिनील (अल्ट्रावायलेट ) घातक किरणे बऱ्याच अंशी या ओझोनच्या थरात शोषली जातात. पण ओझोनचा थर पातळ झाल्यास ही किरणे जमिनीपर्यंत पोहोचतील आणि पृथ्वीवरील वनस्पती , शेती धोक्यात येईल, नैसर्गिक समतोल बिघडेल .अनेकांना कातडीच्या कर्करोगासारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागेल.
हवामानाच्या बदलामुळे येणारी संकटे ही एका देशापुरते मर्यादित नसून ते सगळ्या जगावरील संकट आहे , हे समजून घ्यावे लागेल. हवामानाच्या लहरीपणामुळे हवेतील आणि पृथ्वीवरील प्रदूषणामुळे वनस्पती आणि प्राण्यांच्या काही जाती गेल्या काही वर्षात पृथ्वीवरून नष्ट झाल्या. आणि अनेक जाती आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.
बेसुमार वृक्षतोड झाल्याने , जंगलं नष्ट होण्याच्या मार्गावर आली ,विकासाच्या नावावर सिमेंटची जंगलं तयार झाली. यामुळे वातावरणात बदल घडून आले . पर्जन्याला ( पावसाच्या ढगांना ) अडवणारी वृक्षावल्ली नष्ट झाली., पर्यायाने पाऊस कमी व्हायला लागला. वृक्षावर अवलंबून असलेली जैवविविधता नष्ट होऊ लागली आहे. पृथ्वीवरील वृक्षाचे प्रमाण कमी झाल्यामुळे अवेळी अवकाळी पाऊस येऊ लागला .गारपीट सुरू झाली , महापूर , प्रलय ढगफुटी , चक्रीवादळ , वणवा पेटतो ,आणि वाळवंट तयार व्हायला लागली आहेत. जमिनीतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे, अशा प्रकारच्या समस्या मानवाने ओढावून घेतल्यासाखे झाले आहे . निसर्गाकडून आपण फक्त घेण्याचे कार्य चालू ठेवले आहे ,आपलेही काही निसर्गाला परत देणे लागते याचा आज प्रत्येकालाच विसर पडलेला दिसतो. वेळीच माणसाला सावध होऊन तातडीने उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा विचारपूर्वक आणि काटकसरीने वापर करावा. निदान आपापली गावे किंवा भोवतालच्या परिसरातील पर्यावरणाचा ऱ्हास थांबवण्यास हातभार लावावा.
इंधन व ऊर्जेची गरज भागविण्यासाठी खनिजे व खनिज तेल यांचा कमीत कमी वापर करून त्यांच्या ऐवजी पुनरुत्पादनक्षम साधनसंपत्ती जसे पाणी, सूर्यप्रकाश, बायोगॅस यांचा उपयोग करणे मानवाच्या भवितव्याच्या दृष्टीने हितावह ठरेल. रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अति वापर किंवा गैरवापर टाळावा . न संपणारे ऊर्जास्त्रोत जसे सौरऊर्जा ,वारा , समुद्राच्या लाटा या ऊर्जास्त्रोतांचा पर्यावरणाला सुसंगत अस तंत्रज्ञान विकसित करुन वापरलं जावं .समुद्राच्या भरती ओहोटी या नैसर्गिक प्रक्रियांवर संशोधन करून या प्रक्रियांचा ऊर्जा निर्मितीसाठी उपयोग व्हावा. समुद्रातला जलसाठा हा न संपणारा असल्यामुळे हे पाणी शेती व्यवसायासाठी वापरता आल्यास उत्तम पर्याय निर्माण होईल . असे विविध पर्याय प्रत्येकाने शोधावेत . प्रत्येकाने वेगवेगळे वाहन वापरण्यापेक्षा अनेकांनी एकत्र बस ने प्रवास करावा. म्हणजेच सार्वजनिक परिवहनाचा जास्तीत जास्त वापर करून हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण आणावे. काही वस्तू ह्या “युज अँड थ्रो” असतात म्हणजे विकत घ्या,,, वापरा ,,,आणि फेकून द्या,,, आणि पुन्हा नवे विकत घ्या,,, ही मानसिकता बदलणे गरजेचे झाले आहे .ज्यातून फेकून दिलेल्या वस्तूंमुळे नव्या समस्या निर्माण होत आहे. असे न करता वस्तूंचा पूर्नवापर व्हावा .टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू निर्माण कराव्या आणि संपत्तीची उधळपट्टी टाळावी .
निसर्गाचा समतोल राखण्यासाठी कमीत कमी एक तृतीयांश भूभाग हा जंगलव्याप्त असला पाहिजे. हे साध्य करण्यासाठी अमर्याद सुरू असलेल्या जंगल तोडी वर कडक निर्बंध घालून वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे कार्यक्रम प्रभावीपणे राबवावे लागेल.
सौर ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रुपांतर करणाऱ्या तंत्रज्ञानाचा, जास्तीत जास्त वापर करून सौर विद्युत घटाचा वापर वाढवावा .यातून निर्माण होणारी वीज साठवून त्या विजेचा गरजेनुसार वापर व्हावा. शहर आणि गावागावात ,रस्त्यावरील सार्वजनिक ठिकाणी सौर उर्जेवर चालणारी पथदिवे वापरावेत. सोलर उर्जेवर चालणारी सौर पंप जास्तीत जास्त प्रमाणात वापरण्यासाठी प्रोत्साहन दयावे. वाहनांची इंजिने सुव्यवस्थित नसल्यास इंधनाचे अर्धवट ज्वलन होते, त्यामुळे निर्माण होणारा धूर प्रदूषणाला कारणीभूत ठरत असतो, त्यामुळे वाहनांची इंजिने सुस्थितीत ठेवणे ही वाहन चालकांनी स्वतःची जबाबदारी आहे . कारखाने आणि औद्योगिक परिसर व त्यांच्या अवतीभवतीच्या रस्त्याच्या आणि रेल्वे लाईनच्या दुतर्फा वृक्षांची लागवड करून वातावरणातील प्रदूषण खात्रीशीरपणे थांबवता येऊ शकतो. या सर्व बाबी कटाक्षाने पाळल्या तरच खरोखर जागतिक पर्यावरण दिन साजरे करणे सार्थक ठरेल . !!!
धन्यवाद !
[ पर्यावरणस्नेही , विज्ञान शिक्षक ] Email ID pawardatta65@gmail.com फोन : 7972428457